हैदराबादमध्ये दोन बॉम्बस्फोटांत १२ ठार

0
63

प्राथमिक अहवालानुसार हे बॉम्ब सायकलींवर १०० मिटर अंतर ठेऊन लावण्यात आले होते. बॉम्बसाठी आयईडी स्फोटके वापरण्यात आली होती.

पहिला स्फोट संध्या. ७ वा. वेंकटद्री थिएटरसमोरच्या टिफीन सेंटरमध्ये तर काही वेळाने दुसरा स्फोट कोनार्क थिएटरकडे झाला. स्फोटाच्या घटनेनंतर तातडीने मदतकार्यासाठी पोलीस व ऍम्बुलन्स दाखल झाल्या. जखमींना मलकापेठ येथील यशोदा इस्पितळात व सरकारी ओस्मानिया इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

दिलसुखनगर हे हैदराबाद शहराच्या दक्षिणेकडील अत्यंत वर्दळीची बाजारपेठ आहे. याठिकाणी संध्याकाळी नेहमी वाहतुकीची कोंडी असते. काल संध्याकाळी कामावरून परतलेल्या लोकांची तेथे प्रचंड गर्दी होती. दरम्यान, बॉम्बस्फोटांची जागा सील करण्यात आली असून तेथे राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व गुप्तचर विभागाचे पथक रवाना झाले आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी, गृहमंत्री साबिता इंद्रा रेड्डी, पोलीस महासंचालक व्ही. दिनेश रेड्डी व इतरांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी संपूर्ण हैदराबादमध्ये अलर्ट जारी केला आहे. पोलीस महासंचालक रेड्डी यांनी दहशतवाद्यांचा हात स्फोटात असल्याचा अंदाज व्यक्त केला.

दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्फोटांचा तीव्र निषेध केला असून लोकांनी संयम पाळण्याचे आवाहन केले. गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी म्हटले आहे की, स्फोटांच्या शक्यतेबाबत राज्य सरकारला दोन दिवसांपूर्वी माहिती देण्यात आली होती.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेले दोन दिवस प्रमुख शहरांत अलर्ट जारी करण्यात आला होता. अफजल गुरू व अजमल कसाबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी संघटना घातपात घडविण्याच्या गुप्तचर खात्याचा माहितीवरून हे अलर्ट जारी केले होते.

दरम्यान, याआधी २००७ मध्ये हैदराबादमध्ये दोन साखळी स्फोट झाले होते. यात ४२ लोक मारले गेले होते. त्याचवर्षी मक्का मशिदीकडेही स्फोट घडविण्यात आला होता ज्यात ९ जण ठार झाले होते. दिलसुखनगराने याआधी २००२मध्ये स्फोट अनुभवला होता ज्यात दोन ठार झाले होते.