हैदराबादमधील बॉम्बस्फोटमालिकेद्वारे पुन्हा एकदा भारताच्या दरवाजावर दहशतवादाने दस्तक दिली आहे. दहशतवादाचे सावट देशावरून दूर झालेले नाही आणि कसाब तसेच अफझल गुरूला फाशी दिल्याने दहशतवादाची लढाई आपण जिंकली असे होत नाही, असा संदेशच जणू या हल्ल्याने दिलेला आहे. या हल्ल्याने आणखी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. हैदराबादच्या ज्या दिलखुशनगरमध्ये हे बॉम्बस्फोट झाले, त्याच परिसराची आणि बेगम बाजार तसेच ऍबिड या परिसराची सय्यद मकबूल या दहशतवाद्याने गेल्या वर्षी रमजानच्या महिनाभर आधी मोटारसायकलवरून हल्ल्याच्या दृष्टीने चाचपणी केल्याची माहिती खुद्द त्यानेच दिल्ली पोलिसांना अटकेनंतर दिली होती. मग एवढी सुस्पष्ट माहिती असताना हैदराबाद पोलीस गाफील कसे राहिले? दिल्ली पोलिसांजवळील माहिती आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचू शकली नाही का, केंद्रीय गृहमंत्रालय हा समन्वय ठेवण्यात कमी पडले का असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.
सय्यद मकबूलने दिलखुशनगरचेच नाव घेऊन ते इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचे लक्ष्य असल्याचे सांगितले असताना आणि १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान देशात दहशतवादी हल्ल्याची संभाव्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केलेली असतानाही त्या परिसरात काडीमात्र सुरक्षा नव्हती हे आश्चर्यकारक म्हणायला हवे. सय्यद मकबूल हा रियाज भटकळचा साथीदार महाराष्ट्रातील नांदेडचा, पण तो पकडला गेला होता तो हैदराबादेतच. त्यामुळे या मकबूलच्या माध्यमातून हैदराबादमधील दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढणे कठीण नव्हते, परंतु त्या आघाडीवर गाफीलता दाखवली गेली, जी निष्पाप, निरपराध नागरिकांच्या जिवावर बेतली. या स्फोटमालिकेच्या निमित्ताने देशात प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचा विषयही पुन्हा ऐरणीवर आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकारांच्या मुद्द्यांवरून रखडलेला त्या केंद्राचा प्रस्तावच आज दिसत असलेल्या केंद्र सरकार व आंध्र प्रदेश सरकारमधील समन्वयाच्या अभावास कारणीभूत ठरला आहे. संभाव्य दहशतवादी हल्ल्यासंबंधी काटेकोर माहिती असूनही हा हल्ला आपण रोखू शकलो नाही यातच आपले सरकार या देशाच्या जनतेचे संरक्षण करण्यास समर्थ नाही हे सिद्ध झाले आहे. आता केंद्र राज्याकडे आणि राज्य केंद्राकडे बोटे जरूर दाखवील, समन्वयात राहिलेल्या त्रुटींचे खापर एकमेकांवर फोडले जाईल, परंतु जे व्हायचे ते घडून गेले आहे. ‘आम्ही आहोत’ हाच इशारा दहशतवाद्यांनी या हल्ल्याद्वारे दिलेला आहे. वास्तविक हैदराबादमध्ये अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यास इंडियन मुजाहिद्दीनला फारसे सायास पडणार नाहीत, कारण मुळातच हे शहर धार्मिक वैमनस्याच्या ज्वालामुखीवर उभे आहे. चारमिनारच्या परिसरात उभारलेल्या भागामतीच्या मंदिरावरून काही महिन्यांपूर्वी हिंदू – मुसलमानांमध्ये दंगे पेटले होते. आमदार अकबरुद्दिन ओवैसीच्या भडकाऊ भाषणांनी तर धार्मिक द्वेषाचा कळस गाठला होता. याच विषवल्लीची परवाचे स्फोट ही फळे आहेत. आता या स्फोटांनंतरही त्यांचे राजकारण सुरू झालेले दिसते. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे संसदेत विरोधकांना सामोरे जाण्याऐवजी हैदराबादेत जाऊन थडकले. त्यांच्या पाठोपाठ तापल्या तव्यावर तेल ओतण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंहही पुढे सरसावले. प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहण्याची नेत्यांची ही सवय दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला भलतीकडेच भरकटत नेत असते. यावेळीही हेच घडण्याची चिन्हे आहेत. मुळात दहशतवादाचा सामना करण्याच्या दिशेने आपण केलेल्या प्रयत्नांचा फोलपणाच या स्फोटमालिकेमुळे उघडा पडला आहे. इंडियन मुजाहिद्दीन अद्याप सक्रिय आहे, तिचे कंबरडे आपण मोडू शकलेलो नाही हे तर सिद्धच झाले आहे. शिवाय पाकिस्तानची आयएसआय या दहशतवाद्यांना अजूनही फूस देते आहे याचाही हा ढळढळीत पुरावा आहे. हे सारे कुठवर सोसले जाणार? क्षुद्र राजकीय अहंकारापोटी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या उभारणीत खो घालणे कितपत योग्य? या संकटाच्या घडीस नेत्यांनी गांभीर्याने थोडे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या स्फोटांचे राजकारण केल्याने मूळ मुद्दे मात्र दुर्लक्षिले जातील हे भान या सार्यांना केव्हा येणार? जनतेने तरी किती घाव सोसायचे?

