प्राथमिक चौकशी अहवालात अकरा जणांची नावे नमूद करण्यात आलेली आहेत. गौतम खैतान, प्रवीण बक्षी, गिसेप्प ऑर्सी, ब्रुनो स्पाग्नोलिनी, गायडो हस्के, कार्लो गेरोसा व ख्रिश्चन मिशेल यांचीही नावे सीबीआयने नोंदवली आहेत. फिनमेक्कानिका, ऑगस्टा वेस्टलँड, आयडीएस इन्फोटेक व एअरोमॅट्रिक्स या चार कंपन्यांची नावेही अहवालात नमूद करण्यात आली आहेत.
इटलीमध्ये या घोटाळ्याच्या चौकशीसाठी गेलेले पथक भारतात परतले असून केंद्रीय गुप्तचर विभागापाशी या घोटाळ्याच्या चौकशीस उपयुक्त ठरतील अशी बरीच कागदपत्रे असल्याचा त्यांचा दावा आहे. या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात काही मध्यस्थांना पैसे दिले गेल्याचे दिसत असून या प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहेत, त्याचा पर्दाफाश लवकरच होईल अशी शक्यता सीबीआय अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
सदर कंपनीकडून लाचेपोटी मिळालेले २८ दशलक्ष युरो त्यागी बंधूंकडेच राहिले की त्यांमध्ये आणखी कोणी वाटेकरी होते, या दिशेने तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे. या घोटाळ्यातील इटालियन आरोपींपर्यंत सीबीआय पोहोचू शकेल का याबाबतही साशंकता आहे.

