हेमा मालिनी, प्रसून जोशी यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इअर’ पुरस्कार

0
25

>> केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्र्यांची घोषणा, इफ्फीत पुरस्कार प्रदान करणार

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी वर्ष २०२१ साठीच्या ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इअर’ पुरस्काराची घोषणा केली. या वर्षीचा पुरस्कार अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराची घोषणा करताना ठाकूर म्हणाले, भारतीय चित्रपट क्षेत्रात गेली अनेक दशके या दोघांनी महत्वाचे योगदान दिले आहे आणि प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांचे त्यांनी मनोरंजन केले आहे. गोव्यात उद्या दि. २० पासून सुरू होणार्‍या ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद यांनी, ५२ वा इफ्फी २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान, गोव्यात होणार आहे. सध्याची कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेता, हा महोत्सव अर्धा प्रत्यक्ष आणि अर्धा ऑनलाइन स्वरुपात आयोजित केला जाणार आहे. इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय विभागात सुमारे ७३ देशांतील १४८ चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवात सुमारे १२ जागतिक प्रीमियर्स, सुमारे ७ आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, २६ आशियायी प्रीमियर्स आणि सुमारे ६४ भारतीय प्रीमियर्स होतील. इफ्फीकडे यावेळी ९५ देशांमधून ६२४ चित्रपट आले होते.

यावेळी एएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आणि ईएसजीचे सीईओ तारिक थॉमस उपस्थित होते.