हुशारी

0
65
  • प्रा. संदेश राघोबा नाईक गांवकर

जमीनदाराने मुलाविषयी विचारल्यावर व्यापार्‍याने म्हटले ‘‘तुझ्या मुलाला घार उचलून घेऊन गेली’’ मुलाला घार पक्षी कसा बरे उचलून घेऊन जाऊ शकेल? व्यापार्‍याने पुढे स्पष्टीकरण दिले. ‘‘जर लोखंडाचा तराजू उंदीर खाऊ शकतात; तर घार मुलाला देखील उचलू शकतेच.’’

हुशारीची देणगी ही माणसाला देवाने जन्मजात दिलेली असते. मूल रांगताना, चालताना, बोबड्या शब्दांत बोलताना, हसताना व रडताना त्याची हुशारीही लक्षात येत असते. बाळाच्या डोळ्यांत जे भाव उमटतात त्याच्यावरून त्याची हुशारी लक्षात येते.
बैल, गाय, कुत्रा, मांजर वगैरे पाळीव प्राण्यांची खरेदी करताना त्यांच्या डोळ्यांतील भाव ओळखले जातात. त्यांचा चपळपणा डोळ्यांवरूनच समतून घेता येतो. प्रत्येक आई-बापाला वाटते की आपली मुले हुशार असावीत. अभ्यासात हुशार? की एकूण वर्तनात किंवा वागण्यात अथवा व्यवहारात हुशार? याच्यामध्ये जरा फरक असतो.
परीक्षेत खूप गुण घेणारी मुले प्रत्यक्ष वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये तेवढी हुशार नसलेली आढळून येतात. काहींची स्मरणशक्ती फार चांगली असते. अभ्यास करण्याची शक्तीदेखील दांडगी असते, पण सहानुभूती, माणूसकी, दयाळूपणा, कृतज्ञता, नम्रता, सामंजस्य या पातळीवर काही मुले समाधानकारक प्रतिसाद दाखवत नाहीत.
मुलाच्या स्वभावाचे परीक्षण करताना आपल्या हुशारीची निवड कोणत्या मुद्द्यांवर केली जाते यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. हुशारी म्हणजे बावळटपणा नव्हे, हुशारी म्हणजे आपमतलबीपणा नव्हे. हुशारी म्हणजे पोरकटपणा किंवा बालीशपणा नव्हे. तर मग हुशारी म्हणजे नेमके काय?
मौन पाळणे आणि आपले मत न सांगणे म्हणजे विद्वत्ता नव्हे. न बोलण्याच्याविषयी अंदाज घेऊन ठरवणे हे देखील घातक असते, कारण मनात वेगळे आणि घडते दुसरेच अशी परिस्थिती निर्माण होते.
पंचतंत्रातील कित्येक गोष्टी हुशारीची साक्ष देतात.
‘जशास तसे’ या कथेत एका व्यापार्‍याने आपला लोखंडी तराजू एका जमीनदाराकडे आपण परदेशी जाताना ठेवायला दिला. काही दिवसांनी परत आल्यावर त्याने तो परत मागितला तर जमीनदार म्हणायला लागला, ‘‘तुझा तो तराजू उंदरांनी खाल्ला’’ व्यापारी विचार करायला लागला लोखंडाचा तराजू उंदीर कसे बरे खातील? नंतर त्याला एक युक्ती सुचली. नदीवर आंघोळ करायला जमीनदाराच्या लहान मुलाची सोबत त्याने मागितली आणि आंघोळ करुन येताना एका गुहेत मुलाला बंद करुन ठेवले. जमीनदाराने मुलाविषयी विचारल्यावर व्यापार्‍याने म्हटले ‘‘तुझ्या मुलाला घार उचलून घेऊन गेली’’ मुलाला घार पक्षी कसा बरे उचलून घेऊन जाऊ शकेल? व्यापार्‍याने पुढे स्पष्टीकरण दिले. ‘‘जर लोखंडाचा तराजू उंदीर खाऊ शकतात; तर घार मुलाला देखील उचलू शकतेच.’’
खरा प्रकार जमीनदाराच्या लक्षात आला आणि मुकाट्याने त्याने लोखंडी तराजू व्यापार्‍याच्या स्वाधीन केला आणि मुलगा देखील व्यापार्‍याने लगेच आणून दिला. येथे व्यापार्‍याची हुशारी हा या प्रसंगाशी शोभेल अशीच आहे.
दुसरे एक उदाहरण बघा
दोन मित्र जंंगलातून चाललेले असताना वाटेत एक भयानक अस्वल येते. तेव्हा एक मित्र चटकन झाडावर चढतो व दुसर्‍याचा विचार देखील करत नाही. दुसर्‍या मित्राला झाडावर चढता येत नाही. त्याला एक युक्ती सुचते. तो जमिनीवर श्वास कोंडून मेल्याप्रमाणे पडून राहतो. अस्वल त्याला हुंगते आणि तो मेला असे समजून पुढे जाऊन दिसेनासे होते. तेव्हा झाडावर चढलेला मित्र उतरतो आणि अस्वल तुझ्या कानात काय सांगत होते म्हणून विचारतो. तेव्हा तो मित्र चतुरपणे सांगतो, ‘‘अशा विश्‍वासघातकी मित्राची संगती लगेच सोडून दे.’’
आता येथे हुशार कोणाला म्हणावे? आपल्या मित्राला संकटात सोडून स्वतःचा जीव वाचवणे ही हुशारी मानावी का? हुशारीचे निष्कर्ष वेगळेच असतात हे तत्त्व या गोष्टीवरुन स्पष्ट होते. सहृदयता आणि परोपकार ही मूल्ये आपल्याला हुशारी ठरवताना कशी बरे विसरता येतील?
तिसरे उदाहरण जरा वेगळेच आहे.
एका वानरीला पिलासह एका हौदात ठेवले व पाण्याची पातळी वाढवत नेली. वानरी आपल्या पिलाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करायला लागली. जेव्हा पाणी तिच्या गळ्यापर्यंत पाहोचले तेव्हा पिलाला तिने डोक्यावर घेतले. पण पाण्याची पातळी आणखी वाढायला लागल्यावर तिच्या नाका – तोंडात पाणी जायला लागले. तेव्हा पिलाला खाली पाण्यात ठेवून त्याच्यावर ती उभी राहिली. आपले पोर पाण्यात गुदमरुन मरतील हा विचार तिने केला नाही. आपला स्वतःचा जीव वाचवणे हे सर्वांत श्रेष्ठ असे तिने मानले. आता येथे हा वानरीची हुशारी म्हणावी की स्वार्थ?
चौथ्या उदाहरणात हुशारीनेे अगदीच वरचे टोक गाठले आहे.
चार पंडित शिकून तयार झाल्यावर आपल्या गावाकडे जायला निघाले. वाटेत मेलेल्या वाघाची हाडे त्यांना दिसली.
एकटा म्हणाला, मी माझ्या ज्ञानशक्तीने या विखुरलेल्या हाडांनी वाघाचा सांगाडा बनवू शकतो; आणि लगेच बनवला.
दुसरा म्हणाला मी माझ्या ज्ञानशक्तीने या सांगड्यात मांस आणि कातडे देऊन खरोखरच वाघाचे रूप बनवू शकतो; आणि लगेच बनवले.
तिसरा म्हणाला मी माझ्या ज्ञानशक्तीने या वाघामध्ये प्राण आणून त्याला जिवंत करु शकतो. तेव्हा चौथा घाबरुन म्हणाला; ‘‘अगोदर मी पळून जातो, नंतर तू हवे ते कर’’ तो गेल्यावर खरोखरच तिसर्‍याने त्या वाघात प्राण फुंकला. तो जिवंत झाला आणि त्याने त्या पंडितांना मारुन खाऊन टाकले.
येथे हुशारी कशी ओळखायची? चौथा पंडित जो पळून गेला; तोच खरा चतुर ठरला. वाघांत प्राण फुंकले जात होते, तेव्हा तिघांनी सावध व्हायला हवे होते. पण मूर्खपणाने त्यांनी आपला जीव गमावला म्हणूनच हुशारी अंगात बाणवणे तेवढे सोपे नाही!