मोप विमानतळावर सोमवारी इंडिगोचे ए – ३२० प्रवासी विमान चाचणीसाठी यशस्वीरीत्या उतरले आणि त्याने पुन्हा यशस्वी उड्डाण केले. केवळ पेडणेवासीयच नव्हे, संपूर्ण उत्तर गोवा ज्या मोप विमानतळाच्या पाठीशी आजवर ठामपणे उभा राहिला, त्यांच्यासाठी ही निश्चितच एक स्वप्नपूर्ती आहे. या विमानतळाच्या पूर्णत्वास आणि प्रत्यक्ष विमानोड्डाणे सुरू होण्यास अद्याप विलंब जरी असला, तरी येथवर मजल मारण्यासाठी देखील केवढा मोठा संघर्ष करावा लागला आहे त्याच्या आठवणी जाग्या करणेही अप्रस्तुत ठरू नये. दाबोळी विमानतळाभोवती निर्माण झालेल्या पर्यटन लॉबीने मोप विमानतळाला सतत कडाडून विरोध केला. दक्षिण गोव्यातील गावागावांतून ग्रामसभांत मोपविरोधी ठराव संमत करून घेण्यात आले. रस्त्यावरील आंदोलनांपासून सर्वोच्च न्यायालयातील लढ्यापर्यंत नाना प्रकारे मोप विमानतळाला अपशकून करण्याची एकही संधी सोडली नाही. प्रकल्पग्रस्तांना चिथावून त्यांच्या नथीतून तीर सोडण्यात आले. कौन्सिल फॉर सोशल जस्टीस अँड पीस, गोवन्स फॉर दाबोलीम, गोंयकार, रेनबो वॉरिअर्स अशा वेगवेगळ्या नावांखाली मोपाच्या विरोधात जे रान उठवले गेले त्याला पुरून उरून हा विमानतळ साकारतो आहे हे विसरले जाता कामा नये.
सर्वोच्च न्यायालयात जेव्हा ह्या विमानतळाचा विषय गेला तेव्हा त्याला मंजुरी देताना जल, जमीन, हवा, हवामान, ध्वनी, ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, हरितपट्टे, आरोग्य, जैविक संपत्ती अशा विविध गोष्टींवर ह्या विमानतळामुळे कोणते परिणाम होणार आहेत त्यावर देखरेख ठेवण्याचे, विमानतळाच्या पंधरा किलोमीटर परिघातील ३५ राखीव वनक्षेत्रे जपण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले होते. आता हा विमानतळ साकारत असताना ह्या सर्व बाबींकडे लक्ष देण्याची नैतिक जबाबदारी सरकारवर आहे हे विसरले जाऊ नये. मोप नंतरही दाबोळी विमानतळ सुरू ठेवला जाईल असे सरकार सतत सांगत आले असले, तरी त्याची व्यवहार्यताही संशयास्पद आहे.
मोप हे गोमंतकीयांसाठी निश्चितच एक स्वप्न आहे, परंतु ते केवळ स्वप्नच उरता कामा नये. त्याचा फायदा केवळ गोमंतकीय प्रवाशांना होणे पुरेसे नाही. ज्यांनी या प्रकल्पासाठी आपले सर्वस्व दिले आहे त्या प्रकल्पग्रस्तांना, या विमानतळाच्या पाठीशी उभ्या राहणार्या पेडणे तालुक्याला, तालुक्यातील शिक्षित बेरोजगार युवकांना हा विमानतळ काय देणार आहे हा खरा सवाल आहे. विमानतळाशी संबंधित रोजगारांत पेडणेवासीयांना आणि गोमंतकीयांना काय स्थान राहील हे अद्याप स्पष्ट नाही. विमानतळ झाल्याने तालुक्यातील जमिनींना सोन्याचा नव्हे, हिर्यांचा भाव आलेला आहे. ठिकठिकाणी पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेले थाटण्यास आता देश विदेशातील मंडळी पुढे सरसावतील. नानाविध व्यवसाय जागा शोधतील. या सार्यामधून जी रोजगारनिर्मिती होणार आहे, त्याचा फायदा खर्या भूमिपुत्रांना कितपत होणार आहे याची पडताळणी झाली पाहिजे. विमानतळाशी संबंधित रोजगारांसाठी जी कौशल्यनिर्मिती होणार होती, तिचे आजचे स्वरूप नेमके काय आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. मोप हा केवळ प्रवासी विमानतळ नाही. तो पश्चिम किनारपट्टीसाठी मालवाहतुकीचे, आयात – निर्यातीचे एक मोठे केंद्र बनविण्याचा संकल्प सुरेश प्रभू यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री असताना बोलून दाखवला होता. आता त्या आघाडीवर काय प्रयत्न होणार आहेत? गोव्याच्या आणि आजूबाजूच्या भागातील भाजीपाला, फळफळावळ, मासळी, मांस, औषध उत्पादने, अन्य उत्पादने यांची निर्यात मोपच्या माध्यमातून कितपत होणार आहे, त्यासाठी कोणत्या योजना आखल्या गेल्या आहेत हे स्पष्ट झाले पाहिजे.
या विमानतळाच्या आडून मोपला मनोरंजन केंद्राच्या नावाने कॅसिनो आणि तत्सम गैरप्रकारांचे बस्तान बसवण्यासाठीच्या गुंतवणूक प्रस्तावांना सरकारी पातळीवर यापूर्वीच मंजुरी दिली गेलेली आहे. त्यामुळे त्याचा पेडण्याच्या आणि गोव्याच्या संस्कृतीवर कोणता दुष्परिणाम होऊ शकतो त्याचाही गांभीर्याने विचार आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे या विमानतळाच्या निमित्ताने पेडण्याच्या आणि एकूणच गोव्याच्या लोकसंख्येची सध्याची समीकरणेच बदलून जाणार नाहीत ना, त्यातून नवे सामाजिक ताणतणाव निर्माण होणार नाहीत ना, या सगळ्याचा अभ्यास कोण करणार आहे? आता मोप होणार, विमान येणार म्हणून हुरळून न जाता या सर्व संबंधित भल्याबुर्या गोष्टींचा विचार अतिशय गांभीर्याने होणे जरूरी आहे. गोव्यासाठी हा विमानतळ अत्यंत गरजेचा होता यात वादच नाही, परंतु तो राज्याच्या भावी विनाशाची नांदी ठरू नये हे पाहण्याचीही तितकीच आवश्यकता आहे.
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.