ही बेफिकिरी

0
6

वझरा सखला धबधब्यावर रात्रभर अडकून पडलेल्या सहा युवकांची अखेर सुदैवाने मुक्तता झाली. परंतु निसर्गापुढे प्रत्येकवेळी असे सुदैवी ठरता येईलच असे नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची धाडसी कृत्ये कोणी करू नयेत. गोव्यामध्ये अलीकडे सर्वाधिक मृत्यू एक तर रस्ता अपघातांत, समुद्रात किंवा अन्यत्र बुडाल्याने किंवा आत्महत्यांमुळे होत आहेत. राज्यातील रस्ते चौपदरी झाले, गुळगुळीत झाले, तरी अपघात वाढतच चालले आहेत. समुद्रात बुडण्याच्या घटना रोखण्यासाठी सरकारने खासगी कंपनीची मदत घेऊन जीवरक्षक नेमले, परंतु आता नद्या, तलाव, धबधबे, चिरेखाणी यामध्ये बुडण्याच्या घटना घडत आहेत. ह्या महिन्यातच बुडून मृत्युमुखी पडण्याच्या कितीतरी घटना घडल्या. गेल्या तेवीस जूनच्या अग्रलेखात ‘अजून किती बळी?’ असा सवाल आम्ही केला होता. 2020 ते 2025 ह्या पाच वर्षांत गोव्यात तब्बल 419 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारीही आम्ही त्यात दिली होती. गेल्या जून महिन्यातच 13 जूनला चार, 18 जूनला एक, 21 जूनला दोन असे हकनाक बळी जात राहिले. बागा किनाऱ्यावरही एक तरुण वाहून गेला. बुडण्याच्या एवढ्या घटना सातत्याने घडल्या आहेत, पावसाळ्यात अशी ठिकाणे अतिशय धोकादायक ठरत आहेत हे स्पष्टपणे दिसत असूनही कोवळी मुले ह्या धबधब्यांवर जातच आहेत. त्यांचे पालकही त्यांना अटकाव करताना दिसत नाहीत. परवाच सुर्ला धबधब्यावर एक अवघ्या पंधरा वर्षांचा मुलगा बुडून मृत्युमुखी पडला. वझरा सखला धबधब्यावर अडकलेल्या सहाहीजणांचा तर जीव गेला असता. केवळ दैव बलवत्तर म्हणून ते वाचले आहेत. ही सरळसरळ बेफिकिरी आहे, हा पराक्रम नव्हे. आता सरकारने राज्यातील धबधबे, चिरेखाणी, नद्यांमध्ये पोहण्यास पावसाळ्याचे दोन महिने बंदी घातली आहे. सरकारने आपले काम केले आहे, परंतु अशा ठिकाणांवर जाण्यापासून तरुणांना त्यांच्या घरच्यांनी, मित्रमंडळींनी प्रतिबंध केला पाहिजे. नद्या किंवा धबधब्यांवर जाणारे आपल्या भागात किती पाऊस आहे त्याचा अंदाज घेऊन पाऊस कमी आहे असा समज करून तेथे धावतात. परंतु त्या नद्या ज्या वरच्या डोंगराळ भागातून वाहत येतात, तिथे किती पाऊस झाला आहे ह्याचा त्यांना अंदाज नसतो. त्यामुळे अचानक वर भरपूर पाऊस झाला तर नद्यांच्या, धबधब्यांच्या पाण्याची पातळी बघता बघता वाढते आणि मग परतीचे मार्ग बंद होतात. अशा जलसाठ्यांवर मौजमजेसाठी जाणाऱ्यांकडून हे समजून घेतले जात नाही. नद्यांच्या प्रवाहांच्या बाबतीतही हेच होते. अनेक ठिकाणी पाणी वरकरणी उथळ वाटत असले, तरी प्रत्यक्षात तेथे खोल डोह असतात, वेगवान पाण्यामुळे भोवरे निर्माण होतात, पावसाळ्यात तर पाण्याला प्रचंड वेग असतो. माणूस पट्टीचा पोहणारा असला, तरी निसर्गाच्या त्या ताकदीपुढे त्याची ताकद अपुरीच पडते आणि मग बघता बघता माणूस पाण्यात बुडू लागतो. त्याला वाचवण्यासाठी दुसरा धाव घेतो आणि त्याने मारलेल्या मरणमिठीत अडकतो. गोव्यात गेल्या काही वर्षांत बुडाल्याने होणारे मृत्यू काही केवळ समुद्रकिनाऱ्यांवर घडलेले नाहीत किंवा गोव्याबाहेरील पर्यटकांचेही नाहीत. स्थानिक तरुणांचे बळी गेले आहेत आणि तेही समुद्रकिनाऱ्यांवर नव्हे, तर अंतर्गत जलसाठ्यांमध्ये गेले आहेत. नद्या, धबधबे, चिरेखाणी यामधून हे सर्वाधिक बळी जात राहिले आहेत. पर्यटन खात्याने ह्या घटना रोखण्यासाठी काही ठिकाणी स्थानिक सुरक्षारक्षक नेमले, धबधब्यांकडे जाणाऱ्या वाटा बंद केल्या, तरीही पावसाळ्यात मौजमस्तीसाठी झुंबड उडतेच. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील धोकादायक ठिकाणे पावसाळ्यात बंद करायला हवीत, परंतु ते गांभीर्याने केले जात नाही. प्रत्येक गोष्ट पोलिसांनीच करायला हवी असे नव्हे. ग्रामपंचायतींनीही ही जबाबदारी उचलली पाहिजे. तरुणाईला अशा धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखले पाहिजे. तरुणाईनेही जाणावे की स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी मांडलेला हा खेळ आहे. ह्यात कसली आली आहे मजा? एखाद्या तरुण मुलाचा जीव जातो, तेव्हा केवळ त्याचे एकट्याचे आयुष्य संपत नाही. त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असते. क्षणाच्या मौजमजेसाठी ह्या सुंदर आयुष्यावर पाणी सोडू नये. निसर्गाचा, पावसाचा आनंद जरूर लुटावा, परंतु त्यातील धोकेही ओळखावेत. धोकादायक ठिकाणी जाण्याचा मोह टाळावा. प्रत्येक गोष्टीला सरकारला जबाबदार धरता येणार नाही. बुडाल्याने होणारे मृत्यू हे सरळसरळ बेफिकिरीने आणि अतिशहाणपणामुळे जाणारे बळी आहेत. सरकारने आता जलसाठ्यांवर जाण्यास बंदी घातलीच आहे. तरीही तिचे उल्लंघन करून कोणी धबधब्यांवर, नद्यांवर, चिरेखाणींत जाणार असेल, तर त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करावी.