हडफड्याच्या भीषण अग्नितांडवात पंचवीस निष्पाप, गरीब कामगारांचा जीव गेला. नुसता जीव गेला नाही, तर तळघरात कोंडले जाऊन, धुराने गुदमरून, जिवंतपणे जळून, होरपळून बिचारे मृत्युमुखी पडले. पोटासाठी आपला गाव, आपले राज्य सोडून गोव्यात आलेल्या ह्या कामगारांचा बळी इथल्या हप्त्यांना सोकावलेल्या भ्रष्ट, निलाजऱ्या व्यवस्थेने घेतला आहे. आता ह्या अग्निकांडानंतर त्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा जो काही आटापिटा चालला आहे, तो पाहिला तर चीड आल्याशिवाय राहत नाही. किती बेकायदेशीरपणा ह्या जळालेल्या नाईटक्लबच्या बाबतीत झाला आहे त्याला काही सीमाच दिसत नाही. मुळात शेती आणि मिठागरामध्ये अगदी पाण्यामध्ये ह्या बांधकामाला परवानगी दिली गेली. नंतर बांधकाम पाडण्याचा बागुलबुवा दाखवला गेला. मालकाने पंचायत संचालनालयात धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांनी गूढ कारणाखातर पंचायतीच्या आदेशाला स्थगिती दिली आणि तरीही गेली तीन वर्षे हा नाईटक्लब पूर्ण क्षमतेने सुरू होता. दर विकेंडला तिथे खास उत्सवी सोहळे व्हायचे. आणि संबंधित यंत्रणांना हे माहीत नव्हते? एकमेकांकडे बोटे दाखवत आता ह्या दुर्घटनेची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न किमान आता तरी कोणी करू नये. ह्या दुर्घटनेने असंख्य प्रश्न पुढे आणले आहेत, ज्यांची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. भर मिठागरात, पाण्यामध्ये पूलसदृश्य पूर्ण लाकडी बांधकाम करण्यास परवानगी कोणी दिली व कोणत्या आधारे दिली? ह्या बांधकामास वीज व पाणी जोडणी कशी व कोणत्या आधारे मिळाली? येथे व्यवसाय करण्यास परवाना कोणी व कसा दिला? ते पाडण्याची नोटीस पंचायतीने बजावल्यावर पंचायत संचालनालयाने त्या कारवाईस स्थगिती का व कशाच्या आधारे दिली? त्यावर पंचायत संचालनालयाने निर्णय घेण्यापूर्वीच नाईटक्लब सुरू कसा झाला? पर्यटन खात्याकडे ह्या आस्थापनाची नोंदणी नव्हती का? पोलीस यंत्रणेला हा नाईटक्लब सुरू आहे ह्याची कल्पना नव्हती का? पंचायतीने त्यासंदर्भात आक्षेप का घेतला नाही? बदललेल्या पंचायत मंडळानेही पूर्ण डोळेझाक का केली? अग्निशामक दलाने ह्या नाईटक्लबला ना हरकत दाखला दिला होता की नव्हता? दिला असेल तर कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना नसताना कोणत्या आधारे दिला होता? दिला नसेल, तर मग बाकी परवानग्या ह्या नाईटक्लबला कशा मिळाल्या? प्रशासन हे सगळे घडताना कुठे झोपले होते? बरे, ह्या नाईटक्लबचे बांधकाम बेकायदेशीर आहे ह्याबाबत नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या. प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांनी तर वकिलामार्फत लेखी नोटीस दिलेली होती आणि तिच्या प्रती हडफडे – नागवे ग्रामपंचायत, टीसीपी, उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, किनारी व्यवस्थापन प्राधिकरण, पंचायत संचालक ह्या सर्वांना दिलेल्या होत्या. मग ह्या सर्व सरकारी यंत्रणा झापडे बांधून का राहिल्या? ह्या बांधकामाच्या परप्रांतीय मालकाने ह्या सगळ्यांवर अशी काय जादू केली होती? हडफड्यातील हा नाईटक्लब काही अशा प्रकारचे नियम धाब्यावर बसवणारा पहिला आणि एकमेव क्लब नव्हे. गोवा विधानसभेचे कामकाज पाहिले तर रोहन खंवटेंपासून विजय सरदेसाईंपर्यंत अनेकांनी हडफडे गावच्या बेकायदेशीर बांधकामांबाबत विधानसभेत वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत. बरे, हे काही केवळ हडफडे गावातच चालते असेही नाही. राज्यामध्ये अशा गोष्टींचा तर सुळसुळाट झाला आहे. पंचायतींचे पंच – सरपंच, सरकारी अधिकारी, राजकारणी ह्याच्याच जिवावर तर गब्बर झाले आहेत. डोळे दिपवणाऱ्या करोडोंच्या बंगल्यांत राहत आहेत. करोडोंच्या गाड्या उडवत फिरत आहेत. पाच वर्षांआधी मोडक्या स्कूटरने फिरणाऱ्यांना लक्ष्मीचा असा कोणता वर मिळतो की त्यांच्यापाशी कुबेरापेक्षाही अधिक धनसंचय होतो? बार, कॅसिनो, नाईटक्लब, स्पा आणि मसाज पार्लर यांनी गोव्याची संस्कृती देशोधडीला नेऊन सोडलेली आहे आणि सरकार मात्र आध्यात्मिक पर्यटनाच्या बाता मारते आहे. हडफड्यातील नाईटक्लबला आग लागण्याआधी तिथे कझाक नर्तकीकडून कसले हिडीस नृत्य चालले होते त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गोव्याला शरमेने मान खाली घालायला लावणारे हे प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालले होते? सदर नाईटक्लबचा फरारी मालक आता मृतांप्रती सहानुभूती दर्शवतो आहे. मुळात त्याला फरार कसे होऊ दिले गेले? आता किमान दुर्घटना घडून गेल्यानंतर तरी एकमेकांकडे बोटे दाखवू नका. कारवाईचे देखावे करू नका. मृत्युमुखी पडले ते सगळे परप्रांतीय आहेत, परंतु तीही हाडामांसाची माणसे होती. आपल्या बेफिकिरीमुळे, बेपर्वाईमुळे किड्यामुंग्यांप्रमाणे मारली गेली आहेत ह्याची किमान लाज बाळगा.