ही तर सरकारची हिटलरशाही ः आरजी

0
9

>> म्हादईप्रश्नी पदयात्रेला परवानगी नाकारली

म्हादई प्रश्नाबाबत आरजीच्या पदयात्रेला उपजिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. तसेच सत्तरीत 144 कलम लागू केले असून ही सरकारची हिटलरशाही असल्याचा आरोप आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी काल केला. सत्तरी तालुक्यात रिव्होल्युशनरी ऑफ गोवाच्या म्हादईप्रश्नी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेला परवानगी नाकारली असून तसा आदेश सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी दिला आहे. त्याचबरोबर सत्तरी तालुक्यात पुढील 15 दिवस 144 कलम लागू केले आहे. त्यामुळे आरजीच्या पदयात्रेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
दि. 20 फेब्रुवारीपासून आरजीची सत्तरीत पदयात्रा सुरू ़़झाली होती. परंतु त्यांची पदयात्रा ठाणे डोंगुर्ली येथे पोलिसांनी रोखली होती. त्यानंतरही पुढे पदयात्रा सुरू झाली पण कोपार्डे येथे त्यांची पदयात्रा पुन्हा रोखण्यात आली. मंगळवारी सत्तरीतील बाराही सरपंचांनी उपजिल्हाधिकारी परब यांना निवेदन सादर करत सत्तरीत आरजीच्या पदयात्रेला परवानगी देऊ नये. कारण सत्तरीत त्या पदयात्रेमुळे कायदा व सुव्यवस्था पेच निर्माण होणार असल्याचे म्हटले होते. त्या तक्रारीचा आधार घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांनी पदयात्रेस परवानगी नाकारली आहे.

तरीही पदयात्रा काढणारच ः परब

सरकारने संपूर्ण सत्तरी तालुक्यात 144 कलम लागू केले असून रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला सत्तरी तालुक्यातून म्हादईसाठीची पदयात्रा काढता येऊ नये यासाठीच हे कलम लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही आपला पक्ष शांततामयरित्या ही पदयात्रा काढणार असून त्यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याचे काल आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आरजीने गेल्या सोमवारपासून ‘टुगेदर फॉर म्हादई’च्या झेंड्याखाली म्हादईसाठीच्या जागृतीसाठी सुरू केलेल्या पदयात्रेसाठी पक्षातर्फे परवानगी घेतली नसल्याच्या कारणाखाली अधिकाऱ्यांनी ती पदयात्रा अडवली होती.
त्यानंतर पक्षाने यात्रेसाठीच्या परवानगीसाठी अर्ज केला असता उपजिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लागू केले होते. 21 ते 28 फेब्रुवारीपर्यंत 144 कलम लागू करण्यात आले आहे. मात्र, हा आदेश काढल्यापासून तो पुढील 60 दिवस लागू राहणार आहे.