ही आवडते मज मनापासुनी शाळा…

0
23
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

‘सेन्त्रु प्रोमोतर द इन्स्त्रुसांव’ या ख्यातनाम शिक्षणसंस्थेने नुकतीच 28 डिसेंबर 2022 रोजी आपली शताब्दी पूर्ण केली. केवळ काणकोणच्या नागरिकांपुरता नव्हे तर गोमंतकातील शैक्षणिक विश्वातील हा धन्यतेचा क्षण मानता येईल. परकीय सत्तेच्या दमनप्रक्रियेची तमा न बाळगता शिक्षणाविषयीच्या आत्यंतिक ओढीने ज्या शिक्षणसंस्थांनी नेत्रदीपक कार्य केले, त्यांत हे ‘विद्या प्रसारक मंडळ’ अग्रगण्य स्वरूपाचे आहे. त्या संस्थेच्या शताब्दीचा शुभारंभ सोहळा आज होत आहे, त्यानिमित्ताने-

‘सेन्त्रु प्रोमोतर द इन्स्त्रुसांव’ या ख्यातनाम शिक्षणसंस्थेने नुकतीच 28 डिसेंबर 2022 रोजी आपली शताब्दी पूर्ण केली. समस्त काणकोणवासीयांच्या दृष्टीने हा अत्यंत आनंदाचा दिवस. केवळ काणकोणच्या नागरिकांपुरता नव्हे तर गोमंतकातील शैक्षणिक विश्वातील हा धन्यतेचा क्षण मानता येईल. परकीय सत्तेच्या दमनप्रक्रियेची तमा न बाळगता ध्येयनिष्ठेने आणि शिक्षणाविषयीच्या आत्यंतिक ओढीने ज्या शिक्षणसंस्थांनी नेत्रदीपक कार्य केले, त्यांत हे ‘विद्या प्रसारक मंडळ’ अग्रगण्य स्वरूपाचे आहे. भौगोलिक परिसर शिक्षणविकासाच्या दृष्टीने प्रतिकूल असताना, सर्व प्रकारच्या अद्ययावत साधनसामग्रीचा अभाव असताना केवळ आंतरिक निष्ठेच्या बळावर आदर्श शिक्षणसंस्था कशी उभी करता येते याचं हे एक उदाहरण. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत नेतृत्वगुण असलेली, समाजासाठी स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने निरलसपणे कार्य करणारी आणि गतिमान काळात अन्य शिक्षणसंस्थांशी स्पर्धा करताना कुठेही न्यून राहू न देणारी एक आदर्श संस्था म्हणून हे ऊर्जाकेंद्र साऱ्या गोमंतभूमीस ललामभूत ठरलेले आहे असे वस्तुनिष्ठपणे म्हणता येईल. तिला अनेक परींनी गौरविता येईल. व्यक्तिजीवनात वाटचाल करताना चढउतार हे असतातच ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. सुख-दुःखाचे प्रसंग व्यक्तिजीवनाप्रमाणे जीवनाचा खडतर प्रवास करताना येतातच. हे सारे अटळ असते, अपरिहार्य असते. अशा प्रसंगी न डगमगता जो तरतो तो जनमानसाच्या मान्यतेस प्राप्त असतो. सामाजिक जीवन त्याहून भिन्न नसते. शिक्षण ही समाजाच्या उन्नयनाची निरंतर प्रक्रिया असते. तिच्यात निष्ठावंत शिक्षकवर्गाप्रमाणेच अद्ययावत समाजमानसाबरोबर समांतरप्रक्रियेने कार्यरत राहून दृष्टेपणाने स्वतःला झोकून देणाऱ्या व्यवस्थापन मंडळाचे कार्य महत्त्वाचे मानले जाते. ‘सेन्त्रु प्रोमोतर द इन्स्त्रुसांव’चे तत्कालीन तरुण या बिरुदास पात्र ठरले. दृढ कोनशिलेवर ही संस्था वाटचाल करू लागली म्हणूनच ती आदर्श शिक्षणसंस्था बनू शकली, ती सतत वर्धिष्णू राहिली, असे आज अभिमानाने नमूद करावेसे वाटते.


इवलेसें रोप। लावियलें दारी।
त्याचा वेलु गेला। गगनावेऱ्ही।
मोगरा फुलला। मोगरा फुलला।
फुलें वेचितां। भार कळियासि आला॥
शताब्दीच्या मंगल क्षणी मागे वळून पाहत असताना जे चित्र दिसते ते प्रांजळ, पारदर्शी शब्दांत मांडावेसे वाटते.
आज या शताब्दीप्रसंगी कोणते उज्ज्वल चित्र दिसते? कोणत्या प्रकारचे धवल यश या संस्थेच्या ‘श्रीमल्लिकार्जुन विद्यालया’ने प्राप्त केले आहे? मागच्या कालखंडाचे सिंहावलोकन करून त्या तिमिरयुगाच्या पार्श्वभूमीवर हे चित्र न्याहाळावे लागेल. कविवर्य ना. वा. टिळक यांच्या कवितेतील ओळी इथे काहीसा संदर्भ बदलून, उत्कट भाव मनीमानसी बाळगून उद्धृत कराव्याशा वाटतात ः
शुक्ति नलगे मज हवे खरे मोती। रूप नलगे मज हवी तुझी प्रीती।
पात्र सोन्याचें असो मृत्तिकेचें। वेड मजला आंतल्या अमृताचें॥
शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे कोवळे मन ध्यानात घेऊन, त्यांच्या सम्यक भावविश्वाचा विचार करून शाळेची इमारत आणि तिच्या भिंती बोलक्या केल्या जातील अशा प्रकारचे शिक्षण दिल्याने आणि उपक्रमशीलता दाखवून दिल्याने विद्यार्थिवृंदास भविष्यकाळाविषयीची शाश्वती प्राप्त होते. आजवरच्या श्रीमल्लिकार्जुन विद्यालयाच्या वाटचालीत ते दिसून आले. रोजची वर्तमानपत्रे वाचत असताना येथील विद्यार्थ्यांच्या यशाच्या वार्ता झळकतात. क्रीडापटुत्वाच्या बातम्या असतात. विज्ञान प्रकल्पाच्या बाबतीत येथील विद्यार्थ्यांनी अभिनवता दर्शविलेली असते. हे सारे वाचून ऊर अभिमानाने भरून येतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी त्यांची शक्तिस्थाने हेरून त्यांना केलेले मार्गदर्शन, सतत दिलेले प्रोत्साहन हे येथे महत्त्वाचे ठरले. प्रयोगशाळा, संग्रहालय, सभागृह, संगणक कक्ष आणि अद्ययावत ग्रंथालय हे शाळेचे अंगभूत घटक. श्रीमल्लिकार्जुन विद्यालयाच्या आजच्या प्रगतीकडे पाहता बव्हंशी या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. या शाळेचा 1958 ते 1965 या कालावधीतील मी एक विद्यार्थी म्हणून या शाळेच्या प्रगतिपथाचा आलेख पाहून मनोमन आनंद व्यक्त करीत असतो. आजही माझ्या मनात ते आनंदाचे क्षण तळहातावरील आवळ्याप्रमाणे जोजवीत असतो. श्रीमल्लिकार्जुन विद्यालयाच्या शताब्दीच्या प्रसंगी अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती मनात तरळत आहे. मंतरलेल्या दिवसांचे पुनःस्मरण मला मोकळ्या मनाने करावेसे वाटते.


हे सारे करत असताना या शिक्षणसंस्थेचा संक्षिप्त इतिहास नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसमोर मांडावासा वाटतो. केवळ हृदयसंवाद व्हावा म्हणून…
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि विविध कौशल्यांचा विकास अपेक्षित असतो. आणि या साऱ्या विकासप्रक्रियेत शालेय परिसर महत्त्वाची भूमिका बजावत असतो. शाळेत प्रवेश करताना आकर्षक प्रवेशद्वार, सभोवताली भरपूर हिरवीगार झाडे स्वागतास सज्ज असावी लागतात.
अशा प्रकारचा रमणीय परिसर या शाळेच्या विकासासाठी आजच्या घटकेला सज्ज आहे. तो सर्वांचे स्वागत करतो.
बरोबर शंभर वर्षांपूर्वी कोणते चित्र होते?
दि. 28 डिसेंबर 1922 रोजी ‘सेन्त्रु प्रोमोतर द इन्स्त्रुसांव’ या संस्थेची स्थापना झाली. सगळेच सदस्य तरुण होते. मनात अमर्याद उत्साह होता. उभारी होती. अभंग जिद्द होती. मनात ध्येयवाद होता. ‘काणकोण गावात शाळा, वाचनालये, संमेलने यांचे द्वारा शिक्षणप्रसार करण्याचे’ संस्थेचे ध्येय होते. संस्था सरकारदरबारी रजिस्टर झाली. त्या काळात तिला काणकोण म्युनिसिपालिटीकडून 180 रुपयांची मदत मिळाली. स्थापनेच्या वेळी या संस्थेचे 72 सभासद होते. 1931 पासून ‘श्रीमल्लिकार्जुन विद्यालय’ सुरू झाले. 1934 साली विद्यालयात एक शिक्षक व 40 विद्यार्थी होते. 4 मार्च 1937 रोजी संस्थेने ‘स्वस्तिक वाचनालय’ स्थापन केले. या वाचनालयाने तत्कालीन वाचकांची भूक भागविली. मराठीतील उत्तमोत्तम ग्रंथ तिथे होते. शिवाय पोर्तुगीज भाषेतीलही ग्रंथ होते. काही दुर्मीळ ग्रंथ तेथे उपलब्ध होते. शाळेची स्वतंत्र इमारत बांधणे आणि पुढे लायसिमच्या तिसऱ्या वर्षापर्यंतच्या शिक्षणाची सोय करणे हे दोन संकल्प या शिक्षणसंस्थेने सोडले.


बरीच वर्षे श्रीमल्लिकार्जुन विद्यालयाचे वर्ग चारमार्ग येथील परिसरात तीन-चार इमारतींच्या माडीवर भरत होते. श्री. नागेशबाबांच्या माडीवर मुख्याध्यापकांचे कॅबिन + ऑफिस होते. तिथेच जहाजाच्या शिडाचे कापड टाकून वर्ग भरविण्यात येत असत. शिवाय श्री. भाटीकरांच्या मालकीच्या माडीवर व श्री. गोपीदादांच्या माडीवर वर्ग भरत. श्री. गणेशदादांच्या माडीवर प्राथमिक 1 ली ते 4 थीपर्यंतचे वर्ग भरत असत. श्री. भाटीकरांच्या माडीवरील एका दालनात ‘स्वस्तिक वाचनालय’ वसलेले. शनिवारी येथे साप्ताहिक भजन व्हायचे. बाहेरच्या व्हरांड्यात दोन वर्ग आणि स्वस्तिक वाचनालयाच्या लगत एक वर्ग भरत असे. आजच्या तुलनेने प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या कमी असायची. सरासरी संख्या वीस ते बावीस असायची. शिवाय समांतरपणे पोर्तुगीज भाषेतील वर्ग भरायचे. आमचे माध्यम 5 वीपासून 11 वीपर्यंत मराठी होते. मराठीतून शिक्षण घेतल्यामुळे माझ्या आयुष्याला आकार प्राप्त झाला आणि भावजीवन घडविले गेले असे मी प्रांजळपणे सांगू इच्छितो. ‘मातृमुखेन शिक्षणम्‌‍’ या विनोबाजींच्या शिक्षणविषयक संकल्पनेनुसार आयुष्यातील साऱ्या घटना घडत गेल्या असे मला प्रामाणिकपणे वाटते. केवळ वर्गातील विद्यार्थ्यांशी सौहार्द नव्हे, तर शाळेतील विद्यार्थ्यांशी मैत्र जुळायचे. मला तर वाटते ः प्रतिकूलतेत सौहार्दाच्या सेतूमुळे प्रगतीचा पथ सापडतो.


8 जून 1958 रोजी मी या प्रशालेत प्रवेश घेतला. मला तर अलीबाबाची गुहा सापडल्याची अनुभूती जाणवली. त्याच घटकेला श्री. ह. रा. प्रभू या मुख्याध्यापकांच्या शुभागमनामुळे शाळेचा चेहरा-मोहरा बदलला. मुंबईतील रुईया महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन प्रागतिक स्वरूपाचा झाला. ते कर्मयोगी होते. कल्पक होते. उपक्रमशील होते. बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या परीसस्पर्शामुळे आमच्या पिढीच्या विद्यार्थ्यांचे कोटकल्याण झाले असे मी आवर्जून सांगू इच्छितो. शाळेतील त्यावेळच्या सर्व शिक्षकांबद्दल मी कृतज्ञताभाव व्यक्त करू इच्छितो. श्री. कांता ना. गावकर हे आमचे सातवीचे वर्गशिक्षक होते. सुधा सु. राजाध्यक्ष पाचवीच्या व सहावीच्या वर्गशिक्षिका होत्या. त्यांनी प्रकट केलेली सहानुभूती मी विसरू शकत नाही. आमच्या मुख्याध्यापकांबद्दल आणि श्री. यशवंत अनंत नाईक यांच्याविषयी काय बोलावे आणि किती बोलावे हे मला समजतच नाही. फक्त एवढं म्हणेन- ‘त्यांचे आगमन म्हणजे आमच्या शाळेत पडलेली देवदूताची पावलं!’


आमच्या शाळेत पाचवी ते अकरावीपर्यंत अनुभवलेल्या आनंदक्षणांची गणती कशी करावी… यासंदर्भात मला पु. शि. रेगे यांची एक कविता उद्धृत करावीशी वाटते ः
देशान्तरीच्या गोष्टी सांगता
मध्येच शब्द भारावले
त्यांत बुडाली…
सात समुद्र अन्‌‍
सात अंबरे
नाईकसरांचा संस्कृतचा तास म्हणजे नीटनेटकेपणा. सुभाषितांची पखरण. काळ्या फलकावरील पांढऱ्या अक्षरांची सौष्ठवपूर्ण रांगोळी… नुसतं बघत राहायचं अन्‌‍ नंतर मनात साठवायचं! प्रफुल्लताईंनी नववीतील हिंदीचा तास राष्ट्रप्रेमात परिणत केला. शांताबाईंचा तास म्हणजे इतिहासातील घटनांची सानुक्रम गुंफण… सुनीलताईंचा आणि अनंत गावकरकरांचा मराठीचा तास म्हणजे रसमय प्रवास. श्री. लक्ष्मण देसाईसरांचा इंग्लिश व्याकरणाचा तास उद्बोधक आणि मनोरंजक. श्री. शिवानंद उसगावकर आणि श्री. राम भट यांचे विज्ञानाचे आणि गणिताचे तास तर आयुष्याला उभारी देऊन गेले… या सर्वांचा परमोत्कर्ष म्हणजे प्रसंगविशेषी पुस्तक नसतानाही वर्गात मुक्त चिंतनाची दिशा दाखविणारा. मुख्याध्यापक श्री. ह. रा. प्रभू यांचा मराठीचा चैतन्यशील, जिवंत आणि रसरशीत तास… मनाच्या संवेदनाप्रवाहाशी पूर्णत्वानं मिसळून गेलेला… कैक वर्षं जाऊनही मनातळाशी रुतून गेलेला आणि अध्यापन क्षेत्रात प्रवेश केल्यावर रूजून आलेला… सारा भूतकाळ ढवळून काढणारा… पर्युत्सुक बनविणारा.
या शाळेमध्ये बऱ्या-वाईट अनुभवांचं रसपान करता आलं आणि आयुष्य अर्थपूर्ण झालं.
शताब्दीप्रसंगी या शालामातेला कृतज्ञतेनं अभिवादन!
ज्या शाळेत बोरकरांच्या कवितेची धुळाक्षरं गिरविली आणि कवितेनं जीवनाची साथसंगत केली म्हणून कविकुलश्री बा. भ. बोरकरांच्याच शब्दावलीनं हा कृतज्ञतेचा सोहळा पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करायचा आहे.


याच मुहूर्ता, महन्मंगले। स्वीकारी जल तें
मायमोगरी फुलवीं अमुची, भुलवीं गे हरिते

वेल तियेचा चढवी, भिडवी गगनाच्या देंठा
कळ्याफुलांची मिळो पर्वणी दुर्लभ वैकुंठा

भक्तांचा मेळावा जमला आज तुझ्या दारीं
दाखव आम्हां कशी करावी सत्याची वारी

ललकारित तव बिरुदें झेंडा खांद्यावर मिरवूं
आणि यशाची द्वाही तुझिया अष्टदिशा फिरवूं
(महन्मंगले)