हिवाळ्यात चरबी कशी कमी कराल?

0
29
  • डॉ. मनाली महेश पवार

या दिवसांत भूक सारखी लागते. त्यामुळे अतिरिक्त तर खाणे होतेच, शिवाय नको असलेले, जिभेचे चोचले पुरविणारेच पदार्थ जास्त खाल्ले जातात. अग्नी प्रदीप्त असल्याने खाल्लेले पचन होणार; पण पचल्यानंतर त्यातून काही पोषकतत्त्वे तर मिळायला हवीत. म्हणूनच तर लठ्ठपणा कमी करायचा व तोही खाऊन-पिऊन.

हिवाळा हा शरीरशक्ती वाढवणारा ऋतू आहे. या दिवसांत भूकही खूप लागते. त्यामुळे वजन तसेच चरबी कमी करू इच्छिणार्‍यांनी, मधुमेहींनी किंवा हृदयरोग्यांनी कसा आहार घ्यावा, काय आचरण करावे याबाबत तुमच्या मनात गोंधळ निर्माण झाला असेल. कितीही ठरवलं तरी आहाराचं गणित जमतच नाही. भूक तर सारखी लागते. त्यामुळे अतिरिक्त तर खाणे होतेच, शिवाय नको असलेले, जिभेचे चोचले पुरविणारेच पदार्थ जास्त खाल्ले जातात. बरोबर आहे, अग्नी प्रदीप्त असल्याने खाल्लेले पचन होणार. पण पचल्यानंतर त्यातून काही पोषकतत्त्वे तर मिळायला हवीत. तसेच भूक लागली असता खायच्या अगोदर राहिलात तर धात्वाग्नी धातूही पचन करू लागते. म्हणजेच शरीरामधील शक्ती, बल कमी होते. सारखा शारीरिक व मानसिक थकवा जाणवतो.
म्हणून लठ्ठपणा कमी करायचा व तोही खाऊन-पिऊन. प्रत्येक ऋतूत स्वास्थ्यरक्षणासाठी जसा आहार-विहार वेगळा असतो, तसाच प्रत्येक ऋतूत लठ्ठपणा कमी करण्यासाठीचा आहार-विहार वेगळा असतो. हिवाळ्यात जठराग्नीचा विचार करून, वाताचा विचार करून आहार-विहार ठरवावा लागतो.

लठ्ठपणा किंवा मेदोरोग आहे म्हणून फक्त सॅलॅड, कच्ची कडधान्ये, फळांचा रस पिऊन डायट प्लॅन करू नये. हिवाळ्यात पहिला नियम म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण व्यवस्थित सेवन करायचे. दिवसभर भूक लागली म्हणून चरत बसू नये. सकाळचा नाश्ता पोटभर घ्यावा म्हणजे दुपारपर्यंत भूक लागणार नाही. दुपारचे जेवण पोटभर व संतुलित असावे म्हणजे रात्रीपर्यंत भूक लागणार नाही. नाश्ता व दोन्ही वेळची जेवणे योग्य वेळेवर असावी. रात्री झोपून उठल्यावर सकाळी लवकर भूक लागते तेव्हा सकाळचा नाश्ता लवकर सेवन करावा. भूक लागल्यावर योग्य वेळेत खाल्ल्यास खाल्लेल्या अन्नाचे पचन योग्य तर्‍हेने होेते; नाहीतर न पचलेले अन्न चरबीच्या स्वरूपात साठायला लागते.
या ऋतूत फळे, पालेभाज्या व फळभाज्या विपुल प्रमाणात मिळतात. या फळे व भाज्यांचा वापर लठ्ठपणा कमी करण्यासाठी करावा. फळभाज्यांमध्ये भोपळा, पडवळ, दोडका, तोंडली, शेवग्याच्या शेंगा व कारल्यासारख्या फळभाज्या आलटून-पालटून सेवन कराव्यात. पालेभाज्यांमध्ये मुळा, मेथी, पालक, शेवग्याच्या पानांचा वापर करावा. फळांमध्ये आवळा, संत्री, लिंबू, पपई अशा फळांचा वापर करावा.
जेवण किंवा पदार्थ हे प्रोटिनयुक्त असावेत. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीत असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या मोड काढलेल्या कडधान्यांच्या उसळी जेवणात असाव्यात. नाचणी, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्यांचा वापर करून भाकर्‍या खाव्यात. भात खाताना तांदूळ थोडासा भाजून, मग उघड्या पातेल्यात आठ पट पाणी घालून बनवावा व अशाप्रकारे बनवलेला भात सेवन करावा.

कितीही भूक लागली तरी तेलकट, तळलेले पदार्थ अजिबात सेवन करू नयेत. त्यातही महिन्यातून एकदा किंवा दोनदा घरात बनवलेले तळलेले पदार्थ खाता येते. तसेच कच्चे सॅलॅड किंवा भाज्या खाण्यापेक्षा भाज्यांचे सूप बनवून प्यावे. वरीच्या तांदळाचे व ज्वारीच्या लाह्यांचे पदार्थ जास्त भूक लागल्यास खाता येतात.
एकंदरीत लठ्ठपणातसुद्धा तिन्ही वेळा चांगला संतुलित आहार सेवन करावा. परत-परत थोडं थोडं खाऊ नका. फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रॉडक्ट, डबाबंद, पॅकेटबंद पदार्थ खाऊ नयेत.

खाण्याबरोबर लठ्ठपणात पाण्यालाही तितकेच महत्त्व आहे. पाणी हे औषधाप्रमाणे काढ्यासारखे प्यावे. गरम पाणी चहाप्रमाणे घोट-घोट प्यावे. गरम पाणी शरीरात उष्णता निर्माण करते. गरम पाण्याप्रमाणेच वेगवेगळे काढे फॅट कमी करण्यास वापरावे.
बैठे काम करणार्‍यांनी, रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांनी, प्रसूती झालेल्या स्त्रियांनी, तसेच लठ्ठपणाने पिडीत सर्वांनी काही काढे घ्यावेत. हे काढे ‘फॅट करट’ म्हणून वापरले जातात. हे काढे आपल्या नेहमीच्या स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर करून बनवावेत व ते सेवन करावे. बाहेरून विकत आणायची गरज नाही. ते घरच्या घरी ताजे-ताजे बनवता येतात.
१) जिरे- बडिशेप- हळद पाणी
हा काढा बनवण्यासाठी १ चमचा जिरे घ्यावे, अर्धा चमचा बडिशेप घ्यावी व चिमूटभर हळद घ्यावी व एक ग्लास पाणी घ्यावे.
एका पातेल्यात एक ग्लास पाणी ओतावे व त्यात १ चमचा जिरे घालून ते पाणी चांगले उकळावे. पाण्याला चांगली उकळी आल्यावर, त्यात जिर्‍याचा अर्क उतरून पाण्याचा रंग बदलल्यावर गॅस बंद करावा व लगेच त्यात बडिशेप घालावी. तसेच ते पाणी पातेल्यावर झाकण ठेवून झाकून ठेवावे. थोडेसे कोमट असताना त्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी व हे मिश्रण चांगले ढवळून-गाळून तो काढा प्यावा. जिरे, बडिशेप व हळद हे सगळे पदार्थ चरबी कापणारे आहेत. या तिन्ही पदार्थांमुळे पचन चांगले होते. आतड्यातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते. कोठा स्वच्छ राहत असल्याने अपक्व आहाराचा साठा होत नाही. म्हणजेच ‘फॅट डिपॉझिशन’ होत नाही. हा काढा दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तासाने घ्यावा.
तसेच हा काढा एक आठवडा घ्यावा. परत काही दिवस विश्रांती घ्यावी व परत एक आठवडा घ्यावा. हा काढा सतत सेवन करू नये.

२) ओवा आणि बडिशेप काढा
ओवा-बडिशेप हे दोन्ही मसाल्याचे पदार्थ चांगले पाचक आहेत. ते मॅटॅबोलिझम वाढवतात. कोटा साफ करतात. ऍसिडिटी कमी करतात. कॉलेस्ट्रॉल कमी करतात. फॅटचे मॉलेकूल्स ब्रेकडाऊन करण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे बडिशेप हा लघवीचे प्रमाण वाढविणाराही पदार्थ आहे. त्यामुळे किडनीचे कार्य व्यवस्थित व्हायला मदत होते. अंगाला येणारी सूजही कमी होते.
हा काढा बनवण्यासाठी १ चमचा ओवा व एक चमचा बडिशेप घ्यावा. एक ग्लास पाण्यात १ चमचा ओवा घालावा व पाणी गॅसवर ठेवावे. चांगल्या उकळ्या आल्यावर गॅस बंद करावा व त्यात एक चमचा बडिशेप घालून पातेले झाकून ठेवावे. मग २-३ मिनिटांनी पाणी कोमट असतानाच काढा गाळून प्यावा. हा काढासुद्धा जेवणानंतर अर्ध्या तासाने प्यावा. याचे सवेन आठवडाभर करावे.
आहार, काढा यांबरोबर महत्त्वाचा आहे तो व्यायाम. हिवाळ्यात भरपूर व्यायाम करावा. उष्णता निर्माण करणारे व्यायाम करावेत. शरीरातून भरपूर घाम निघणारे व्यायाम करावेत. फक्त बैठ्या व्यायामाने किंवा योगासनाने चरबी कमी होणार नाही. धावणे, चालणे, बैठका, जोर काढणे, सूर्यनमस्कार घालणे, ऍटोबिक्स प्रकारचा व्यायाम करावा.

अशा प्रकारे आहार-विहाराचे आचरण केल्यास शरीरशक्ती टिकून राहते. चरबीही वाढत नाही. लठ्ठपणा कमी होऊन चपळता येते व हिवाळ्याचा आनंदही घेता येतो.