हिवाळ्यातील सांधेदुखी

0
65
 • – डॉ. मनाली महेश पवार

या संधिवाताचा त्रास वृद्ध व्यक्तींना जास्त जाणवतो. तसेच स्त्रियांमध्ये विशेषतः रजोनिवृत्ती झालेल्या महिलांना हा त्रास जास्त होतो. सध्याच्या काळात तरुण व मुलंही याला अपवाद नाहीत. म्हणून प्रत्येकाने काही नियम पाळणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांत तर याचा त्रास अधिक होतो.

दिवाळीचे अभ्यंगस्नान झाले म्हणजे इथेच अभ्यंगाला पूर्णविराम देऊ नका. कारण थंडीची थोडी-थोडी चाहूल लागत आहे व सांधेदुखीही आपले डोके वर काढत आहे. सध्या दवाखान्यात अंगदुखी, हाडं दुखतात, सांधे दुखतात, बसल्यावर उठता येत नाही, अंग मोडल्यासारखं होतं- जखडल्यासारखं होतं अशा प्रकारची लक्षणे घेऊन येणारे रुग्ण वाढत आहेत. मग याला फक्त पेन-किलर घेणार का? पेन-किलर तात्पुरतं आराम देईल, पण पूर्ण हिवाळा तर आपण अशी औषधे घेऊ शकत नाही. मग काही शमन उपाय, काही शोधन उपाय, काही आहारामध्ये बदल तर काही आचरणामध्ये बदल करून या सांधेदुखीपासून आपण आराम नक्कीच मिळवू शकतो.

या संधिवाताचा त्रास वृद्ध व्यक्तींना जास्त जाणवतो. तसेच स्त्रियांमध्ये विशेषतः रजोनिवृत्ती झालेल्या महिलांना हा त्रास जास्त होतो. सध्याच्या काळात तरुण व मुलंही याला अपवाद नाहीत. म्हणून प्रत्येकाने काही नियम पाळणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांत तर याचा त्रास अधिक होतो.

थंडीच्या दिवसांत सकाळी झोपून उठल्यावर काहीसे अवघडल्यासारखे होणे व हालचाल केल्यावर पूर्ववत होणे हे नैसर्गिक आहे. पण दिवसभर ही सांधेदुखी चालू राहिली तर मात्र ती आरोग्यास त्रासदायक ठरते. सध्याच्या व्यस्त जीवनात जिथे हालचाल कमी, बैठे काम जास्त, ए.सी.मध्ये काम, व्यायामाचा अभाव, अतिपरिश्रम, उभ्याने काम किंवा सारखी धावपळ, तासन् तास बसून काम करण्याची पद्धत, लठ्ठपणा, सांध्यांमध्ये गॅप, कॅल्शियमची कमी असणे, तणावग्रस्त जीवनशैली, संतुलित आहाराचा अभाव, जीवनसत्त्वांची कमतरता, ड-जीवनसत्त्वाची कमतरता, वयानुरूप होणार्‍या बदलांमुळे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.

आयुर्वेदशास्त्रानुसार वातप्रकोपामुळे शरीरातील विविध भागांत वेदना उत्पन्न होते व हाडे हे वाताचे स्थान असल्याने विविध सांध्यांमध्ये वेदना होणे हे वातप्रकोपाचे लक्षण संधिवातामध्ये दिसते. थंड वातावरणामुळे बाह्य वातावरणातील शीत, रुक्ष, खट, चल हे गुण वाढतात व शरीरातीलही वातदोष वाढतो व सांध्यांमध्ये आक्रसन निर्माण होते. परिणामी सांध्यांच्या हालचालींना त्रास होतो व वेदना उत्पन्न होतात. अतिविचार, ताणतणावानेही वातदोष वाढतो. त्यामुळे ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करावे. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉईडचे विकार म्हणजे कफाच्या विकृतीने सांध्यामध्ये त्रास होतो. परंतु वातदोष हे सांधेदुखीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे वातशमन होईल असे घरगुती उपाय करावेत.
ज्यांना संधिवात आहे त्यांनी हिवाळ्यात त्याचा त्रास वाढू नये म्हणून उपाय करावे व ज्यांना संधिवात नाही त्यांनी आपले आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आपल्याला संधिवाताचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.

सांधेदुखीमधील लक्षणे

 • सगळ्या सांध्यांमध्ये वेदना, विशेषतः गुडघ्यांमध्ये जास्त.
 • सांध्यांना सूज.
 • सांध्यांची हालचाल करताना त्रास.
 • सांध्यांमध्ये ताठरता.
 • हाडांमध्ये कटकट आवाज.
 • सांध्यांच्या भोवती उष्णता, लाली.
 • अशक्तपणा.
 • निरुत्साह.
 • आळशीपणा.
 • फार झोप येणे किंवा अजिबात न येणे.
  अशी लक्षणे सांधेदुखीबरोबर हिवाळ्यात दिसू शकतात.
  उपचार करताना वातशामक औषधे, स्थानिक उपचार, आहारामधील पथ्य आणि योग्य असा व्यायाम करावा व सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. हिवाळ्यामध्ये सांधेदुखीवर घेण्याचे उपचार-
 • संतुलित आहार ः सांधेदुखीमध्ये आपण जो आहार घेतो त्याला खूप महत्त्व आहे.
 • अतिस्निग्धयुक्त पदार्थ मटण, मांस, चिकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, आंबट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. या पदार्थांचे पचन नीट न झाल्याने हे पदार्थ आपली रोगप्रतिकारक शक्तीचा र्‍हास करतात व स्नायू दुर्बल बनवतात. त्यामुळे आहारावर लक्ष द्यावा. आतड्यातील आजाराचे रूपांतर संधिवातात होऊ शकते म्हणून आहारात भाज्या, फळे, डाळी, कडधान्ये, धान्ये यांचा समतोल वापर करावा.
 • ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. इतकेच नाही तर ओमेगा ३ शरीराचे मेटाबॉलिझम वाढवतात. त्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते व पर्यायाने सांधेदुखीमध्ये मदत होते. म्हणून हे ओमेगा ३ फॅटी ऍसिड शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सगळ्या प्रकारचा सुकामेवा- जसे की अक्रोड, बदाम इ. आणि मासे यांच्या सेवनाने भरपूर ओमेगा ३ मिळते.
 • खाद्यपदार्थांमधून भरपूर व्हिटामिन डी मिळते. व्हिटामिन डी हाडांसाठी खूप उपयुक्त असते. मश्रूम, अंडी, मासे, अवोकॅडो आणि दुग्धजन्य पदार्थांतून व्हिटामिन डी मिळते. व्हिटामिन डी शरीराची हाडे मजबूत करते. त्यामुळे अशा खाद्यपदार्थांचे सेवन करावे. भरपूर सूर्यप्रकाश व्हिटामिन डीची कमतरता भरून काढतो. त्यामुळे हिवाळ्यात कोवळ्या ऊनामध्ये बसावे.
  काही स्थानिक व पोटातील औषधे
 • शतावरी, अश्‍वगंधा, दशमूळ, निर्गुडी, लसूण, एरंड, कव्हेर बला, शुण्ठी, रास्नासारख्या औषधांचा उपयोग करावा.
 • शतावरी कल्प दुधातून सेवन करावे.
 • सुंठ अर्धा चमचा व गूळ पाव चमचा यांची चांगली बोराएवढी गोळी करावी व ती गोळी रोज सकाळी खावी. सुंठ, गूळ व गाईचे तूप घालूनही गोळी बनवता येते.
 • अर्धा चमचा एरंडेल तेल कणिक भिजवताना आत घालून चपाती बनवून खावी.
 • सुकामेवा व डिंकाचा वापर करून बनवलेले लाडू खावेत.
 • मेथीचे लाडू, मेथीची पेज, अळीवाची खीर सेवन करावी.
 • त्याचप्रमाणे वर सांगितलेले वातशामक वनस्पतीचे काढे, घनसाट, गुग्गुळ, कुक्कुटाण्डत्त्वक् भस्म, सुवर्णभस्म इत्यादींचा वैद्याच्या सल्ल्याने उपयोग करावा.
 • वातशामक औषधांनी सिद्ध केलेल्या विविध तेलांनी मसाज (अभ्यंग) करावे. त्याचप्रमाणे वातशामक औषधी वनस्पती पाल्याने शेकावे किंवा चूर्णांचे लेप लावावे. अशा प्रकारे स्थानिक उपचार करावेत.
 • ‘बस्ती’ हा पंचकर्म उपचार वातशमन करतो व संधिवातामध्ये उपयुक्त ठरतो.
 • दूध, सुंठ, पांढरे तीळ, डिंक, आले, लसूण, मेथ्या, अळीव इत्यादी आहारीय द्रव्ये वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
 • योग्य आहार व औषधोपचारांसोबत व्यायामही आवश्यक आहे. सांधेदुखीवर नियमित चालणे आवश्यक आहे. योगासनांचे काही प्रकार योग-शिक्षकाच्या साहाय्याने शिकून घेऊन रोज करावेत. सांधेदुखीमध्ये हालचाल करणे आवश्यक आहे.
 • मनाला मजबूत करण्यासाठी मेडिटेशन (ध्यानधारणा) करणे आवश्यक आहे.
  अशाप्रकारे आहार, आचरणामध्ये थोडेसे बदल करून ‘ऊह’, ‘आह’, ‘आवच्’पासून मुक्ती मिळवा.