हिवाळी ऑलिंपिक व चीनची दंडेली

0
16
  • – दत्ता भि. नाईक

१८ ऑक्टोबर २०२१ रोजी ही क्रीडाज्योत प्रज्वलित केली जात असताना चीनच्या सूचनेवरून ग्रीसची पोलीस यंत्रणा ज्याप्रमाणे वागली ते पाहता एकेकाळी युरोपमधील लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्रीसचे कोणत्या पातळीवर पतन झाले आहे हे लक्षात येते.

२०२२ च्या हिवाळी ऑलिंपिकचे आयोजन चीनमध्ये होणार हे निश्‍चित ठरले आहे. आयोजनाची तयारी एक वर्षापूर्वीच करावी लागते. ऑलिंपिक खेळांचा इतिहास प्राचीन काळाशी संबंधित आहे, याची आजही जाणीव ठेवली जात आहे. ग्रीसमधील ऍथेन्स या बेटावर ऑलिंपिक नगरी आहे. यजमान देशाचे प्रतिनिधी या ठिकाणावरून ऑलिंपिक ज्योत पेटवून घेतात व ती स्वदेशात नेली जाते. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी ही ज्योत प्रज्वलित केली जात असताना चीनच्या सूचनेवरून ग्रीसची पोलीस यंत्रणा ज्याप्रमाणे वागली ते पाहता एकेकाळी युरोपमधील लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्रीसचे कोणत्या पातळीवर पतन झाले आहे हे लक्षात येते.

ग्रीक पोलिसांची मनमानी
ऑलिंपिक नगरी ही अशा आंतरराष्ट्रीय खेळांची जननी असल्यामुळे येथे अशा प्रकारचे बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्या राष्ट्राच्या वतीने ज्योत पेटवली जाते तेथील विरोधकांनी जनाधिकार, वांशिक भेदभाव, पर्यावरण इत्यादी विषयांवरून निदर्शने करणे हे नेहमीचेच आहे. कार्यक्रमात व्यत्यय आणण्यापासून त्यांना रोखणे हे स्थानिक सरकारचे कर्तव्य आहे. निदर्शकांना तात्पुरते ताब्यात घेणे हा आतापर्यंत सर्वत्र चालत आलेला शिरस्ता आहे. परंतु या खेपेस मात्र निदर्शकांना फारच वेगळा अनुभव आला. निदर्शकांमध्ये चीनने लष्करी बळावर व्यापलेल्या तिबेटी, शिंजियांग व दक्षिण मगोलियन नागरिकांचा अंतर्भाव होता. त्यांच्यावर होणार्‍या मुस्कटदाबीला वाचा फोडण्यासाठी चीनमधील होऊ घातलेल्या हिवाळी ऑलिंपिक क्रीडा सोहळ्यावर जगातील देशांनी बहिष्कार घालावा, अशी मागणी हे निदर्शक करीत होते. ग्रीसची पोलीस यंत्रणा चिनी प्रतिनिधींच्या आदेशावरून वागत होती असेही यावेळेस लक्षात आले. हा प्रकार पाहून आंतरराष्ट्रीय माध्यमांचे वार्ताहरसुद्धा अचंबित झाले. शहराच्या सीमारेषेवरील ऍक्रोपोलीसवर तिबेटी झेंडा फडकावणार्‍या अमेरिकन नागरिक असलेल्या दोन युवतींशी पोलीस ज्या पद्धतीने वागले ते पाहता कुणालाही धक्का बसेल असेच तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांचे म्हणणे आहे. हॉंगकॉंगमध्ये चाललेल्या जनतेच्या गळचेपीचा निषेध करणारे बॅनरही या ठिकाणी फडकावले गेले, त्यांनाही असाच अनुभव आला. चिनी दूतावासाचे अधिकारी ज्यांच्याकडे अंगुलिनिर्देश करत होते त्यांच्याशी ग्रीसचे पोलीस धटिंगणासारखे वागत होते.

सुश्री त्सेरिंग केलयंग व श्री. तेनझिंग नेत्संग हे झुरिक येथे सध्या राहत असलेले स्वित्झरलँडचे नागरिक. त्यांनी ऍक्रोपोलीस व ऑलिंपिया येथील निदर्शनात भाग घेतला होता. दोघंही तिबेटन यूथ असोसिएशन ऑफ युरोपचे कार्यकर्ते आहेत. या दोघांनाही निदर्शनाच्या स्थानावरून जबरदस्तीने उचलून मेली स्टेशनवर नेण्यात आले. त्सेरिंग यांना तर दोन वेळेस अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागले. दुसर्‍या खेपेस त्या माध्यमांना त्यांच्या संघटनेच्या उद्दिष्टांबद्दल माहिती पुरवत होत्या. चिनी अधिकारी ज्या-ज्या निदर्शकाच्या दिशेने अंगुलिनिर्देश करत होते त्या-त्या व्यक्तीला पोलिसांचा मार खावा लागत होता. पोलिसांचा उत्साह इतका वाढला की काही वेळाने त्यांनी त्यांच्यापेक्षा वेगळ्या दिसणार्‍या सर्व लोकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. यात निदर्शनात भाग घेणार्‍या तिबेटी लोकांची छायाचित्रे टिपणार्‍या चिनी फोटोग्राफर्सनाही त्यांनी ताब्यात घेऊन एकच गोंधळ उडवून दिला. त्सेरिंग यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या एका सहकार्‍याने आम्हाला अटक करून पोलिस स्टेशनवर का आणले आहे असे विचारताच तेथील अधिकार्‍याने सांगितले की, आम्ही ग्रीक पोलिस आहोत. आम्ही काहीही करू शकतो. पोलिसांचा व्यवहार मनमानी व मानवी न्यायाशी विसंगत होता.

तेनझिंग नेत्सांग हा झुरिकमध्ये कायद्याचा अभ्यास करणारा तरुण. त्याचे म्हणणे आहे की, तो स्वित्झरलँडचा नागरिक असून त्याच्याजवळ स्विस पारपत्र आहे. ग्रीस हा युरो संघटनेचा सदस्य देश आहे, त्यामुळे तो या देशात मुक्त संचार करू शकतो. ग्रीससारख्या लोकशाही असलेल्या देशात चिनी हुकूमशाहीला महत्त्व कसे दिले गेले याचे त्याला आश्‍चर्य वाटते. ग्रीसमध्ये विचार-विचर व संचार स्वातंत्र्य असतानासुद्धा असे का घडले हाच त्यांच्यासमोरील प्रश्‍न आहे. या घटनेद्वारा चिनी कम्युनिस्ट दडपशाही युरोपमध्ये आयात केली जाते की काय अशी भीतीही त्याने व्यक्त केली.

हुकूमशाही वृत्ती
२ नोव्हेंबर २०२१ रोजी चीनची टेनिस महिला चँपियन पेंग शुआई यांनी देशाचे उपप्रधानमंत्री व कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते सांग गाओली याने अनेक वेळा आपल्यावर बलात्कार केल्याचे उघड केले. पेंग सुआई या फ्रेंच ओपन टेनिसच्या माजी विक्रमकर्त्या विजेत्या आहेत. देशात घडलेल्या ‘मी टू’ प्रकरणावर पडदा टाकण्याचे बरेच प्रयत्न झाले. विषयाचा चहुबाजूंनी बोलबाला होताच पेंग शुआई यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले. चिनी कम्युनिस्ट पार्टीचे प्रतिनिधित्व करणार्‍या टी.व्ही. चॅनेलवरून असे सांगण्यात आले की, या विषयावर वर्ल्ड टेनिस असोसिएशनसमोर चुकीची माहिती दिली गेली आहे. ‘ग्लोबल टाईम्स’ या पार्टीचे मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्रातून पेंग शुआई या तंदुरुस्त, आनंदी, हसतमुख व मुक्त नागरिक आहेत, अशा प्रकारची माहिती वर्ल्ड टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष स्टीव सायमन यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आली. सर्वात आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ऑलिंपिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी दि. २२ नोव्हेंबर रोजी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. थॉमस बाच यांची संघटनेच्या मुख्यालयातून व पेंग शुआई यांची चीनमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा मुलाखत आयोजित केली गेली. यावेळेस बाच यांनी जे काही आतापर्यंत मांडले गेले त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. पेंग शुआई यांनीही काहीही घडले नसल्याचे सांगितले. त्यावेळेस त्यांच्यासोबत कम्युनिस्ट पार्टीच्या टेनिस व्यवस्थापन केंद्र व चीनमधील क्रीडा प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष ली लिंगवेई हे होते. त्यामुळे ही मुलाखत कोणत्या पद्धतीने आयोजित केली होती हे लक्षात येते. यामुळे बाच व त्याची इंटरनॅशनल ऑलिंपिक्स कमिटी यांच्यावर मानवाधिकारांच्या बाबतीत जागरूक असलेल्या व्यक्ती व संघटनांकडून भरपूर टीका होऊ लागली. याशिवाय २०२२ च्या हिवाळी ऑलिंपिकवर बहिष्कार घालण्याची मागणीही केली जाऊ लागली. बाच यांनी या टीकेची पर्वा न करता खेळात राजकारण आणू नये असे मत व्यक्त केले आहे. याशिवाय पेंग शुआई या महिला खेळाडूने त्यांनी दिलेले भोजनाचे आमंत्रण स्वीकारलेले आहे. या घटनाक्रमामधून चिनी सत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा संस्थांवरसुद्धा आपली दंडेली चालवत आहे असे लक्षात येते.

दक्षिण आशियाई व आफ्रिकी देशांना चीनने ऋणजालात अडकवले आहे. शस्त्रास्त्र क्षमता व सज्जता इतकी वाढवलेली आहे की महायुद्ध भडकल्यास चीन कोणत्याही परिस्थितीत एक पाऊल पुढेच असेल. ग्लोबल टाईम्सच्या तीस वर्षांपासून असलेल्या हू शिजिन या संपादकाला १६ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पदच्युत करण्यात आले आहे. हॉंगकॉंगमधील लोकशाही समर्थक वृत्तपत्रांच्या संपादकांना व काही पत्रकारांना १६ जूनपासून अटक करून स्थानबद्धतेत ठेवले आहे. चीनने प्रसिद्धीस दिलेल्या नवीन नकाशात अरुणाचल प्रदेशचा दक्षिण तिबेट असा उल्लेख असून तो चीनचा भारताने व्यापलेला प्रदेश आहे असे म्हटले आहे.

अलीबाबा या मोठ्या चिनी कंपनीचा एक संस्थापक असलेली धनवान व्यक्ती जॅक मा. सध्या जॅक मा कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही. शांघाय येथे ऑक्टोबर महिन्यात भरलेल्या एका शिखर परिषदेत नावीन्यावर बंधने लादण्याच्या सरकारी नियंत्रणावर त्यांनी टिका केली. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी त्यांना सरकारी अधिकार्‍यांनी बोलावून घेतले. दोन दिवसांनंतर जॅक मा यांचा व्यापार नव्याने सुरू होणार होता, परंतु ते आता कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही. दुसरी धनवान व्यक्ती म्हणजे साडेसात अब्ज डॉलर्सचा मालक फीसन कंपनीचे अध्यक्ष गुओ हेसुद्धा सध्या कुठे हरवले आहेत हेच कुणाला माहीत नाही. यावरून चीनच्या हुकूमशाही वृत्तीची कल्पना येते.