विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पर्वरी येथे काँग्रेस विधिमंडळ गटाची बैठक घेऊन आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर काल चर्चा केली. गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाबाबत विरोधी पक्षातील आमदारांच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व विरोधी आमदारांची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कालच्या बैठकीला काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा आणि आमदार आल्टन डिकॉस्टा यांची उपस्थिती होती. गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात भाजप सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर आवाज उठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच, या बैठकीत राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. राज्यात पक्षसंघटन आणखी बळकट करण्यावरही चर्चा झाली.