– भावार्थ मांद्रेकर
निसर्गाने सढळ हस्ते उधळण केल्याने हिवरे गावाची कीर्ती गोव्याच्या कानाकोपर्यांत पसरली आहे. दर शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने निसर्गप्रेमींची येथे उंचावरून कोसळणार्या धबधब्याच्या धारांमध्ये चिंब भिजून मनसोक्त आनंद लुटण्याच्या उद्देशाने गर्दी उसळते. आठवडाभराचा क्षीण घालवून पुढील आठवड्यासाठी हवा असणारा ऊर्जेचा साठा हे पर्यटक आपल्या डोळ्यात सामावून पूर्ण समाधानाने परतीची वाट धरतात, ते पुन्हा एकदा येथे येण्याच्या निर्धाराने!
………
मनोहारी हिरवा शालू नेसलेले म्हादई अभयारण्य म्हणजे पर्यटनप्रेमी, पर्यटक आणि लोकजीवनाचा त्रिवेणी संगम होय. पावसाळा सुरू झाल्यावर नववधूप्रमाणे शृंगार करणारी सह्याद्रीची वनराई, मेघच्छादित पर्वतरांगा आणि नि:स्सीम सौंदर्यात भर घालणारे फेसाळ धबधबे यामुळे हा नयनरम्य निसर्ग सर्वांच्या मनात खोलवर घर केल्यावाचून राहत नाही. पश्चिम घाटातील पर्वत रांगांपैकी हिवरे येथे डोंगरमाथ्यावरून कोसळणारे पाच धबधबे म्हणजे जणू नजाराच! बा. भ. बोरकरांच्या ‘हास खदखदून असा हास दुधसागरा, लासल्या गिरीदरीत फेस फेस पांढरा’ या काव्यपंक्ती अलगद ओठांवर आल्यावाचून राहत नाही.
वाळपई शहरापासून ठाणेमार्गे हिवरे गावात पोहोचल्यावर डोंगराच्या पायथ्याशी वाहने ठेवून अंदाजे तीन कि. मीटरचे अंतर साधारणत: दीड तास पायी चालत जावे लागते. आधुनिकतेचा जराही लवलेश नसलेल्या हिवरे प्रभागातील ३५-४० घरांची वस्ती दिलखुलासपणे सर्वांच्या पाहुणचारास सज्ज असते. पार्किंगसाठी येथे वाहतूक पोलीस नाहीत. जी कोणी गावची मंडळी तिथे असेल ती पार्किंग किंवा दिशादर्शनासाठी सहकार्य करण्यास तत्पर असते.
धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मळलेल्या वाटेचा अंदाज घेत दगड, काट्याकुट्यांतून मार्ग शोधत डोंगरमाथी मार्गक्रमण करावे लागते. मुसळधार पावसामुळे वाट निसरट बनली आहे. प्रखर चढती आणि दरीकडेने गिर्यारोहण करताना छातीत अलगद धडकी भरते. पण समोरून खुणावणार्या शुभ्र धवल धबधब्यामुळे सर्व श्रम क्षणार्धात लुप्त होतात.
गिर्यारोहण करताना सुरुवातीलाच कौलारू घर मिळते ते प्रभाकर गावकर या शेतकरी गृहस्थाने. शेती आणि बागायतीच्या जिवावर प्रपंच चालवणार्या या भोळ्या माणसाच्या डोळ्यात म्हादई अभयारण्यात आपली जमीन गेल्याने सरकार आपणास काय भरपाई देणार याची चिंता सलत असलेली जाणवते तद्वत पावसाळ्यात मुबलक पाणीसाठा देणारा हिवरे उन्हाळ्यात टँकरद्वारे पुरवण्यात येणार्या पाण्यावर अवलंबून राहतो ही समस्या कशी मार्गी लागेल या विचाराने चिंतीत आहे.
वन खात्यात नोकरी करणारे रामचंद्र गावकर आपल्या कुटुंबासोबत डोंगरावर काजू झाडांची लागवड करताना आढळले. त्यांची १२ हजार चौ. मी. जमीन म्हादई राखीव अभयारण्यासाठी गेली आहे. येथे कुंपण घालण्यासाठी सरकारने पूर्वीच डिमार्किंग केले आहे. आपली जमीन अभयारण्य क्षेत्रात जात असूनदेखील ते उमेदीने काजू लागवड करताना आढळले. कुंपण घातल्यानंतर गावकर्यांना राखीव वनक्षेत्रात प्रवेश वर्ज्य असणार आहे. तो लागवड करीत असलेल्या झाडांचा लाभ कदाचित त्याला होणारही नाही. पण वात्सल्य भावनेने, वसुंधरानिष्ठा आणि प्रेमाने सेवा करण्यातच धन्यता मानतात. आपले सर्वस्व गमावणार याची चाहूल असताना जीवनात येणार्या प्रत्येक क्षणाला कसे हसतमुखाने सामोरे जावे याचा ते परिपाठ घालून देतात. या हिरव्या मनाच्या लोकांचा हिवरे गावाचे लोकजीवन संवर्धन करण्यात मोलाचा वाटा आहे.
शिवाजी कोंडेकर आणि अन्य पाच-सहाजण मिळून हिवरे येथे पर्यटनास येणार्यांना गाइड म्हणून मार्गदर्शन करतात. स्वच्छ मनाच्या या गावकर्यांना भेटल्यावर त्यांच्यातील श्रीमंतीचा अंदाज येतो. काजू पिकाच्या मौसमात ही मंडळी दैनंदिन डोंगरमाथ्यावरून हिंडत असते. येथील भौगोलिक रचनेशी ते एकरूप झालेले आहेत. जंगलात सापडणारे हरिण, ससा, साळ, पिसय, शिंगाडी, डुकर, धेपेर, कटांदर, विविध प्रकारचे विषारी, बिनविषारी साप, रंगबिरंगी पक्षी आणि वृक्षवेलींवर फुलणारी मोहक फुले, फांद्याफांद्यांतून लटकणारी फळे म्हणजे पश्चिम घाटाचे वैभव आहे. म्हादई व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित झाले असले तरी येथील लोकांनी प्रत्यक्ष वाघ पाहिलेला नाही. मात्र, गावातील कुत्रे-गुरांचा हे वाघ फडशा पाडत असतात. जंगलातील काम असो, की भटकंती या लोकांचा सच्चा साथीदार असतो तो त्यांचा प्रामाणिक कुत्रा. कोणत्याही हिंस्र जनावराचा हल्ला झाल्यास तो कसा पिटाळून लावायचा याचे गनिमी तंत्र या गावकर्यांनी आत्मसात केले आहे.
पावसाच्या प्रभावाने येथे वाहणारे धबधबे खास करून किशोरवयीन आणि युवा वर्गाला साहसी सहलींसाठी भुरळ घालतात. चतुर्थीनंतर या धबधब्यांचा ओघ कमी होतो आणि गिर्यारोहकांची पावले येथील करडामळ आणि वजरा या पठाराकडे वळतात. करडामळ पठारावर गावचे जागृत सिद्धा देवस्थान आहे. वर्षातून दोन वेळा या देवाचा प्रमुख उत्सव भरतो. या पठारावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा विलोभनीय आनंद लुटण्याची मौज काही औरच असते. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार बरसणार्या पावसात तंबू ठोकून तेथे भोजन बनवून जेवण्यातला आनंदही अद्वितीय असतो.
सातेरी देवी ही गावची आराध्य दैवत आहे. शेती आणि बागायती हेच लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. आयुर्वेदिक वनौषधींचा अभ्यास असलेला जाणकार वर्ग हाच इथला डॉक्टर असल्याने छोट्या छोट्या आजारपणात त्यांना दवाखाना किंवा हॉस्पिटलचे दरवाजे ठोठावे लागत नाहीत. येथे निसर्गाने सढळ हस्ते उधळण केल्याने हिवरे गावाची कीर्ती गोव्याच्या कानाकोपर्यांत पसरली आहे. दर शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने निसर्गप्रेमींची येथे उंचावरून कोसळणार्या धबधब्याच्या धारांमध्ये चिंब भिजून मनसोक्त आनंद लुटण्याच्या उद्देशाने गर्दी उसळते. धबधब्याचे शुभ्र तुषार अंगावर पडताच असे वाटते की –
मन आभाळून आले,
मन चिंब चिंब ओले
चंद्र पुनवेच्या राती
मन धुंद धुंद न्हाले
आठवडाभराचा क्षीण घालवून पुढील आठवड्यासाठी हवा असणारा ऊर्जेचा साठा हे पर्यटक आपल्या डोळ्यात सामावून पूर्ण समाधानाने परतीची वाट धरतात, ते पुन्हा एकदा येथे येण्याच्या निर्धाराने!
………..