हिरव्या बोलीचा शब्द

0
23

विशेष संपादकीय


गुंतलेले प्राण या रानात माझे ।
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोश होता
शब्दगंधे तू मला बाहूंत घ्यावे…
अस्सल ओल्या मातीचा, पिकल्या शेतीचा गावरान सुवास आपल्या कवितेत घेऊन आलेला ना. धों. महानोर नावाचा मराठीतील एक श्रेष्ठ कवी काल आपल्यातून निघून गेला. महानोरांच्या कविता म्हणजे केवळ कोरडे शब्द नसत, तर आशयघन शब्द आणि त्यांच्यासमवेतची त्यांची अंगभूत लय यांच्या अकृत्रिम मिलाफातून किती सुंदर भावकाव्य उलगडू शकते याचे ते अद्भुत दर्शन असे. त्यांच्या रांगड्या, दमदार आवाजात त्यांच्या कविता ऐकणे हा आगळाच आनंद होता. ही वाचायची नव्हे, ऐकायची, अनुभवायची कविता होती. 67 साली ‘मौज’ दिवाळी अंकात त्यांच्या ‘चार कविता रानातल्या’ छापून आल्या आणि या ग्रामीण नव्या कवीच्या कवितेचे गारुड रसिकांवर पडले ते कायमचेच. रत्नपारखी पुलंनी महानोरांचा पत्ता शोधून काढला आणि आवर्जून पत्र लिहिले की ‘तुमच्या कविता वाचल्या आणि नुसतीच दिवाळी नाही, माझं वर्ष साजरं झालं!’ नुसते पत्र लिहूनच ते थांबले नाहीत, तर पुलं. सुनीताबाई आणि बा. भ. बोरकर महानोरांना शोधत अजिंठ्याच्या पायथ्याच्या त्यांच्या पळसखेडला गेले आणि तीन रात्री त्यांच्या कविता ऐकायला थांबले. 68 साली महानोरांचा ‘रानातल्या कविता’ हा संग्रह आला आणि त्यांच्या या ‘राना’तले म्हणजे शेतीतले शब्दांचे पीक तरारून उठले.
या शेताने लळा लाविला असा असा की
सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो…
हा हिरव्या बोलीचा शब्द सदा हिरवागार राहिला. बोरकरांनी ‘सत्यकथे’त लेख लिहून या कवितेची पाठराखण केली. या कवीने केवळ शब्दांचेच मळे फुलवले नाहीत, तर आपल्या शेतीतही तो राबत राहिला. शेतीतले आणि शब्दांचे पीकही घेत राहिला. म्हणू लागला,
मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा
इथल्या मातीमध्ये रुजविल्या चैतन्याच्या बागा
इथले रानोमाळ सघन घन पसरित हिरवी द्वाही
झुलत झुलत मस्तीत बुडाले गाणे आणिक मीही…
साठोत्तरी कविता खरे तर मराठी शारदेच्या दालनेमध्ये नव्या जाणिवा, नवे प्रवाह घेऊन येत होती. महानोर आदिवासी तांड्यांच्या प्रदेशातले, तिथले भजन, कीर्तन, भारूड, प्रवचने, ओव्या, फुगड्या अशा मौखिक साहित्याच्या परंपरेत वाढलेले. तुकाराम, बहिणाई, बालकवींसारखी कविता लिहिता यावी ही त्यांची आस. रविकिरण मंडळाची कवी गिरीश, यशवंतांची कविता त्यांना प्रिय होतीच, पण पाल्हाळात न अडकणारी ना. घ. देशपांडे, बी. रघुनाथ, इंदूरचे कवी भालचंद्र लोवलेकर यांची कविता त्यांना अधिक आपलीशी वाटली. ग्रामीण भागातील सुखदुःखाचे तीव्र अनुभव गाठीला होते, परंतु महानोरांची कविता केवळ ग्रामीण दुःख आळवत बसली नाही. ते आळवतानाच भोवतीची सुंदर निसर्गदृश्येही शब्दांकित करू लागले. आपल्या बोरकरांसारखेच ते उत्कटतेने गाऊ लागले –
पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे
वाऱ्यावर गंधभार, भरलेले ओचे
झाडांतून लदबदले, बहर कांचनाचे,
घन वाजत ये थेंब अमृताचे..
महानोरांच्या कवितेतली शब्दकळाही फार सुंदर आहे. वेल्हाळ, सैराट, बाजिंदी, दिवठणी, सन्नाट, माल्हन असे शब्द त्यांच्या कवितांमध्ये सहजपणे मोत्यांसारखे ओघळतात. म. सु. पाटील यांनी त्यांच्या कवितांविषयी म्हटले आहे, “या कवितेने मन तुडुंब भरून येते, पण त्या तुडुंबल्या मनाला शब्दांत वाट करून देणे अवघड जाते. ती फक्त वाचावी, वाचून दाखवावी, ऐकावी, ऐकवावी..” महानोरांची ही ताज्या टवटवीत शब्दकळेची कविता रसिकांना वेड लावून गेली. इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात रसिकाग्रणी यशवंतराव चव्हाणांनी ती ऐकली आणि ‘इतकी चांगली खेड्यातली शेतकऱ्यांची कविता लिहिणारा कवी मला माहीत कसा नाही?’ म्हणत त्यांना शोधत गेले. ते ऋणानुबंध पुढे दीर्घकाळ कायम होते. निसर्ग, प्रेम, स्त्री यांना लपेटून येणारी कविता काळाच्या ओघात टिकणार नाही अशी बोचरी टीका समीक्षकांनी महानोरांवर केली, परंतु या कवितेतल्या ‘फुलांत न्हाल्या ओल्या पहाटे’च्या क्षितिजावर कीर्तीचा चंद्र झुलत राहिला. महानोरांची कविता टिकली आणि तिची मोहिनी आजही कायम आहे.
महानोरांच्या कवितेतील गेयतेमुळे त्यांना गोनिदांच्या कथेवरील ‘जैत रे जैत’साठी गीतलेखन करण्याचा सुयोग आला. ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’, ‘आमी ठाकर ठाकर’, ‘मी रात टाकली’, ‘नभ उतरू आलं’ वगैरे त्यातली गाणी हा तर आता इतिहास बनला आहे. अनेकदा गीतकाराला कवीपेक्षा अकारण दुय्यम गणले जाते, पण शेतीत जसे आंतरपिक असते, तसे गीत व कविता यांचे जवळचे नाते आहे असे महानोर म्हणत असत. राजकारणामध्येही विधानपरिषदेचे आमदार म्हणून काम करण्याची संधी त्यांना त्यांच्या कवितेने मिळवून दिली. शेतकऱ्यांच्या दुःखाला, व्यथा, वेदनांना त्यांनी कवितेतून तर वाचा फोडलीच, परंतु विधिमंडळातही त्यावर आवाज उठवला. आपल्या शेतकरी बांधवासाठी कमी पाण्यातील शेतीवरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. ‘प्रार्थना दयाघना’ मधून सामाजिक विषमता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले आहेत. स्वतः त्यांनाही काही कमी दुःख भोगावे लागले नाही, परंतु ‘मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले’ असे म्हणत ते कवितेतून सांगत राहिले,
डोळे गच्च अंधारून तेव्हा माझे रान
रानातली झाडे मला फुले अंथरून…
कविता हा त्यांच्या दुःखावरचा उतारा होता. म्हणून हा कवी म्हणून गेला,
‘अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो
अन्‌‍ उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो..’
अमृताचे हे कुंभ आता मात्र रिते रितेच राहतील…