हिट-अँड-रन प्रकरणीटेम्पोचालकाला अटक

0
9

म्हापसा पोलिसांची आजरा येथे कारवाई

मयडे-बार्देश येथील हिट-अँड-रन प्रकरणात म्हापसा पोलिसांनी अपघातास कारणीभूत टेम्पोचालकाला आजरा-कोल्हापूर येथून काल अटक केली. रोहन सूर्यकांत पाटील (30) असे टेम्पोचालकाचे नाव आहे. या अपघातात सुरक्षारक्षक जॉनी अँथोनीओ याचा मृत्यू झाला होता.
सदर अपघातानंतर घटनास्थळावर कोणताही प्रत्यक्षदर्शी नसल्याने आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या कसून तपासामुळे अखेर संशयिताचा शोध घेण्यात यश आले. म्हापसा पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुार, पोलिसांनी विविध मार्गांनी तपास सुरू ठेवत घटनास्थळाच्या परिसरातील नागरिकांची चौकशी केली. तसेच त्या वेळेत या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची माहिती गोळा करण्यात आली. तपासादरम्यान अपघातास कारणीभूत असलेले वाहन हे पहाटे कोंबड्यांची वाहतूक करणारा मालवाहू टेम्पो असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून संबंधित चालकाचा शोध घेतला. आरोपीची ओळख आजरा-कोल्हापूर येथील रहिवासी रोहन सूर्यकांत पाटील अशी पटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली असून, अपघातातील टेम्पोही जप्त करण्यात आला आहे.