हिंस्त्र जातीचे श्वान पाळण्यावर बंदी घालणारे ‘गोवा प्राणी प्रजनन आणि पाळीव प्राणी (नियमन आणि भरपाई) विधेयक’ गोवा विधानसभेत काल 31 विरुद्ध 6 मतांनी मंजूर करण्यात आले.
पशुंसवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी हे विधेयक विधानसभेत चर्चेसाठी सादर केले. या विधेयकातील काही त्रुटी विरोधी आमदारांनी निदर्शनास आणून दुरुस्तीची मागणी केली. तथापि, विरोधकांच्या त्रुटी बाजूला ठेवून सत्ताधारी गटाने विधेयक मंजूर केले. गत वर्षभरात राज्यात हिंस्त्र श्वानांनी हल्ला केल्याने काही जणांना प्राण गमवावे लागले होते, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे सरकारने हिंस्त्र श्वान पाळण्यावर निर्बंध घालण्यासाठी हे विधेयक तयार करून संमत करून घेतले आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.
याशिवाय राज्य विधानसभेत गोवा दावे मूल्यांकन विधेयक 31 विरुध्द 6 मतांनी काल मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे विधेयक सादर केले. विरोधी आमदारांनी या विधेयकामध्ये त्रुटी असल्याने त्याला विरोध करून दुरूस्तीची मागणी केली; मात्र विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली.

