राज्यात किती जणांकडे बंदी घातलेल्या रोटविलर व पिटबुल या हिंसक जातींचे श्वान आहेत, त्याची नोंदणी करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. सध्या गोव्यात किती जणांकडे या जातींचे श्वान आहेत याची सरकार दरबारी कोणतीही नोंद नाही, असे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले. या श्वानांवरील बंदी कायदा आता लागू झालेला असून, त्यामुळे सध्याच्या अध्यादेशात आता दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वरील जातीच्या श्वानांना मोकळे सोडणाऱ्या मालकांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच हे श्वान कुणाला चावले तर मालकांना शिक्षा तर होणार आहेच. शिवाय पीडितांवरील उपचारासाठीचा सगळा खर्च श्वानमालकाला करावा लागणार असल्याचे हळर्णकर म्हणाले.