सव्वीस नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर बदला घेण्याचा विचार आपल्या मनात येऊन गेला होता, परंतु तेव्हा अमेरिकेच्या दबावामुळे तत्कालीन यूपीए सरकार त्यापासून परावृत्त झाले, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नुकताच एका मुलाखतीत केला आहे. सतरा वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेवर, तेव्हा दाखवल्या गेलेल्या नाकर्तेपणासंदर्भात इतक्या वर्षांनी हा गौप्यस्फोट करून चिदंबरम यांनी एका अर्थी आपल्या तत्कालीन सरकारचा आणि पर्यायाने काँग्रेस पक्षनेतृत्वाचा कमकुवतपणाच अधोरेखित केला आहे. पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेल्यानंतर आता हे वरातीमागून घोडे नाचवण्याचा त्यांचा हेतू काय नकळे, परंतु ऑपरेशन सिंदूर संस्थगित करीत पाकिस्तानशी गेल्या दहा मे रोजी युद्धविराम केल्याबद्दल एकीकडे राहुल गांधींसह यच्चयावत काँग्रेस नेतृत्व विद्यमान मोदी सरकारवर तुटून पडत असताना चिदंबरम यांची ही कबुली पक्षासाठी खचितच अडचणीची ठरणारी आहे. मुंबईवरील हल्ल्यावेळी देशात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होते. शिवराज पाटील केंद्रीय गृहमंत्री होते. एकीकडे मुंबईत मृत्यूचा सडा पाडला जात असताना शिवराज पाटील दिवसातून तीनवेळा कपडे बदलताना दिसले. संपूर्ण देशातून टीकेची झोड उठली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हा अर्थमंत्री असणाऱ्या चिदंबरम यांना गृहमंत्रिपद दिले गेले. आपल्याला अर्थमंत्रालय सोडायचे नव्हते, कारण आपण तोवर पाच अर्थसंकल्प सादर केलेले होते, परंतु सामूहिक निर्णयापुढे आपल्याला मान तुकवावी लागली असेही चिदंबरम यांनी मुलाखतीत म्हटले आहे. मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांचा निर्णय झाल्याने निरुपाय झाल्याने आपल्याला गृहमंत्रिपद पत्करावे लागले असे त्यांना त्यातून सुचवायचे आहे. परंतु तेवढ्यावर ते थांबलेले नाहीत. आपण गृहमंत्रिपद स्वीकारल्यानंतर दोन तीन दिवसांतच अमेरिकेच्या तत्कालीन विदेशमंत्री कोंडोलिसा राईस भारतात आल्या. त्या आपल्याला व पंतप्रधानांना भेटायला आल्या आणि त्यांनी मुंबईवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका अशी तंबी दिल्याची कबुलीही चिदंबरम यांनी दिली आहे. मुंबईवरील हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार आपल्या मनात तरळला होता, परंतु संपूर्ण जगातून तेव्हा भारतावर बदला न घेण्यासाठी दबाव आलेला होता असे चिदंबरम म्हणत आहेत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय दबावापुढे आणि त्यातही अमेरिकेपुढे तत्कालीन काँग्रेस सरकारने तेव्हा साफ लोटांगण घातले होते ह्याची ही कबुलीच चिदंबरम यांनी सदर मुलाखतीत दिली आहे. मग ट्रम्प यांच्या दबावामुळे युद्धविराम स्वीकारल्याचा आरोप करीत मोदी सरकारला हिणवण्याचा अधिकार काँग्रेसला कसा काय पोहोचतो? मुंबई हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार आपल्या मनात तेव्हा येऊन गेला होता असे जरी चिदंबरम आता एवढ्या वर्षांनंतर म्हणत असले, तरी तशा प्रकारचे एकही वक्तव्य त्यांनी आजवर ना कधी केले होते, ना कधी तसे सूचित केले होते. आता सत्ता हातून गेल्यावर आणि राजकीय विजनवासात फेकले गेल्यावर त्यांना ही उपरती झालेली दिसते. चिदंबरम यांच्याकडे देशाचे गृहमंत्रिपद होते. असा बदल्याचा विचार जर त्यांच्या मनात आला असता तर किमान तो बोलून दाखवण्यापासून त्यांना कोणी रोखले होते? तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची एकूण कार्यपद्धती पाहिली तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या इशाऱ्यावाचून त्यांच्या सरकारचे पानही हलत नव्हते. सरकारचे मोठमोठे निर्णय हे सोनिया गांधींच्या संमतीनंतरच कसे घेतले जात असत त्यावर अनेक प्रत्यक्षदर्शींनी आजवर लिहिले आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा आजच्यापेक्षा कितीतरी पटींनी कमकुवत होती. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या दडपणाला भीक न घालता धडक प्रत्युत्तर देण्याची सुतराम शक्यता तेव्हा नव्हती. त्यामुळे उगाच आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते अशा धर्तीची विधाने चिदंबरम यांनी करू नयेत. ना तत्कालीन सरकारपाशी पाकिस्तानला लष्करी प्रत्युत्तर देण्याची धमक होती, ना त्यासाठी आवश्यक असलेला आंतरराष्ट्रीय पाठिंबा. त्यामुळे चिदंबरम यांचे हे वक्तव्य निव्वळ स्वप्नरंजन ठरते. तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने आंतरराष्ट्रीय दबावापुढे व अमेरिकेपुढे लोटांगण घातले होते हाच मथितार्थ त्यांच्या ह्या गौप्यस्फोटातून निघतो. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पाहिल्यास उरी हल्ल्यानंतरचे सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यानंतरची बालाकोटची कारवाई आणि पहलगाम हल्ल्यानंतरचे ऑपरेशन सिंदूर मोदी सरकारच्या पाकिस्तानसंदर्भातील कणखर नीतीलाच उजाळा मिळतो आणि ट्रम्प यांच्या दबावामुळे युद्धविराम पत्करला म्हणून टीकेची राळ उठविणाऱ्यांचा दांभिकपणाही उघडा पडतो.

