मतदारांनी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजपला विजयी केल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपचा ‘स्ट्राईक रेट’ हा तब्बल 80 टक्के एवढा राहिला. याउलट उत्तर गोवा जिल्हा पंचायत असो किंवा दक्षिण गोवा जिल्हा पंचायत असो दोन्हीकडे काँग्रेस पक्षाला दुहेरी संख्या गाठता आली नाही. काँग्रेस पक्षाचा हा दारूण पराभव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागांतील जनतेने या निवडणुकीत भाजपला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे दोन्ही जिल्हा पंचायतींवर आता भाजपचा झेंडा मोठ्या दिमाखात फडकणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मते मिळून पुन्हा एकदा आमचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचे संकेत या निकालातून मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणुकांत ईव्हीएममुळेच भाजपचा विजय होत असतो असा जो आरोप विरोधकांकडून होत असतो, त्याला जनतेने या निवडणुकीतून चोख उत्तर दिले असल्याचे सांगताना मतपत्रिकेवर झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी भाजपला घवघवीत यश मिळवून दिल्याने आता विरोधकांची तोंडे बंद झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकात भाजपला मिळालेला विजय हा केंद्रातील एनडीएचा विजय असल्याचे सांगतानाच गोवा सरकारने राबवलेल्या लोकाभिमुख योजनांमुळेही मतदारांनी भाजपला भरभरून मते दिल्याचे त्यानी स्पष्ट केले. गोवा सरकारची ‘माझे घर’ योजना राज्यातील लोकांना खूप आवडल्याचेही त्यांनी सांगितले.

