– देवेंद्र वालावलकर
विन्सन वर्ल्डने सलग सहा वर्षे गोवा मराठी चित्रपट महोत्सव यशस्वी करून दाखवला. महोत्सव यशस्वी करून दाखवण्यात विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये आणि सहकार्यांचे परिश्रम आहेतच, शिवाय मराठीप्रेमींचा असणारा पाठिंबा तेवढाच महत्त्वाचा आहे. राज्यात मराठीप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना एकत्र आणून त्यांची सांस्कृतिक भूक भागवणारे उपक्रम असतील तर त्याला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद लाभतो, हे गोवा मराठी चित्रपट महोत्सवाने दाखवून दिले आहे.
छोट्या पडद्यावरील आशयघन मराठी मालिका आणि चित्रपट पाहणार्या गोमंतकीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या पडद्यावर मराठी चित्रपट पाहण्याची संधी गोमंतकीयांना क्वचितच मिळते. हौस असली तरी मुंबई, पुण्यात जाऊन मराठी चित्रपट पाहणे सर्वांनाच ‘परवडेबल’ नसते. नेमकी हीच पोकळी भरून काढून मराठीप्रेमींची सांस्कृतिक भूक भागवण्याचे काम विन्सन वर्ल्डच्या ‘गोमचिम’ने केले आहे.
यंदाच्या सहाव्या ‘गोमचिम’ला पहिल्या पाच महोत्सवांप्रमाणेच प्रतिसाद लाभला. पाच वर्षांतील रसिकांच्या प्रतिसादाने हुरूप वाढलेल्या आयोजकांनी यंदा महोत्सवाला अनेक नवीन गोष्टी जोडल्या. चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरू करणारी शॉर्ट फिल्म स्पर्धा हे यंदाच्या ‘गोमचिम’चे वैशिष्ट्य ठरले. इफ्फीत होणारी शॉर्ट फिल्म स्पर्धा बंद झाल्याने युवा चित्रपट निर्मात्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नव्हती. ‘गोमचिम’ने ती उणीव भरून काढली. त्याला मिळालेला प्रतिसादही उत्तम होता. ४७ प्रवेशिकांपैकी ३६ प्रवेशिका गोमंतकीयांच्या होत्या. ही आकडेवारी पाहिल्यास चित्रपटसृष्टीचा भाग बनू पाहणारे प्रतिभावंत युवक व्यासपीठाच्या शोधात आहेत, असेच म्हणावे लागेल. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यातून चित्रपटसृष्टीला घडवणारी मंडळी मिळतात, हे ‘गोमचिम’ने यावेळी दाखवून दिले.
देशात आणि विदेशात चित्रपट महोत्सवांचे आयोजन होत असते. या महोत्सवात भाग कसा घ्यायचा, चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ कसे उभे करायचे, सरकारी योजना काय आहेत, याची माहिती करून देण्यासाठी ‘गोमचिम’तर्फे यंदा प्रथमच मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ कार्यशाळेत सहभागी प्रत्येकालाच झाला. पुरुषप्रधान चित्रपटसृष्टीत महिला उमटवत असलेल्या ठशाची दखल ‘गोमचिम’ने घेतली. एका नव्या उपक्रमाला सुरुवात करून आयोजकांनी पुढच्या वर्षीचा ‘गोमचिम’ कसा असेल, याची झलक दाखवली.
इफ्फीत झळकणार्या मराठी चित्रपटांवेळी उपस्थित असणार्या तारे-तारकांना रेड कार्पेटचा सन्मान मिळतो. यंदा ‘गोमचिम’च्या आयोजकांनी महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना रेड कार्पेटचा सन्मान दिला. छोट्या पडद्यावर झळकणारी मंडळी कला अकादमीतील रेड कार्पेटवरून अवतरत असताना त्यांच्याशी संवाद साधण्याची एकही संधी रसिक सोडत नव्हते.
विक्रम गोखले, उषा जाधव, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम, अंकुश चौधरी, मृणाल कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, संदीप कुलकर्णी, स्वप्निल जोशी, पल्लवी जोशी, सुनील सुखटणकर, सुमित्रा भावे, क्रांती रेडकर, श्रीरंग गोडबोले, सुबोध भावे, मनवा नाईक, पुष्कर श्रोत्री, आदेश बांदेकर, सई ताम्हणकर, गिरीश कुलकर्णी, वृंदा अहिरे, शिवाजी पाटील, जितेंद्र जोशी, वैभव मांगले, शुहुरूद गोडबोले, निखिल महाजन, सुशांत शेलार आदींसह मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे सर्व तारे-तारका महोत्सवासाठी आवर्जून उपस्थित होत्या. या सर्व मंडळींना रेड कार्पेटवरून चालत येताना पाहून अनेक चित्रपट रसिकांची मने तृप्त झाली. ‘गोमचिम’मुळे एवढे सर्व कलाकार एकत्र पाहण्याची संधी मराठी चित्रपटप्रेमींना सलग सहा वर्षे मिळत आली आहे.
श्रुती मराठे, संदीप कुलकर्णी, पल्लवी सुभाष, लोकेश गुप्ते अभिनित ‘प्रेमसूत्र’ या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ झाला. त्याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्व्हेसमेंट’, सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘संहिता’, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनुमती’, निखिल महाजन दिग्दर्शित ‘पुणे ५२’, मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रेम म्हणजे प्रेम असते’, श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित ‘चिंटू २’, रवी जाधव दिग्दर्शित ‘बीपी’, सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट’, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आजचा दिवस माझा’, संजीव कोलते दिग्दर्शित ‘तानी’, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘कोकणस्थ’, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘पोस्टकार्ड’, संदीप नवरे दिग्दर्शित ‘लंगर’ तसेच गोमंतकीय निर्माते ज्ञानेश गोवेकर यांचा पु. ल. देशपांडे यांच्या म्हैस कथेवर आधारित ‘चांदी’ हा चित्रपट दाखवण्यात आला. गजेंद्र अहिरे यांच्या ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटाचा प्रिमिअर शो समारोप सोहळ्यादिवशी झाला.
यंदाच्या ‘गोमचिम’मध्ये दाखवल्या गेलेल्या प्रत्येक चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला. ‘पोस्टकार्ड’, ‘दुनियादारी’ आणि ‘लंगर’ या चित्रपटांचे प्रिमिअर महोत्सवात करण्यात आले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महोत्सवाबरोबर मराठी चित्रपटांचे प्रिमिअरदेखील गोव्यात व्हायला हवेत अशी अपेक्षा उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली होती. आयोजकांनी त्याची पूर्वीच पूर्तता करून ठाकरे यांना सुखद धक्काच दिला. गोव्यातला महोत्सव महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय होऊ लागला आहे. विन्सन वर्ल्डचे सर्वेसर्वा संजय शेट्ये आणि सहकार्यांवर आमचा चित्रपट ‘गोमचिम’मध्ये दाखवा असा दबाव वाढू लागला आहे. यंदाही अनेकांना जड मनाने नकार देण्याची वेळ आयोजकांवर आली.
महोत्सवात यंदा दाखवण्यात आलेले सर्वच चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरले. तीन दिवसात १५ चित्रपट पाहण्याची कसरत करावी लागत असल्याने आयोजकांनी महोत्सव आणखी एखाद्या दिवसाने वाढवावा, अशी मागणी यंदा अनेक प्रतिनिधींनी आयोजकांकडे केली आहे. आयोजकांनी प्रतिनिधींच्या या मागणीची दखल घेतली असून यापुढील महोत्सवात एखादा दिवस वाढवता येणे शक्य आहे की नाही, यावर जरूर विचार केला जाईल, असे विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी कदाचित महोत्सवाचा एखादा दिवस वाढलेला रसिकांना पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.
‘गोमचिम’च्या उद्घाटनाला बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना निमंत्रित करण्याचा आयोजकांनी बराच प्रयत्न केला. सुरुवातीला हे उभयता महोत्सवाला येणार, अशी चर्चा सुरू झाल्याने यंदाचा महोत्सव आगळावेगळा ठरेल, असे रसिकांना वाटत होते. मात्र नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या बिग बीला ‘गोमचिम’साठी वेळ देता आला नाही. त्यामुळे बिग बीचे चाहते थोडेसे नाराज झाले.
मराठी चित्रपट महाराष्ट्रात बनतात आणि महाराष्ट्राबाहेर गोव्यात सलग सहा वर्षे मराठी चित्रपट होतो याचे अप्रूप महोत्सवात सहभागी होणार्या प्रत्येक कलाकाराला वाटत असल्याचे जाणवून आले. प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंची प्रतिक्रिया एकदम बोलकी आहे. महाराष्ट्राला जमला नाही असा महोत्सव आयोजित करून गोव्याने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मने जिंकली. चित्रपटांची निवड, नेटके आयोजन आणि त्याला कलाकार तसेच रसिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहिला तर हा महोत्सव यापुढेही १०० वर्षे सुरूच राहील, असे अहिरे यांना वाटते.
कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी मराठी चित्रपटप्रेमींच्या मनातील बॉलिवूडबाबत असलेली खदखद बोलून दाखवली. मांद्रेकर यांनी बॉलिवूडचे चित्रपट कसे भरकट चालले आहेत, याची उदाहरणे देऊन मराठी चित्रपटच दर्जेदार आणि आशयघन असल्याचे सांगितले. बॉलिवूडकडे नवीन देण्यासारखे काहीच नसते. त्यामुळे ‘मर्डर १’, ‘मर्डर २’, मर्डर ३’ सारखे तेच तेच सिनेमा त्यांना काढावे लागतात. मराठी चित्रपट हे आशयघन आणि कौटुंबिक मनोरंजन करणारे असतात. बॉलिवूडमधील त्याच त्याचपणाला कंटाळून आपण सध्याचे हिंदी चित्रपट पाहतही नसल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत तरुणांचा वावर जास्त असून ही समाधानकारक बाब असल्याचे सांगायला मांद्रेकर विसरले नाहीत.
यापुढचा महोत्सव राजधानी पणजीबरोबरच मडगाव, वास्को, म्हापसा यांसारख्या ठिकाणीही आयोजित करण्याचा आयोजकांचा मनोदय आहे. तसे झाल्यास महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद वाढेल हे निश्चित. उद्घाटनात उद्धव ठाकरे यांनी गोव्यात चित्रपटनगरी उभारण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. समारोप सोहळ्यात कला अकादमीचे अध्यक्ष तथा गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष असलेले विष्णू वाघ यांनी ठाकरे यांच्या आवाहनाची दखल घेऊन तीन ते चार वर्षांत चित्रपटनगरी उभारण्याचा प्रयत्न करण्याचे दिलेले आश्वासन महोत्सवाचे आश्वासक असेच आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले यांना यंदाचा कृतज्ञता पुरस्कार सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते देण्यात आला. गोमंतकीयांच्या प्रेमात राहणे पसंत असलेल्या विक्रमजींनी गोव्यातील कलाकारांना वर्षातून तीन ते चार वेळा मार्गदर्शन करण्यासाठी गोव्यात येण्याची तयारी दाखवली असून या संधीचे सोने करण्याची संधी गोमंतकीयांना ‘गोमचिम’मुळेच प्राप्त झाली आहे.
मराठी संदर्भातील इव्हेंटना म्हणावे तसे प्रायोजकांचे आर्थिक पाठबळ लाभत नाही, अशी सार्वत्रिक तक्रार आहे. विन्सन वर्ल्डने मात्र हा सार्वत्रिक सूर खोटा ठरवून दाखवला. एखादा इव्हेंट उत्तम पद्धतीने आयोजित केला तर त्याला मिळणारे प्रायोजक दरवर्षी वाढतच जातात, हे विन्सन वर्ल्डने सलग सहा वर्षे दाखवून दिले आहे. मराठीचे इव्हेंट करणार्यांनी त्यापासून बोध घेतल्यास बरेच काही शिकता येऊ शकेल. यंदाच्या ‘गोमचिम’चे वामन हरी पेठे हे मुख्य प्रायोजक होते. कला व संस्कृती खाते, कला अकादमी, गोवा मनोरंजन संस्था, आयनॉक्स, मर्सिडीज बेन्झ, क्युबे डिजिटल सिनेमा, ओ कोकेरो, ग्रॅण्ड हयात, राज ग्रुप, मॅगसन्स, प्लॅनेट गोवा, द मांडवी, काटापुलट, गोवा पर्यटन खाते, विश्व संजीवनी, ९२.७ बिग एफ एम, हॉटेल फिदाल्गो यांचे सहकार्य महोत्सवाला लाभले.
महोत्सव यशस्वी करून दाखवण्यासाठी विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये, ज्ञानेश मोघे, उदय म्हांबरे, परेश जोशी, श्रीपाद शेट्ये, सिद्धेश म्हांबरे, अजय शिरोडकर, ललिता जोशी, दुर्गेश आंगले, श्याम च्यारी, धनू डिचोलकर, राजन राणे, केतकी साळकर व सहकार्यांनी तीन महिने घेतलेले कष्ट यंदाही सार्थकी लागले, असेच म्हणावे लागेल.
अनेक अर्थाने ‘गोमचिम’ ही मराठीची चळवळच म्हणावी लागेल. मराठी आणि कोकणीप्रेमींनी हा महोत्सव यशस्वी करून दाखवला आहे. दोन्ही भाषाप्रेमींमधील ऋणानुबंध अधिक दृढ करणारा हा महोत्सव भविष्यात गोव्याचे सांस्कृतिक वैभव ठरल्याशिवाय राहणार नाही.