– सतीश एस. पी. तेंडुलकर
(कृषी संचालक)
उन्हाळी पिकांमध्ये आंबा, काजू, फणस हे गोव्याचे वैशिष्ट्य. आंबा आणि काजू त्यांमध्ये विशेष. गोव्याच्या मानकुराद आंब्याला तर तोडच नाही. त्याचप्रमाणे गोव्याच्या काजू चवदार म्हणून जगभर ओळखल्या जातात. गोव्याच्या काजूला आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष दर असतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे, काजूपिकाची लागवड गोव्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने केली जाते. त्याचबरोबर काजू झाडावर पूर्ण पक्व झाल्यावरच गोळा केल्या जातात. या गुणामुळेच काजूकडे गोव्याच्या ग्रामीण भागामध्ये एक महत्त्वाचे रोख पीक म्हणून पाहिले जाते. या पिकावर गोव्याची ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
पण हल्लीच्या वर्षांत काजूपिकाबद्दल अनिश्चिततेचे सावट वाढत आहे. कधीकधी काजूचे उत्पन्न चांगले असणार असे जरी वरवर दिसत असले तरी प्रत्यक्ष वेगळेच घडते आहे. गेल्या वर्षी (२०११) काजूचे उत्पन्न चांगले होते. बाजारदर पण चांगला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता खूष होती. त्याउलट या वर्षी उत्पन्नाविषयी काजू बागायतदार अजून साशंक आहे. २००९ साली पण उत्पन्न सरासरी चांगले होते. उत्पन्नात तफावत आली की ग्रामीण भागातले कोष्टक घसरते. मग सगळेजण म्हणतात, हा हवामान बदलाचा परिणाम!
आंब्याचे पण तसेच आहे. आंबा तर सध्या नारळ-सुपारीपेक्षा एक चांगले पीक झालेले आहे. शंभरेक आंबे मिळाले तरी एक हजार रुपये होतात. नारळाचे फार तर ५०० रुपये मिळतात. गेल्या वर्षी २०११ साली आंब्याचे चांगले पीक आले. या वर्षी जेमतेम ३५-४० टक्के उत्पन्नाची अपेक्षा आहे. तेसुद्धा पाऊस लवकर आला तर सगळं परत कोलमडणार.
काजू किंवा आंबा ही दोन्ही पिके साधारण नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान मोहोराला येतात. काजूपीक थोडं अगोदरच मोहोराला येतं. ही दोन्ही पिके पावसाळा थांबल्यावर जमिनीची आर्द्रता कमी झाली की फुलायला सुरुवात होते. वास्तविक या झाडांच्या फांदीमध्ये मोहोराच्या पेशी पावसाळ्यातच तयार झालेल्या असतात. पण त्याचे मोहोरात रूपांतर होऊन प्रकट व्हायला पाऊस बंद होऊन जमिनीची आर्द्रता कमी व्हायला पाहिजे. ऑक्टोबरच्या गरमीमध्ये हे घडते आणि नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान मोहोर फुटू लागतो. जर पाऊस सतत पडत राहिला तर झाडाच्या पालवीची वाढ चालू राहते आणि मोहोर कमी येतो. काजूसाठी साधारण पावसाविना १५ दिवस गेले तर मोहोर फुटू शकतो, पण आंब्याच्या बाबतीत साधारण दीड महिना पावसाविना जावा लागतो. पाऊस संपल्याबरोबर थोडी गरमी असते व त्यानंतर थंडीचा मोसम सुरू होतो. थंडीच्या मोसमामध्ये हवेतील आर्द्रता अजून कमी झाल्यामुळे मोहोर वाढतो व त्यावर पिकाचे प्रमाण अवलंबून असते.
थंडीमुळे मोहोर फुटला म्हणून उत्पन्न चांगले येणार याची शाश्वती नसते. या फुलांना रोग आणि किडींपासून भीती असतेच. दमट हवामान, कमी तापमान अशा स्थितीत काजूवर टी मोस्किटो व थ्रीपस या कीटकांचा प्रादुर्भाव होतो, तर आंब्यामध्ये मावा, तुडतुडे या कीटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा वेळी औषध फवारणी करणे गरजेचे असते. काजूचे उत्पन्न जर सेंद्रिय बागायती नसेल तर क्लोरोपायरीफॉस हे औषध १० लि. पाण्यामध्ये २० मि.लि. या प्रमाणात मिसळून ते फवारले तर या टी मोस्किटो किडीचा बंदोबस्त होऊ शकतो. आंब्यामध्येसुद्धा हे औषध फवारले तर त्यामुळे तुडतुडे, मावा या कीटकांचा बंदोबस्त होऊ शकतो.
याच वेळी काजू-आंब्यावर भुरी रोग तयार होतो. त्यामुळे पण आलेला मोहोर वाळून जातो. त्यासाठी पाण्यात विरघळणारा गंधक २ मि.लि. एक लीटर पाण्यात मिसळून फवारला तर हा रोग कमी होतो. गंधकाशिवाय इतर रोगप्रतिकारक औषधे जशी कारबेंडाझिम, केराथेन वगैरे वापरता येतात. जर बागायती सेंद्रिय पद्धतीची असेल तर कडुनिंबाचे अर्क किंवा इतर सेंद्रिय औषधे फवारावी लागतील. याशिवाय फलधारणा झाल्यानंतर फळांची गळती कमी करण्यासाठी ग्रोथ हारमोन्स मिळतात, त्याचा पण वापर करता येतो.
काजूच्या बाबतीत, काजू फुलण्याच्या अगोदर जर द्रवरूप खत फवारणी केली तर त्यापासूनसुद्धा चांगल्या प्रमाणात फलधारणा होते. याशिवाय फलधारणा होते वेळी पाण्याचा फवारा जरी मारला तरी काजू उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसते.
वास्तविक काजू आणि आंबा हे दर दोन वर्षांतून एकदाच चांगले उत्पन्न देतात. आंब्यामध्ये हे जास्त प्रकर्षाने दिसते, तर काजूमध्ये त्याचा तेवढा फरक दिसत नाही. गोव्यामध्ये हल्ली कलमांद्वारे काजूची भरपूर लागवड झालेली आहे. या जाती व्यवस्थित खतपाणी केले तर नक्कीच चांगले उत्पन्न देतात. त्याचबरोबर एकच काजूची किंवा आंब्याची जात लावून चालत नाही. थोडीशी विविधताही हवीच. काजूचे सर्वसाधारण पीक जर कमी असेल तर झाडाला मोहोर आल्यानंतर आठवड्यातून साधारण १००-१५० लीटर पाणी दिले असता उत्पन्नामध्ये १५-२० टक्के वाढ होते.
आता काजू किंवा आंबा यांकडे हे एक व्यापारी पीक या दृष्टिकोनातून पाहिले जाते. अशा वेळी जर पीक एकदमच निकामी गेले तर शेतकर्याचे किंवा कंत्राटदाराचे फार आर्थिक नुकसान होऊ शकते. हल्लीच्या आठ-दहा वर्षांत हवामानामध्ये फारच जलद बदल घडत आहे. २००८ साली मार्चमध्ये भरपूर पाऊस झाला. ऑक्टोबर २००९ मध्ये काणकोण, सांगे या भागांत पूर आले. २०१० मध्ये मार्च महिन्यात एकदम गरमी वाढून छोटे आंबे गळून पडले. २०११ मध्ये चांगला मोहोर आला व भरपूर पीक आले. २०१२ मध्ये सध्या फार कमी पीक आहे. असे हे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे चित्र आपल्यासमोर येत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी काय होईल हे एवढ्यात सांगणे फार कठीण आहे. म्हणून सध्या हवामानावर आधारीत पीक विमा योजना मूळ धरू लागली आहे.
या हवामानावर आधारीत पीक विमा पद्धतीमध्ये ज्या हवामानाच्या प्रमुख घटकांवर पीक अवलंबून असते, त्या घटकांचे प्रमाण निश्चित करून विमा केला जातो. यामध्ये जर त्या घटकाच्या प्रमाणामध्ये चढ-उतार झाला तर शेतकर्याला विम्याची भरपाई द्यावी लागते. उदा. काजू पिकाला मोहोर येतानाच जर पाऊस पडला तर पिकामध्ये घट होते. हे जर निश्चित असेल तर ५ मि.मी. पाऊस जर नोंद झाला तर त्या विमाधारकाला दर हेक्टरी १०,००० रुपये (पूर्वनिश्चित केल्याप्रमाणे) द्यावे लागणार. जर दोन दिवस सलग ५ मि.मी.च्या पेक्षा जास्त पाऊस झाला तर रु. २०,००० द्यावे लागणार व जर तीन दिवस सलग ५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला तर रु. ३०,००० विमा भरपाई द्यावी लागणार. दुसरे उदाहरण आंब्याचे. यामध्ये जर एखादे दिवशी तापमान ३८ डि.सें.च्या पुढे गेले तर रु. १० हजार विम्याची भरपाई, जर तापमान ३९ डि.सें.च्या पुढे गेले तर प्रत्येक डिग्री वाढीव तापमानाला रु. १० हजारप्रमाणे जास्तीत जास्त हेक्टरी साठ हजार रुपयेपर्यंत विमा भरपाई घ्यायची. अशा पद्धतीने हवामानावर आधारीत पीक विमा करता येतो. यामध्ये प्रत्येक प्रमुख जागांवर हवामान यंत्रे ठेवण्याची गरज असते. सध्याचे बदलते पावसाचे चित्र, हवामानबदल बघितल्यानंतर आपल्याला काजू, आंबा पिकांसाठी हवामानावर आधारीत पीक विमा करण्याची अत्यंत गरज भासू लागली आहे.