Home बातम्या हरवलेले गोयकारपण

हरवलेले गोयकारपण

0

कॅजिटन परेरा

मुक्त गोव्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. येथील लोकांच्या ध्यानी येऊ लागले की आपला प्रिय गोवा पार बदलून गेला आहे. पोर्तुगिजांचे जोखड झुगारून गोयकारांनी काय मिळविले असले… तर फक्त स्वातंत्र्य! बोलण्या-फिरण्याचे स्वातंत्र्य! जाहीरपणे कधीही न बोलता येणार्‍या राजकारण्यांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य गोयकार गेली पन्नास वर्षे अनुभवीत आहेत व त्यावरच ते खूष आहेत. हवे ते बोलणे म्हणजेच स्वातंत्र्य, अशी गोयकारांची आजची धारणा आहे. वृत्तपत्रातून आलेली टिप्पणी वाचून तो इतर गोयकारांना म्हणेल, ‘‘आज मंत्र्याक कित्ये भायरी दिल्या रे! तू वाच तोरी…’’

१९६३ सालच्या अखेरीस गोव्याच्या भूमीवर पाय ठेवला त्यावेळचा शांत, सुंदर, नैसर्गिक सौंदर्याने भरलेला गोवा पाहून आम्ही पुलकित झालो होतो. तांबड्या मातीचे अरुंद रस्ते, त्यावरून क्वचित धावणारी वाहने, लहान-लहान डोंगर, काजूची वने आणि पायथ्याशी भाताची शेती, समुद्रकिनारी रापण ओढणारे काष्टीकार गोयकार, स्वच्छ आणि सफेद रंगाच्या वाळूने लांबलचक पसरलेले समुद्रकिनारे असे दृश्य पाहून कोण हरखून जाणार नाही? मध्येच चालताना दोन ओळखीचे लोक भेटले म्हणजे गोड कोकणीत ते विचारत असत, ‘‘आरे, कोसो हाय तूं? बो (चांगला) मुरे?’’ झाले दोन मिनिटांचे बोलणे, पण बोलण्यात ओलावा आणि आपलेपणा आणि गोडवा किती… बोलणे किंचित लांबले तर एकमेकाला गोयकार विचारतील, ‘‘काल कितें नुस्ते खाल्ले रे?’’ त्यामधून नुस्त्याच्या (मासळीच्या) गोष्टी. ते मैत्र, ती आपुलकी पन्नास वर्षांनंतर आज हरवलेली आहे. सांगायचे म्हणजे, भरपूर मिळणारी मासळी आजा हरवल्यासारखी झालेली आहे. अनेक जातीचे चविष्ट मासे गोव्यामध्ये आजही मिळतात; परंतु प्रामुख्याने संख्येने वाढत असलेल्या हॉटेलमध्ये रुचकर मासे प्रथम जातात. मासळी बाजारात सामान्य गोयकारासाठी उपलब्ध असतात ते बांगडे, पेडवे, लेपा, सुंगटे (झिंगे), वेगवेगळे खुबे आणि कुर्ल्या (खेकडे). स्वयंपाकामध्ये वेगवेगळे माशांचे प्रकार करण्यात गोयकार गृहिणींना फार मोठा आनंद वाटतो. गोयकारांच्या जीवनात भात आणि मासे यांना फार मोठे महत्त्व आहे. मासे नाहीत तर गोवेकर अक्षरशः उपवास करेल.

पन्नास वर्षांपूर्वी पणजी, वास्को, मडगाव, म्हापसा ही शहरे फार तर अर्ध्या किलोमीटरच्या परिघामध्ये पसरलेली होती. आताचे फोंडा शहर तर त्यावेळी लहानसा गाव होता. आता सर्वच शहरे विस्तृत होऊन तीन-चार किलोमीटरपर्यंत पसरलेली आहेत. एखाद्या प्रदेशाची एवढी झटकन झालेली वाढ आम्ही कधी पाहिली नाही. स्वातंत्र्याच्यावेळी साडेसात लाखांचा गोवा आता चक्क चौदा लाखांवर पोचला. ही वाढ गोव्याच्या गोवेपणाला शोभणारी नाही. सुशेगाद, शांत गोव्यातील शांती त्यामुळे हरवली आहे. आज आपण पाहतो आहोत तो अशांत गोवा!

पन्नास वर्षांपूर्वी सायकलवरून रपेट मारताना कौलारू घरे दिमाखात उभी दिसायची. त्यांमध्ये पोर्तुगीज बांधणीची मोठी घरे गोव्याचे सौंदर्य खुलवायची. मारियो मिरांडांच्या घराची आठवण होईल अशी घरे साष्टी तालुक्यामध्ये अनेक गावी सौंदर्याचा नमुना म्हणून दिमाखात उभी असायची. सकाळ होताच ‘पों पों’ असा आवाज करत सायकलवरून मोठ्या टोपल्यात पाव-उंडे घेऊन पोदेर यायचा. काही गोयकार त्यावेळी झोपेतून उठायचे. पोदेराभोवती जमा व्हायचे. दहा-अकराच्या सुमारास मासे घेऊन मासेवाली बाई ओरडत यायची. मध्येच ‘मांस’ अशा आरोळ्या देत मांसविक्रेता यायचा. ही सारी मंडळी गोव्याचे एक-एक वैशिष्ट्य होती. मासेविक्रेत्याभोवती दोनचार घरांतील माणसे, बाया जमा होत. वाटपण चाले. अखेर देवाण-घेवाण झाल्यावरही एखादी बाई एखादा मासा फुकट उचलून घ्यायची. जणू हा नित्यनियम होता. असे हे वागणे होते. मासेविक्रेत्या बाईला हे सर्व अंगवळणी असायचे. माझ्यासारख्याला फुकट एखादा मासा उचलणे चमत्कारिकच वाटायचे. कोठेही भांडण-तंटा नसायचा. त्यानंतर बाया मासे सुटी (साफ) करत करत गोष्टी करत. घरच्या बायका स्वयंपाकामध्ये रंगून जात. दुपारी खमंग हुमण (मासे कालवण) आणि उकडा भात जेवणे ही जणू आनंदाची परिसीमा असायची. पन्नास वर्षांमध्ये मासे-भात रोज मिळतो आहे, परंतु पूर्वीची ती गोयकार जेवणाची लज्जत इतिहासजमा झाली आहे.

नदी, नाला, ओढा, तळी किंवा कोठलाही पाण्याचा ओहोळ दिसला की शेतकरी मासेवेडा गोयकार डोक्यावर हॅट घालून गळ टाकून बसायचा. एखादा मासा लागलाच तर इतर पाहतील अशा तर्‍हेने घरी घेऊन यायचा. संध्याकाळी गोयकार पुरुष मंडळी झाकण्या मारण्यास (गप्पागोष्टी) बसायचे. आता असे दृश्य शहरात लुप्त तर झालेच आहे, परंतु गावागावांतूनही नाहीसे झाले आहे. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांत गोव्याची सगळी वैशिष्ट्ये गळून पडली आहेत. एक यांत्रिकी जीवन गोव्यात स्थिरावले आहे.

सकाळी त्याकाळात पाहावे तिकडे माडावर सूर काढणारे रेंदेर दिसायचे. ती सूर पिण्याचा आनंद अवर्णनीय असा होता. माडांवरचे नारळ पाडणारे ‘पाडाय’ दिवसभर नारळ पाडताना दिसत होते. आज रेंदेर, पाडाय हे समाजच गोव्यातून हद्दपार झाले आहेत. मासे विकणार्‍या बाजारातील कोळणी आणि भाज्या विकणार्‍या गावडा समाजाच्या कष्टकरी बायकांच्या जागी बाहेरून येऊन बाजार हाती घेणार्‍या बायका मनाला एकप्रकारे उदास करतात. कारण गोयकाराच्या बाजारावर आता बाहेरच्यांचे अतिक्रमण पटकन ध्यानी येते व मनाला खटकूही लागते. परंपरागत धंद्यांमधून गोयकार दिवसेंदिवस बाहेर फेकला जात आहे. समुद्रकिनारी पूर्वीच्या काळी गर्दी अशी केवळ रविवारी व्हायची. तीही केवळ गोयकारांची असायची. नाहीतर समुद्रकिनारे शांतपणे पडलेले असायचे. पन्नास वर्षांमध्ये आज समुद्रकिनार्‍यावर रोजच जत्रा भरल्याचे रूप पाहून जीव कासावीस होतो. लाटांवरील ते धीर-गंभीर शांतपण आता गोवेकरांसाठी राहिलेले नाही.

आम्हाला आठवण होते ती हिंदू-ख्रिश्‍चन सणांची आणि फेस्तांची. दोन्ही समाजाचे लोक भाविकतेने जमा व्हायचे. उत्तरोत्तर आता असे उत्सव एकत्र साजरे करताना दिसत नाहीत. हिंदू-ख्रिश्‍चन समाजातील तो संबंध दुरावत चालल्याचे वातावरण आज आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा झालेला आघात तो हा की दोन्ही समाज दूर जात आहेत. पन्नास वर्षांच्या स्वातंत्र्याच्या काळात धार्मिक सलोख्याला लागलेले ग्रहण स्वातंत्र्याला बेचव करून राहिले आहे. धार्मिक अतिरेकी संघटना येथे जन्म घेतील अशी आजची स्थिती गोव्यात आहे. गोव्याला खूप काही मिळाले, परंतु धार्मिक सलोखा जाऊन सर्वकाही मातीत गेले असे आम्हास वाटते. त्यामधूनच भाषिक वाद उत्पन्न झाला. नसलेल्या भाषेला राजभाषा म्हणून बसविण्यात आले. अनेक शतकांच्या भाषेला अडगळीत टाकण्यात आले. भाषाकारांचा हा कडवटपणा खोलवर मनात कोठेतरी धगधगत असतोच. नाही म्हटल्यास चांगली बाब म्हणजे, येथील लोकांना आजही नाटक, संगीत, तियात्र यांची आवड आहे. कोठेही, कितीही असंतोष असला तरी हे कार्यक्रम होत असतात. कदाचित हरवून गेलेले गोयकारपण त्यामधून शोधण्याचा गोयकार प्रयत्न करत असावा.

मुक्तीनंतरच्या पन्नास वर्षांमध्ये गोव्यात सर्वच नकारात्मक बाजू नाहीत. विकासही फार झपाट्याने झाला आहे. मोठे रस्ते आले, असंख्य वाहने धावू लागली, मोठ्या उंच इमारती उभ्या राहिल्या, मांडवी आणि झुवारी नद्यांवर पूल बांधून मोठे पूल उभे राहिले, सर्व प्रमुख गावांमध्ये पुले बांधून गावे जोडण्यात आली, शैक्षणिक क्रांती झाली, सर्व तर्‍हेचे शिक्षण गोव्यात उपलब्ध झाले, डॉक्टर्स, इंजिनिअरर्स, आर्किटेक्ट, प्रोफेसर आणि कारभार करणारे अधिकारी गोव्यामधून शिक्षण घेऊन भरार्‍या मारत आहेत. शैक्षणिक घौडदौड विलक्षण गतीने गोव्यामध्ये पहावयास मिळते. व्यापारउद्योग वाढला आहे. स्वातंत्र्य राज्य झाले, विधानसभेची वाढ झाली, सुखसोई वाढल्या, बाह्यविकास कौतुकास्पद असाच आहे, तरीही गोयकारांच्या मानवी मनाचा विकास खुंटत चाललेला आहे.

चाळीस वर्षांपूर्वीही गोव्यात ‘पायलट’ म्हणजे मोटरसायकल भाडेस्वार होतेच. भाडे देताना पाच रुपये कमी पडले तर हसत म्हणायचे, ‘‘जांव रे, उपरांत दी’’ व हसत जायचे. आता पाच रुपये कमी असल्यास तेच पायलट संतापाने म्हणतात, ‘‘गाडी फुकट येयल्या? उदकार चोलतां? पयले पांच रूपया दी.’’ गोयकार तोच, परंतु बदल किती? स्वातंत्र्यानंतर झालेल्या विकासामध्ये गोवेकराच्या सर्व चांगल्या गुणांची वासलात लागली आहे. प्रेमळपणा, आपलेपणा, दिलखुलासपणा, सहनशक्ती, उदारपणा हे गोवेकरांचे गुण दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहेत. आज यांत्रिकी जीवनाने गोव्यातील सर्व मजाच नाहीशी झालेली आहे. सरकार गेल्या पन्नास वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीचा आराखडा पानपानभर वृत्तपत्रांच्या जाहिरातींमधून देईल. आपली पाठ थोपटून घेईल. परंतु हरवलेले ते गोयकारपण आणण्यासाठी काहीही करणार नाही. गावातील म्हातारी माणसे म्हणतात, ‘‘सगले बरे आसा रे, पुण मुनीसपण खंय आसा?’’ स्वातंत्र्याने गेल्या पन्नास वर्षांमध्ये काय दिले याचे उत्तर त्या म्हातार्‍याच्या उद्गारातून आपणास शोधावयाचे आहे!