हरमलातील 217 बेकायदा बांधकामांवर कारवाई करा

0
9

>> गोवा खंडपीठाचे किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाला निर्देश

गिरकरवाडा-हरमल येथे विकास प्रतिबंधित क्षेत्रात सुमारे 250 बेकायदा बांधकामे असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निदर्शनास आले आहे. गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा (जीसीझेडएमए)ने केलेल्या पाहणीत 217 बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत, तर परवानगीशिवाय 33 हंगामी बांधकामे असल्याची माहिती हरमल पंचायतीने दिली. यानंतर काल उच्च न्यायालयाने किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाला 217 बेकायदा बांधकामांना नोटीस बजावून कारवाईचा निर्देश दिले. तसेच, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला हंगामी बेकायदा बांधकामांची पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याचा निर्देश दिले.

गोवा खंडपीठात गिरकरवाडा-हरमल येथील बेकायदा बांधकामां प्रकरणी सुनावणी सुरू आहे. गिरकरवाडा येथे 187 बेकायदा बांधकामे असल्याची माहिती माजी सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी उच्च न्यायालयाला दिली होती. तथापि, सरकारी यंत्रणेने केलेल्या पाहणीमध्ये 217 बेकायदा बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. गिरकरवाडा येथील एका बेकायदा इमारतीच्या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे असल्याचे आढळून आले आहे. उच्च न्यायालयाने ही बांधकामे उभारणाऱ्यांना त्वरित कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई करण्याचा आदेश जीसीझेडएमएला दिला आहे.

हरमल पंचायतीने गिरकरवाडा येथील बेकायदा बांधकाम प्रकरणी काल न्यायालयात एक अहवाल सादर केला. किनाऱ्यावर परवानगी न घेता 33 हंगामी बांधकामे उभारून व्यवसाय केले जात आहेत, अशी माहिती पंचायतीने दिली. न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्या बांधकामांची पाहणी करण्याचे निर्देश दिले असून, अहवालातील माहितीमध्ये तथ्य आढळल्यास ती बांधकामे त्वरित सील करण्याचा आदेश दिला.

आता पंच सदस्यत्व गमवावे लागणार?

बेकायदा बांधकाम प्रकरणामुळे काही महिन्यांपूर्वी बर्नार्ड फर्नांडिस यांना सरपंचपद सोडावे लागले होते. आता, बर्नार्ड फर्नांडिस याचे पंच सदस्यत्व रद्द करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची हरमलात अनेक बेकायदा बांधकामे आहेत.

र्नार्ड फर्नांडिस यांना कारणे दाखवा नोटीस

पंचायत संचालनालयाने हरमलचे माजी सरपंच तथा पंच सदस्य बर्नार्ड फर्नांडिस यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पंचायत संचालनालयाला बेकायदा बांधकाम प्रकरणात माजी सरपंच फर्नांडिस यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.