Home बातम्या हताश सूर

हताश सूर

0

भारतीय जनता पक्षाचे उत्तुंग नेते असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या भाकितावरून सध्या राजकीय क्षेत्रात वादळ उठले आहे. त्यामुळे अडवाणींच्या ब्लॉगवरून काल ही निरीक्षणे गायब झाल्याचेही दिसून आले. ‘कॉंग्रेसच्या भवितव्याबाबतचा अंदाज’ या शीर्षकाखाली हे जे विवेचन अडवाणींनी केले आहे, ते स्वतःचे नसून मावळत्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सन्मानार्थ ठेवल्या गेलेल्या मेजवानीवेळी कॉंग्रेसच्याच दोघा मंत्र्यांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत व्यक्त झालेली ती मते आहेत, असा सावध आणि सुरक्षित पवित्रा अडवाणींनी घेतला आहे. अर्थात, तसे असले तरी त्यांना जे काही सूचित करायचे आहे ते त्यांनी यथास्थित केलेच आहे. सन २०१४ च्या तिसर्‍या आघाडीचे सरकार स्थापन होईल हा दावा अडवाणींना मान्य नाही. कॉंग्रेस किंवा भाजप या राष्ट्रीय पक्षांच्या पाठिंब्यावर तिसरीच व्यक्ती पंतप्रधानपदी आरूढ होईल असे एकंदर अडवाणींचे म्हणणे आहे.

कॉंग्रेसच्या घसरणीबाबत अडवाणींनी व्यक्त केलेल्या मतांबाबत दुमत असण्याचे काही कारण नाही, कारण गेले काही महिने केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सातत्याने लोकांच्या नजरेतून उतरत चालली आहे. कोट्यवधी रुपयांचे निर्लज्ज घोटाळे, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे आढ्यताखोर वर्तन, महागाईसारख्या मूलभूत समस्यांना तोंड देण्यात सरकारला आलेले अपयश, देशाची ढासळती आर्थिक स्थिती, आंतरराष्ट्रीय स्तरावर खालवलेली पत या सर्व गोष्टी पाहाता सन २०१४ ची निवडणूक कॉंग्रेसला अवघड जाणे साहजिक आहे. अडवाणी म्हणतात त्याप्रमाणे कॉंग्रेसला शंभर जागा मिळवणेही अवघड होऊ शकते. पण त्याचा लाभ भाजपला उठवता येणार नाही अशी जी दुसरी शक्यता अडवाणी अप्रत्यक्षपणे आपल्या ब्लॉगमधून सूचित करतात, त्याचे कारण काय? गेल्या मे महिन्यात कर्नाटकमधील एकंदर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाला आत्मचिंतनाचा सल्ला दिला होता. जे काही कर्नाटकमध्ये चालले होते, ते पाहाता तो वावगाही नव्हता. परंतु आपल्या पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज करण्याचे सोडून अडवाणींनी अत्यंत निराशाजनक सूर एवढ्यातच का लावावा हे राजकीय निरीक्षकांना पडलेले कोडे आहे. सध्या भाजपामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणण्यासाठी एक प्रबळ गट सक्रिय झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत विलक्षण अस्वस्थता तर आहेच, परंतु खुद्द भाजपामध्येही एक गट अस्वस्थ आहे. भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘कमलसंदेश’ मध्ये मोदींवर आलेली टिप्पणीही त्याच धुसफुशीचा भाग होती. मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्यास केवळ नितीशकुमारच नव्हेत, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक घटक पक्ष तयार होणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण काही झाले तरी निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाची कामगिरी ही पंतप्रधानपदी कोण असावे हे ठरवणारी निर्णायक बाब ठरते. पण निवडणुकीपूर्वीच भाजपाची कामगिरी येत्या लोकसभा निवडणुकीत समाधानकारक नसेल, अशी हताश कबुली अप्रत्यक्षरीत्या अडवाणींनी दिल्याने त्याचे अनेक अर्थ निघतात. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी रालोआच्या घटक पक्षांना स्वीकारार्ह नसतील असे सूचित करण्याचा मूळ हेतू या ब्लॉगमागे आहे आणि त्यांनी मोदीसमर्थक गटावर अप्रत्यक्ष तीर साधला आहे असा निष्कर्ष भाजपच्या विरोधकांनी काढला गेला तर त्यात त्यांची चूक म्हणता येणार नाही. अडवाणींचे हे तथाकथित विश्लेषण साधार नाही. पक्षाच्या विविध राज्यांतील कामगिरीच्या विश्लेषणाच्या आधारे जर त्यांनी काही टीकाटिप्पणी केली असती तर तिला गांभीर्य प्राप्त झाले असते व पक्षाची कामगिरी सुधारण्याच्या कळकळीने त्यांनी आत्मपरीक्षणाच्या दृष्टिकोनातून ती कार्यकर्त्यांसमोर ठेवल्याचा निष्कर्ष काढता आला असता, परंतु कुठल्या तरी मेजवानीत कॉंग्रेसच्या दोघा मंत्र्यांशी झालेल्या अवांतर गप्पांचा संदर्भ त्यांना आहे. त्यामुळे या टिप्पणीला भाजपामधील अंतर्गत सत्तासंघर्षाचा वास येतो. ही टिप्पणी अनावश्यक होती आणि तिने पक्षाची हानीच केली आहे.