त्वरित पाणीपुरवठा करण्याची मागणी
हणजूण येथील महिला आणि पुरुषांनी बुधवारी 11 रोजी म्हापशातील सार्वजनिक बांधकाम खात्यावर धडक मोर्चा नेला. मूड्डीवाडा हणजूण पंचायत क्षेत्रातील प्रभाग 5 मधील लोकांना गेल्या 7 ते 8 महिन्यापासून पाणीपुरवठा योग्यरितीने नसल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा नेला. यावेळी साहाय्यक अभियंत्याची भेट घेऊन पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारला आणि पाणी प्रश्न त्वरित न सोडविल्यास आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा दिला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना उपस्थितांनी, गेल्या 7/8 महिन्यापासून हणजूण परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. याबाबत अनेकदा कार्यालयात येऊन निवेदने देण्यात आली. पंचायत अधिकाऱ्यांसह आमदारांची भेट घेतली पण पाणी प्रश्न सुटलेला नाही. पंच सदस्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
पंचायतीच्या प्रभाग 5 मध्ये मागील 7/8 महिन्यापासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण आश्वासन देऊनही तोडगा काढण्यास अपयश आल्याची माहिती पार्वती नागवेकर यांनी दिली.
कार्यालयावर मोर्चा आला असतानाही या कार्यालयातील अभियंते सकाळी 11 वाजले तरी कार्यालयात न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

