Home Featured हडफडे सरपंचासह तत्कालीन सचिवाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

हडफडे सरपंचासह तत्कालीन सचिवाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील आग प्रकरणात हडफडे-नागवा ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन रेडकर आणि निलंबित तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने काल फेटाळला.
हणजूण पोलिसांकडून बर्च या नाईटक्लबमधील आग प्रकरणामध्ये अटकेची शक्यता असल्याने हडफडेचे सरपंच रोशन रेडकर आणि तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी म्हापसा येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जाला हणजूण पोलिसांनी कडाडून विरोध केला होता.

हस्तक्षेप याचिका दाखल
बर्च या नाईटक्लबच्या बनावट दाखला प्रकरणात सौरभ आणि गौरव या लथुरा बंधूंनी अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी येत्या 7 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या अटकपूर्व जामीन अर्ज प्रकरणामध्ये आगीत बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. तसेच, बर्चचा सहमालक अजय गुप्ता यांच्या जामीन अर्जावरही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. या हस्तक्षेप याचिकेवर येत्या 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

‘लुथरा बंधूंना जामीन नकोच’
बर्च आग प्रकरणामध्ये न्यायालयाने कोणत्याही परिस्थितीत लुथरा बंधूंना जामीन देऊ नये. त्यांनी अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान केले आहे. त्यासाठी त्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे, असे या दुर्घटनेत कुटुंबातील चार सदस्यांना गमावलेल्या भावना जोशी यांनी सांगितले.