मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आग प्रकरणी हडफडेचे पदच्युत सरपंच रोशन रेडकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी काल पूर्ण केली असून अर्जावरील निवाडा राखून ठेवला आहे.
हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर यांनी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. पोलिसांनी संशयित आरोपी रोशन यांना बर्च आग प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास विरोध केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी माजी सरपंच रेडकर यांना पोलीस कोठडी घेऊन चौकशी करण्याची गरज आहे, असा युक्तिवाद पोलिसांच्यावतीने करण्यात आला आहे.
म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने माजी सरपंच रोशन रेडकर याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. हणजूण पोलीस संशयित रोशन रेडकर यांचा शोध घेत आहेत. तथापि, तो अजूनपर्यंत पोलिसांना सापडला नाही.
हडफडेचे माजी पंचायत सचिव रघुवीर बागकर यानेही अटक पूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अर्ज दाखल केला होता. पण, हणजूण पोलिसांनी संशयित रघुवीर रेडकर यांना शोधून काढण्यात यश मिळविले असून त्याला अटक केली आहे.