गेल्या एप्रिल महिन्यात राज्यात विविध अपघातांमध्ये 26 जणांचा बळी गेला, तर सतरा जण जायबंदी झाले. सरकारनेच जाहीर केलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. बरे, हे अपघात एखाद्या विशिष्ट भागात घडले आहेत असे नव्हे. ठार झालेल्या 26 जणांपैकी उत्तर गोव्यात चौदा, तर दक्षिण गोव्यात बारा ठार झाले. म्हणजे अपघात दोन्ही जिल्ह्यांमध्ये घडले आहेत. गोव्यासारख्या छोट्या राज्यातील ही आकडेवारी धक्कादायक आहे. मृतांपैकी सतरा जण हे तरूण दुचाकीस्वार आहेत, तर चौघे मागे बसलेल्यांपैकी आहेत. उर्वरित पाचजण हे पादचारी आहेत. दुचाकीस्वार तरुणांच्या अपघातांचे प्रमाण राज्यात एवढे मोठे का ह्याचा कधी कोणी विचार केला आहे काय? गोमंतकीय तरुणाईमध्ये वाहन चालवण्याबाबत एवढी बेफिकिरी असण्याचे कारण काय आहे, ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्याची जरूरी त्यामुळे भासते आहेच, शिवाय वाहतूक विभाग ह्या तरुणाईच्या बेफाम वाहन चालवण्याला लगाम घालण्यात अपयशी का ठरतो आहे हाही प्रश्न ह्यातून उभा राहतो आहे. राज्यातील प्रमुख महामार्ग सहापदरी झालेले आहेत. सिमेंट काँक्रीटचे आणि गुळगुळीत बनले आहेत. उर्वरित रस्त्यांवरही डांबरीकरणाचे थर चढत आहेत. परंतु एकीकडे रस्त्यांची स्थिती सुधारली आहे म्हणायचे तर दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढते आहे ह्याचा अर्थ काय? गोवा हे छोटे राज्य आहे, परंतु बेफिकीर आणि बेदरकार वाहतुकीसाठी गोवा हे संपूर्ण देशात कुख्यात आहे. ज्या प्रकारे येथील रस्त्यांवरून रोंरावत वाहने धावतात, ते पाहता कोणाच्याही काळजाचा ठोका चुकतो. रस्ता पार करणे हे येथे दिव्य बनले आहे. येथे झेब्रा क्रॉसिंगवर देखील वाहने थांबत नाहीत. राज्याच्या लोकसंख्येच्या मानाने वाहनांचे प्रमाण मोठे आहे आणि ते दिवसागणिक वाढतेच आहे. एकीकडे येथील सार्वजनिक बसवाहतूक पिढ्यानपिढ्या बेभरवशाची आणि प्रचंड वेळकाढू असल्याने दुसरीकडे खासगी वाहनांचा वापर वाढतच चालला आहे. त्यात गोवा हे पर्यटनाभिमुख राज्य असल्याने आणि सरकारच्या हितसंबंधांमुळे रेन्ट अ कार आणि रेन्ट अ बाईकचा सुकाळ असल्याने रस्त्यावर कोणत्याही वेळी वाहनांची संख्या प्रचंड असते. आपल्या सवयीचे नसलेले वाहन घेऊन पर्यटक बिनदिक्कत सर्वत्र फिरत असतात. वाहतूक पोलीस त्यांना अडवून चलन काटण्याचा धाक दाखवण्यात दंग दिसतात. वाहतुकीचे व्यवस्थापन, वाहतुकीला शिस्त आणणे ह्याकडे मात्र कोणाचे लक्ष दिसत नाही. गर्दीच्या वेळी रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस दिसत नाही. कोंडीत अडकलेली वाहने तासन्तास संथगतीने मार्ग काढत असतात, परंतु गरजेच्या वेळेला वाहतूक पोलीस हजर नसतात. मात्र, चलन देण्यासाठी वाहतूक पोलिसांची टोळकीच ठिकठिकाणी उभी असतात. गोव्यात वाहतूक पोलिसांना चलन देण्यात एवढे स्वारस्य का हे खरोखरच मोठे गौडबंगाल आहे आणि कोणीतरी त्याचा खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये वर्षाला चारशे बळी जातात आणि त्यामध्ये तरुणांचे प्रमाण मोठे असते ही बाब खरोखर ह्या सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या राज्यासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. मागील एका अर्थसंकल्पामध्ये सरकारने रस्ता अपघात रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गर्जना केली होती आणि त्यासाठी आठशे चाळीस कोटी रुपये खर्चिणार असल्याचेही सांगितले होते. अपघातप्रवण रस्त्यांचे सुरक्षा ऑडिट करणार, यंव करणार, त्यंव करणार अशा त्या घोषणांचे पुढे काय झाले? राज्यातील रस्त्यांवर साधे गतिरोधक एका ठराविक आकाराचे नाहीत. थडगी बांधावीत तशा प्रकारे उंच उंच गतिरोधक बांधले गेले आहेत. त्यावर ना पांढरा रंग दिलेला, ना पुढे गतिरोधक असल्याचे सूचना फलक लावलेले. परिणामी भरधाव जाणाऱ्या दुचाक्या गतिरोधकांवर उसळूनच कित्येक अपघात होत असतात. हेल्मेट न घालण्याचे प्रकार सर्रास असल्याने डोकी आपटून कोवळी मुले ठार होतात. एखादा भीषण अपघात झाला की समित्या नेमल्या जातात, बैठका घेतल्या जातात, उदंड आश्वासने दिली जातात आणि कालांतराने पुन्हा पुढचा अपघात होईपर्यंत येरे माझ्या मागल्या होते हे किती काळ चालणार? राज्यातील रस्त्यांची स्थिती सुधारल्यानंतर वाहन अपघातांचे प्रमाण कमी झाल्याची शेखी अलीकडेच सरकारने मिरवली होती. अपघात कमी झालेले असतील, तर एका एप्रिल महिन्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला त्याचे काय? गोव्याची तरुणाई रस्ता अपघातांमध्ये हकनाक बळी जाते आहे. कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. कामावर गेलेला आपला मुलगा किंवा मुलगी रात्री घरी येईल की नाही ह्याची आज शाश्वती राहिलेली नाही. ह्या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार?