स्व. भाऊसाहेब बांदोडकर सुवर्णस्मृती विशेष – गोमंतकाचा महामेरू भाऊसाहेब बांदोडकर

0
19
  • उदय म्हार्दोळकर

दयानंद बाळकृष्ण बांदोडकर म्हणजेच गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर. आज त्यांचा 50 वा स्मृतिदिन. मुक्त गोमंतकाचे भाग्यविधाते, बहुजन समाजाचे हृदयसम्राट व आधारस्तंभ ठरलेल्या भाऊसाहेबांचे गोव्याच्या विकासातील योगदान अविस्मरणीय आहे. आज त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देताना त्यांचा राजबिंडा चेहरा व उत्तुंग व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. त्यांना कोटीकोटी प्रणाम.

दयानंद बाळकृष्ण बांदोडकर म्हणजेच गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर. आज त्यांचा 50 वा स्मृतिदिन. मुक्त गोमंतकाचे भाग्यविधाते, बहुजन समाजाचे हृदयसम्राट व आधारस्तंभ ठरलेल्या भाऊसाहेबांचे गोव्याच्या विकासातील योगदान अविस्मरणीय आहे. आज त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देताना त्यांचा राजबिंडा चेहरा व उत्तुंग व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते. मुक्त गोव्याच्या चौफेर विकासाचा पाया घालताना बहुजन समाज हाच त्यांचा केंद्रबिंदू होता. पोर्तुगीज राजवटीत हा समाज शिक्षणापासून वंचित होता. कोंकणी व मराठी शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध नव्हती. कारण शाळाच नव्हत्या. पोर्तुगीज शिकावं लागत असे, ते सामान्य लोकांच्या कक्षेबाहेर होते. उच्चभ्रू समाजातील लोक पोर्तुगीज भाषेत शिकून उच्च शिक्षण घेण्यासाठी पोर्तुगालला जात असत. बहुजन समाजाला ते परवडणारे नव्हते. काही गावांतील लोक शेजारील सिंधुदुर्ग भागातून शिक्षक आणून आपल्या मुलांना मराठीतून शिकवत असत. कोणाच्या तरी घरात वर्ग चालत. पण हे सगळे चोरट्या मार्गाने चालायचे. पोर्तुगीज प्रशासनाला याची भनक लागली तर या शाळा बंद पाडल्या जात व कठोर कारवाईला सामोरे जावे लागत असे.

म्हणूनच भाऊंनी सत्ता प्राप्त करताच बहुजन समाजाला सुशिक्षित करण्याचा ध्यास घेतला. खेडोपाडी प्राथमिक शाळा सुरू करण्यास त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. मराठी शाळा विद्यार्थ्यांनी ओसंडून वाहू लागल्या. भाऊंची दूरदृष्टी त्यातून दिसून आली. कोंकणी शाळाही सुरू झाल्या, पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाची सोय झाली. भाऊंच्या दूरदृष्टीमुळेच आमची पिढी सुशिक्षित बनली. विशेष म्हणजे शिक्षण मोफत होते. समाज सुशिक्षित बनला तरच गोव्याचा विकास होईल याची जाणीव त्यांना होती. गावोगावी रस्ते तयार करण्याचे दुसरे महत्त्वाचे काम त्यांनी केले. त्यामुळे गावे जोडली गेली व दळणवळणाची चांगली सोय झाली. गोव्यात उद्योग यायला हवेत याची जाणीव ठेवून ‘सिबा’, ‘गायगी’, ‘एमआरएफ’ व ‘झुवारी ॲग्रो’सारखे मोठे उद्योग आणले, त्यामुळे हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला. त्याशिवाय छोट्या उद्योगांसाठी वसाहती स्थापन केल्या. ते स्वतः खाण उद्योगात होते.
गरीब लोकांना भाटकारांच्या जोखडातून मुक्त करून घरांची जमिनीसह मालकी मिळवून देण्यासाठी त्यांनी मुंडकार कायदा आणला. ते एक क्रांतिकारी पाऊल होते. नंतर त्यांची कन्या शशिकला काकोडकर यांनी 1975 साली त्याच कायद्यात पाचवी दुरुस्ती करून कुळ कायदा (कसेल त्याची जमीन) आणला, त्यामुळे शेतकऱ्यांना हक्क प्राप्त झाले. या कायद्याचे मूळ जनक भाऊच होते. भाऊसाहेब हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षांचे संस्थापक होते. या पक्षाची स्थापना आमच्या म्हार्दोळ गावात झाली होती.

पक्षाचे आणखी एक संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कुंकळे येथील शेणवी कुकळ्येकर (90) यांचे गेल्याच आठवड्यात निधन झाले. भाऊंची देवी महालसेवर निस्सीम भक्ती होती. त्यामुळेच त्यांनी पक्ष स्थापनेसाठी आमच्या गावाची निवड केली असावी. बहुमताने निवडून आल्यानंतर पक्षाच्या सर्व आमदारांचा महालसादेवी मंदिराच्या सभामंडपात त्यांनी भव्य सत्कार घडवून आणला होता. गोवा, दमण व दीव विधानसभेची पहिली निवडणूक त्यांनी स्वतः लढविली नव्हती. तरीसुद्धा मगो विधिमंडळ पक्षाने त्यांची नेतेपदी एकमताने निवड केली व ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. मडकई मतदारसंघाचे आमदार वसंतराव वेलिंगकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व भाऊ मडकई मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी भाऊंचे मैत्रीपूर्ण व अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. नाईक हे त्यांचे सल्लागार होते असे म्हणायला हरकत नसावी. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते, साहित्यिक, कलाकार यांच्याशीही भाऊंचे अतिशय चांगले संबंध होते. त्याचा लाभ त्यांनी कला व सांस्कृतिक विभागात गोमंतकीयांना मिळवून दिला.
दुसऱ्या विधानसभेत त्यांना राजकीय बंडाला सामोरे जावे लागले. शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांच्यासह सात आमदारांनी बंड केले व सरकार अल्पमतात आले. भाऊंच्या राजकीय कारकिर्दीला लागलेली ती एक काळी किनार होती. परंतु भाऊ डगमगले नाहीत. त्यांनी विरोधी पक्षात खिंडार पाडले व सरकार वाचविले. मागोतून फुटून गेलेल्यांपैकी एकही आमदार पुन्हा निवडून येऊ शकला नाही. भाऊंचा आम जनतेशी चांगला संबंध होता. गावोगावच्या पक्षकार्यकर्त्यांना ते नावानिशी हाक मारायचे. त्यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर सदैव कार्यकर्ते व लोकांची गर्दी असायची. अधिकाऱ्यांना तिथल्या तिथे फोन करून ते लोकांच्या समस्या सोडवत असत. सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी पैसे मोजावे लागत नसत. त्यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार करायला वावच नव्हता. भाऊंसमोर कोणाचीही डाळ शिजत नव्हती, त्यामुळे कोणालाही लाच घेण्याचे धाडस होत नसे. सरकारी नोकऱ्या पात्रता असलेल्यांना सहजपणे उपलब्ध व्हायच्या. सामान्य जनतेच्या घराघरांत भाऊसाहेबांचे फोटो लावलेले पाहायला मिळत असे. एवढी अफाट लोकप्रियता त्यानंतरच्या एकाही मुख्यमंत्र्याला लाभली नाही. ते एखाद्या गावात गेले की त्यांना बघायलाच लोक गर्दी करायचे. ते क्रीडाप्रेमीही होते. पणजी जिमखान्यावर ते क्रिकेट खेळत. गावागावांत त्यांनी मुलांना क्रिकेटचे साहित्य स्वखर्चाने दिले होते. बॅडमिंटनही ते खेळत असत. शिवाय त्यांचे फुटबॉलप्रेमही जगजाहीर होते. बांदोडकर सुवर्णचषक स्पर्धा त्यांनी सुरू केली. देशातील नामांकित फुटबॉल संघ या स्पर्धेत सहभागी व्हायचे. क्रीडा मैदाने उभारण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. आणखी एक त्यांचा विशेष गुण म्हणजे ते मत्स्यप्रेमी होते. महाराष्ट्रातील त्यांची मित्रमंडळी आली की ते स्वतः मानसीवर जाऊन ताजे मासे आणून पाहुणचार करायचे. त्यांची व विरोधी पक्षनेते ज्यॅक सिक्वेरा यांची विधानसभेत जोरदार खडाजंगी व्हायची. परंतु सभागृहाचे कामकाज संपले की दोघेही एकत्र चहा प्यायला जात. दोघांमध्ये कटुता नव्हती, उलट मैत्रीपूर्ण संबंध होते.

चिमुकला गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा असे त्यांचे मत होते. कदाचित त्या राज्यातील नेत्यांच्या प्रभावाखाली त्यांनी आपले मत बनविले असावे किंवा आपला छोटासा प्रदेश पुन्हा गुलामगिरीच्या जोखडात जाऊ नये असे त्यांना वाटत असावे. गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर त्यांना कोणताही फायदा झाला नसता; उलट त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले असते. पण ते विलीनीकरणाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. विरोधी युनायटेड गोवन्स पक्ष विलीनीकरणाच्या विरोधात उभा राहिला. गोव्यात जनमत कौल घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. गोवा व महाराष्ट्र यांच्यात चांगले सांस्कृतिक संबंध होते. गोव्यात लोक कोंकणी बोलत असले तरी व्यवहार मराठी भाषेत होत असत, त्यामुळेही भाऊंनी महाराष्ट्रात विलीनीकरणाचा आग्रह धरला असावा. जवळजवळ संपूर्ण ख्रिस्ती समाज व बहुतेक उच्चभ्रू हिंदू विलीनीकरणाच्या विरोधात होते. जनमत कौल देशात प्रथमच घेण्यात येत होता. मतदानाची तारीख जाहीर झाली व प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. भाऊंनी स्वतःला प्रचारात झोकून दिले. नाथ पै यांच्यासारखे फर्डे वक्ते गोव्यात येऊन प्रचारसभा गाजवू लागले. उत्तर गोव्यात सभांना प्रचंड गर्दी होऊ लागली, तर दक्षिण गोव्यात ख्रिस्तीबहुल्य भागात ज्यॅक सिक्वेरा यांच्या सभा गाजू लागल्या. त्यांच्या साथीला उदय भेंब्रे, चंद्रकांत केणी असे अनेक दिग्गज होते. भाऊंनी प्रसिद्ध शाहीर अमर शेख यांना बोलावून कार्यक्रमांचा धडाका लावला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे दिवसभर कानावर पडू लागले. संपूर्ण गोवा ढवळून निघाला. विलीनीकरण वाद्यांचं चिन्ह ‘फूल’ तर विरोधकांना ‘दोन पाने’ हे चिन्ह मिळाले. फूल विरुद्ध दोन पाने अशी लढत रंगतदार होणार होती. शेवटी मतदानाचा दिवस उजाडला आणि जनमत कौल भाऊंच्या विरोधात गेला. संपूर्ण बहुजन समाज भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. बांदोडकरांनी कौलाचा निकाल खिलाडीपणे स्वीकारला. भाऊंना निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात गोवा स्वतंत्र राहायला हवा हे मनोमन पटले व त्यांनीच विलीनीकरण विरोधात मतदान करण्याचा मंत्र आपल्या मतदारांना दिला, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत होते. जनमत कौलानंतर घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षालाच बहुमताने विजयी केले व भाऊ पुन्हा मुख्यमंत्री बनले. दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती. मदतीसाठी त्यांच्या बंगल्यावर गेलेल्या एकाही व्यक्तीला रिकाम्या हाताने परतावे लागत नसे. अनेक गरीब लोकांच्या विवाहकार्यासाठी ते सढळ हस्ते मदत करीत असत.

म्हाळसादेवीची आपल्यावर विशेष कृपा आहे अशी त्यांची भावना होती. त्यामुळेच त्यांनी स्वखर्चाने कोजागरी उत्सव सुरू केला. उत्सवाचे स्वरूप भव्यदिव्य असायचे. दुपारी महाप्रसाद, महापूजा व रात्री तसेच पहाटे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायकांचा गायनाचा कार्यक्रम होत असे. प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे ‘बोलें रे पपी’ हे गाणे रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले हे आजही स्मरते. मधल्या वेळेत त्यांनीच कुमठा येथून हत्ती अंबारी आणली. उत्सवात फलाहार व दारूकामाची आतषबाजी होत असे. संपूर्ण गोवा या उत्सवात सहभागी होत असे. भाऊंचे संपूर्ण कुटुंब दोन दिवस तेथे मुक्कामाला असे. दर रविवारी देवीच्या पालखी उत्सवाला ते हजेरी लावत असत. त्यांना कांपाल मैदानावर खेळत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व जुन्या गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यादिवशी ते पालखीला उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे मंदिरात देवीची आरती चालू असताना अचानक वीज गेली व देवीच्या उत्सवमूर्तीच्या डोक्यावरील फुलांचा तुरा खाली पडला. ती खरे म्हणजे अदृष्टाची चाहूल असावी. वीज लगेच आली. प्रसाद वितरण झाल्यावर भाविक मंदिरातून बाहेर आले, तोच भाऊ गेल्याचे वृत्त धडकले. ते ऐकून सगळे सुन्न झाले. वरील घटनेचे वृत्त ‘अदृष्टाची चाहूल’ असा मथळा देऊन बहुतेक दैनिकांनी खास चौकटीत प्रसिद्ध केले. दुसऱ्या दिवशीची जायांची फुले विक्री न करता भाऊसाठी पाठवावी असा निरोप फुलकार मंडळींना आला. अनेकांनी रात्रीच पणजीला धाव घेतली. सकाळी भाऊ गेल्याचे वृत्त समजताच संपूर्ण गोवा हळहळला. दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळी मिरामारपर्यंत रस्ता खचून भरला होता. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. मिरामार किनाऱ्यावर मांडवीच्या साक्षीने त्यांना तोफांची सलामी देऊन साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. ‘भाऊसाहेब अमर रहे’ अशा घोषणांनी असमंत दुमदुमून गेला. पुत्र सिद्धार्थ यांनी मंत्राग्नी दिला व एक युगपुरुष पंचतत्त्वात विलीन झाला. त्यांना कोटीकोटी प्रणाम.