28.1 C
Panjim
Sunday, September 26, 2021

स्वीकार

  • गिरिजा मुरगोडी

समोर येईल ते सर्व आनंदानं स्वीकारत कर्तव्य पार पाडत जायचं ही भावना; आणि सूत्रधार परमेश्‍वरच, त्यामुळे कोणाला दोष देणं नाहीच. निरंतर समाधानी वावर… वृत्तीत ही स्वीकार भावना, अनाक्रोश क्षमा असणं किती दुर्मीळ.

परवाच; महादेवशास्त्री जोशींचं ‘आत्मपुराण’ वाचत असलेली मैत्रीण बोलता बोलता म्हणाली ः महादेवशास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांच्या आईचं स्वतःचं असं एक तत्त्वज्ञान होतं. त्या म्हणत, ‘संसार म्हणजे एक नाटक आहे. प्रत्येकाच्या वाट्याला एकेक ‘पार्ट’ आलेला असतो. माझ्या वाट्याला आलेला पार्ट मी यथाशक्ती वठवते. या सगळ्या नाटकाचा सूत्रधार परमेश्‍वर. माझं काम झालं की तो मला पडद्याआड ओढून नेईल. तोवर तक्रार करायची नाही.’
पतीच्या अनेक लहरी सांभाळणं, मुलांचं सर्व करणं, आला-गेला पाहणं, कुळागराची देखभाल करणं, शंभर पायर्‍या चढून तळीवरून पाणी आणणं, अशी असंख्य कामं अखंड करत राहात त्या, पण त्यांच्या मुखावरची स्मितरेषा कधी ढळली नाही. महादेवशास्त्रींनी त्यांच्याबाबत म्हटलेय, ‘अनाक्रोश क्षमा’ तिने जणू ज्ञानेश्‍वरांकडून मागून आणली होती.

समोर येईल ते सर्व आनंदानं स्वीकारत कर्तव्य पार पाडत जायचं ही भावना; आणि सूत्रधार परमेश्‍वरच, त्यामुळे कोणाला दोष देणं नाहीच. निरंतर समाधानी वावर… वृत्तीत ही स्वीकार भावना, अनाक्रोश क्षमा असणं किती दुर्मीळ.
यावर आम्ही थोडा वेळ बोललो. थोडी चर्चा झाली आणि विचारचक्रही सुरू झालं.
खरंच, आयुष्यातले अनेक गुंते सोडवण्याची, किंबहुना असे गुंते निर्माणच होऊ नयेत यासाठीची ही सुंदर गुरुकिल्लीच. या भावनेनं सर्व करत गेलं तर गाठी-निरगाठी बसण्याचा संभव कमीच. मात्र जी माणसं हे सगळं समाधानानं, आनंदानं, जगण्याचा भाग म्हणून आणि ‘स्व’भाव म्हणून स्वाभाविकपणे करू शकतात- तडजोड वा नाईलाज म्हणून नव्हे- त्यांच्या बाबतीतच हे शक्य आहे.

इथे ग.दि.मां.च्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्याबद्दल त्यांच्या मुलाने लिहिलेलं पुस्तक ‘दरवळतो पूरिया’ आठवलं. वाचताना अगदी भरून आलं होतं. अत्यंत सोशिक, समंजस, प्रगल्भ, अतिशय रसिक, प्रेमळ, प्रसन्न अन् हसतमुख अशा विद्याताई. स्वतः उत्तम उदयोन्मुख गायिका, पण किती सहजपणे प्रतिभावंताच्या आयुष्याशी त्यांनी स्वतःला आनंदानं जोडून घेतलं; नव्हे विलीनच करून घेतलं होतं!
सात मुलं, घरी येणारे मोठमोठे कलाकार, पै पाहुणे, नातेवाईक, प्रचंड मोठं घर, मोठं आवार, बाग, सणवार, कुलाचार… सगळं सतत राबत राहून मनापासून हसतमुखानं सांभाळणं… सोपं नव्हतं ते! कुठल्या मुशीतून घडलेली असतात ही माणसं?
ग.दि.मां.च्या प्रतिभासंपन्न कर्तृत्वानं उजळलेलं फार समृद्ध आयुष्य त्या जगल्या हे तर खरंच, पण अत्यंत निर्भ्रांतपणाचं, समर्पणाचं जे जरतारी अस्तर ग.दि.मां.च्या जगण्याला लाभलं तेही अपूर्वच.
विद्याताईंचं व्यक्तिमत्त्व समर्पितच होतं ग.दि.मां.च्या जीवनात, कार्यकर्तृत्वात. पण याहून वेगळं व्यक्तिमत्त्व असणारं एक सर्वज्ञात उदाहरण सुनाताबाईंचं. अत्यंत कणखर, कर्तृत्ववान, सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या. त्यांनी किती सुनियोजित, शिस्तबद्धरीतीनं पु.लं.चं विविधांगांनी बहरणारं सर्जन जपलं, जोपासलं, सांभाळलं आणि पुढे समाजाच्या हाती धीरोदात्तपणे सुपूर्दही केलं. स्वतःचं ‘स्व’त्व जपत, पण कतीतरी बहरू शकले असते. अशा पैलूंना थोडं बाजूला ठेवून फार मनःपूर्वक हे सगळं करणार्‍या सुनीताबाईंनी एका अद्वितीय माणसाचं मनस्वीपण जपलं… त्यांना न पटणार्‍या काही गोष्टींचा स्वीकार करत.

पं. भीमसेनजींसारख्या महान कलाकाराच्या प्रथम पत्नीच्या वाट्याला जी मानहानी, उपेक्षा आणि हालअपेष्टा आल्या त्या अत्यंत क्लेषदायक. पण ते सगळं सोसूनही त्यांच्या तोंडून आपल्या पतीबद्दल कोणताच वावगा शब्द तर आला नाहीच, पण त्यांच्या मनातलं प्रेम, आदर यत्किंचित कमी झालं नाही. हे सगळं किती गुंतागुंतीचं… पण या स्वीकार आणि समर्पण भावनेनं त्यातही हळुवारपण आणलं.

अनेक अद्वितीय व्यक्तिमत्त्वं जपण्याचं काम त्यांची साथ खंबीरपणे निभावणार्‍या तितक्याच अनमोल व्यक्तींनी केलं आहे. सचिन तेंडुलकरच्या पत्नीनं स्वतःचं वैद्यकीय करियर बाजूला ठेवलं आणि एक अमूल्य असं भारतरत्न जीव लावून जपलं, बहरू दिलं. हा निर्णय किती कठीण, पण ते आवश्यक मानून मनापासून करणारं माणूस किती मोठं!
अशी अनेक उदाहरणं असतात. त्याचबरोबर पतीनं पत्नीला साथ देण्यासाठी, तिचं करिअर पुढे नेण्यासाठी काही तडजोडी सहजपणे केल्याची उदाहरणंसुद्धा असतात. घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं आवडीनं-प्रेमानं केल्याची उदाहरणं कमी असली तरी आहेत अगदी आजूबाजूलासुद्धा. आणि आत्यंतिक विरोध सोसून पत्नीच्या शिक्षणासाठी झटणारे डॉ. आनंदीबाई जोशींचे पती गोपाळराव जोशी, प्रतिकूल परिस्थितीत कन्येच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे डॉ. रखमा यांचे पिता, तसेच समाजकल्याणासाठी, स्त्री उन्नतीसाठी झटणारे महर्षी कर्वे, म. फुले अशी फार मोठी माणसेही आपल्याला ज्ञात आहेत.

हे सर्वकाही विचार, ध्येय समोर ठेवून घडतं तेव्हा त्याला वेगळे आयाम लाभतात. त्याना स्वीकारायचं वेगळं महत्त्व असतं. पण कधीकधी मात्र काही गोष्टी अवाक् करतात. ‘बालकांड’ वाचताना, ‘स्मृतिचित्रे’ वाचताना पुनः पुन्हा असं अवाक् व्हायला होतं. काय काय सोसलं या स्त्रियांनी केवळ पतीच्या विक्षिप्तपणामुळे. मात्र हा फक्त स्वीकार नसावा. अनेकदा परिस्थितीचा रेटा, त्यावेळची सामाजिक मानसिकता यांचा परिणाम असे. त्यातूनही आपली मिस्कीलता जपणार्‍या, ‘स्मृतिचित्रे’सारखी अपूर्व निर्मिती करणार्‍या लक्ष्मीबाई या अगाधच वाटतात.
हे सगळं आठवत असताना कितीतरी भावनांचं, विचारांचं आवर्तन होत राहिलं… मनात आलं आपण सामान्यातले सामान्य, पण अशी असामान्य व्यक्तिमत्त्वं नकळतच मनात एखादी ज्योत उजळून जातात. त्या प्रकाशात आयुष्यातलं एखादं सत्य लख्ख समोर येतं. कळत असून वळत नसणारं काही अधिक स्पष्ट होत जातं. अशाच प्रकाशात जाणवलं, खरंच पती, मुलं, सुना, भावंडं, मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी, परिस्थिती, अगदी स्वतःसुद्धा; या सर्वांबाबत या स्वीकारवृत्तीच्या अद्वितीय भावनेतला शतांश तरी आपल्याला जमू शकतो का? प्रत्येक गोष्ट त्याच्या गुण-दोषासकट, चांगल्या-वाईटासह सहज स्वाभाविक स्वीकारभावनेनं वस्तुनिष्ठपणे आपण पाहू आणि साहू शकतो का? उत्तर ‘नाही’ असंच येतं. सगळ्या समस्यांचं मूळ तिथेच तर असतं.
खरंच, स्वीकार या एका छोट्याशा शब्दात अवघ्या आयुष्याचं तत्त्वज्ञान सामावलंय. स्वीकार कशाचा? माणसांचा, नात्यांचा, परिस्थितीचा, स्वतःचाही. असा सहजस्वीकार सोपा तर नाहीच, पण प्रयत्नसाध्य आहे का? असावा. तो ज्याला जमला त्याचं मन, आरोग्य आणि आयुष्यही समतोल आणि संतुलित म्हणूनच समाधानी असतं. आणि ज्यांना तो ‘स्व’भाव असतो त्यांच्या तर अवतीभवतीही हे समाधान सकारात्मक लहरींच्या रूपात निरंतर जाणवत राहातं. अशी माणसं ऊर्जाही देतात आणि विचारांचे दीप उजळून मनातल्या कोलाहलाचा अंधारही दूर करतात.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

महिलांचे अर्थार्जन

नीना नाईक दोन वर्षांत यश-अपयश, बेरीज-वजाबाकी यात प्रेम, द्वेष, आत्मीयता हे उघड झाले. कुठलाही व्यवसाय करताना… कोरोनाने हे...

‘डिटॉक्स डाएट’ म्हणजे काय?

वर्षा भिडे(आहारतज्ज्ञ) डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक...

‘कॉलेजविश्व’

शुभंकर जोगजीव्हीएम्स जीजीपीआर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, फर्मागुडी मागची काही वर्षे आपण बघतोय ही कोरोना महामारी चालू आहे ज्यामुळे आपल्याला...

गोव्यातही खेला होबे!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

ALSO IN THIS SECTION

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

विघ्नराजं नमामि

लक्ष्मण पित्रे निर्विघ्नपणाने कोणतेही कार्य पूर्ण व्हावे म्हणून आपण प्रथम विघ्नेश्‍वर गणपतीला वंदन करतो. हा विघ्नांचा नियामक, विघ्नहर्ता...