– एडवर्ड डी लीमा
भारतीय समाजाला सभोवताली घडणार्या घटनांचा निरपेक्ष वृत्तांत देण्यासाठी तसेच समाजप्रबोधनासाठी त्यांनी आपल्या मित्रांसोबत ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली. केसरी मराठीतून तर मराठा इंग्रजीतून प्रकाशित होत होते. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या कालखंडात त्यांनी ५१३ अग्रलेख लिहिले. त्यांचे अग्रलेख हा केसरीचा आत्मा होता. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’, ‘शिशुपाल की, पशुपाल’ यासारख्या अग्रलेखांनी इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते.
…………
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी अजरामर घोषणा देणार्याबाल गंगाधर टिळक यांची १ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आम्ही साजरी करणार आहोत. स्वातंत्र लढ्यात देशबांधवांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेली घोषणा
पुढे इंग्रजांच्या सत्तेचा कर्दनकाळ ठरली. निद्रिस्त भारतीय जनतेला जागे करून त्यांना स्वातंत्र्य लढ्यात झोकून देण्यास प्रेरणा देणारे टिळक भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पितामह होते. त्यांनी खर्या अर्थाने प्रत्यक्ष कृतीद्वारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अगणित भूमिपुत्रांनी भारतमातेला परकीयांच्या राजवटीतून मुक्त करण्यात प्राणांचे बलिदान दिले. स्वदेशी वस्तूंचा वापर करा, विदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला असा कानमंत्र सर्वप्रथम त्यांनीच दिला होता. पुढे महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य संग्रामात या कानमंत्राचा वापर करीत भारतीयांना जागे केले.
बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील चिखली या गावातील सदोबा गोरे या मध्यमवर्गीय सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबात २३ जुलै, १८५६ साली झाला. टिळकांचे खरे नाव केशव होते; परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. गंगाधरपंतांची शेती होती. पण शेतीच्या उत्पन्नावर घरखर्च भागणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली. त्या वेळेस त्यांना महिन्याला फक्त पाच रुपये पगार मिळत असे. त्यांचे वडील गंगाधरपंत गणित व संस्कृत या विषयांचे गाढे पंडित होते. त्यामुळे या दोन्ही विषयांत बाळ पण चांगलाच पारंगत झाला. गंगाधरपंत पुढे शिक्षण खात्यात साहाय्यक उपसंचालकपदापर्यंत पोचले. तीन बहिणींच्या पाठीवर टिळक यांचा जन्म झाला होता. पुत्र व्हावा म्हणून त्यांच्या आईने सूर्यव्रत केले होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सूर्याचे पिल्लू’ म्हणायचे. टिळक अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांना बालपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यांचा गणितात व्यासंग होता. त्याशिवाय राजकारण, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, लेखन, न्यायशास्त्र, सनातन धर्मग्रंथांचा अभ्यास यात त्यांचा हातखंडा होता. संस्कृत पुस्तके वाचून स्वत:च त्याचा अर्थ लावण्याचा तो प्रयत्न करी. बाणभट्टाने लिहिलेले ‘कादंबरी’ नावाचे एक सुप्रसिद्ध कथाकाव्य आहे. गंगाधरपंत ते पुस्तक वाचत असत. टिळक दहा वर्षांचा असताना त्याला वाटले हे पुस्तक आपणही वाचावे. तेव्हा त्याने ते पुस्तक वडिलांजवळ मागितले. गंधाधरपंतांना वाटले, एवढासा दहा वर्षांचा मुलगा हे पुस्तक काय वाचणार? त्याला याचा अर्थ कसा काय कळणार? पण त्यांनी ठरवले, बाळची परीक्षा घ्यायची. ते बाळला म्हणाले, ‘हे बघ बाळ, मी तुला पुस्तक देईन. पण एका अटीवर. मी तुला एक गणित घालतो. ते तू सोडवून दाखवलं तरच तुला पुस्तक मिळेल!’ बाळ लगेच तयार झाला. त्याने पाटी-पेन्सिल घेतली. सगळी दुपार त्याने गणित सोडवण्यात घालवली. पण मोठ्या जिद्दीने त्याने ते अवघड गणित सोडवून दाखविले. आईवडील दोघेही ते बघून आश्चर्यचकित झाले. वडिलांना ते पुस्तक देणे भाग पडले. दहा वर्षांचे असताना त्यांची आई वारली. वयाच्या १० व्या वर्षी ते पुण्यात आले. त्यांच्या वडिलांची बदली पुण्यात झाली होती. दुर्दैवाने वय अवघे सोळा असताना त्यांचे पितृत्व हरपले. १८७२ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तेथे त्यांची भेट प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा. केरुना छत्रे यांच्याशी झाली. त्यांनी टिळकांची प्रशंसा करताना त्यावेळी म्हटले होते, ‘‘टिळक सूर्यप्रकाशाइतकाच सूर्यपुत्र म्हणून हुशार आहे. थोड्यांनाच त्यांच्या हुशारीचे श्रेष्ठत्व कळते; पण तो आयुष्याच्या मध्यंतरीच्या वेळेत तळपताना त्यांची प्रखरता झेलण्याची क्षमता कुणामध्येही नसणार!’’ पुढे त्यांचे हे शब्द तंतोतंत खरे उतरले. बी. ए. पूर्ण झाल्यानंतर ते ‘न्यू इंग्लिश शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मात्र, उच्च शिक्षण चालू ठेवत त्यांनी एम. ए. आणि एलएलबी या पदव्याही प्राप्त केल्या. समाज परिवर्तनाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले आणि त्यांनी त्यांच्या मित्रांबरोबर न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. एक शिक्षक म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते. चिपळुणकर यांच्या ‘निंबधमाला’ या मासिकाने त्यांच्यावर चांगलाच प्रभाव टाकला होता. देशप्रेमाचा प्रखर संदेश देणारे लेख त्यात झळकत आणि ते वाचण्यास टिळक आसुसलेले असत.
भारतीय समाजाला सभोवताली घडणार्या घटनांचा निरपेक्ष वृत्तांत देण्यासाठी तसेच समाजप्रबोधनासाठी त्यांनी आपल्या मित्रांसोबत ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली. केसरी मराठीतून तर मराठा इंग्रजीतून प्रकाशीत होत होते. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या कालखंडात त्यांनी ५१३ अग्रलेख लिहिले. त्यांचे अग्रलेख हा केसरीचा आत्मा होता. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’, ‘शिशुपाल की, पशुपाल’ यासारख्या अग्रलेखांनी इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते. टिळक आणि आगरकर एकमेकांचे परममित्र होते. परंतु स्वातंत्र मिळवण्याच्या मतांतरामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. आगरकरांचे मत होते – आधी देश सुधारला पाहिजे तरच त्या स्वातंत्र्याला अर्थ राहील. तर टिळकांचे मत होते की, समाज सुधारणेला बरेच दिवस लागतील; त्यासाठी इतके दिवस थांबणे शक्य नाही. आगरकरांचे विचार भिन्न असल्याकारणाने त्यांनी केसरीचे संपादकपद सोडले व ‘सुधारक’ नावाचे वृत्तपत्र काढले होते. मात्र, टिळकांनी केसरीचे काम चालूच ठेवत इंग्रजांच्या जुलुमशाहीविरुद्ध अग्रलेखांद्वारे आवाज उठवून इंग्रजांना घाम काढला. त्यांनी इंग्रज राजवटीविरुद्ध प्रखर विरोधात लिहिण्यास सुरुवात केली. ते वाचून भारतीय जनता परकीय राजवटीविरुद्ध पेटून उठली. इंग्रज सत्ताधार्यांना हे निश्चितच पाहवले नाही. ते टिळकांना अटक करण्याची भाषा बोलू लागले. टिळकांच्या मित्रांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पण लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड असणार्या टिळकांना हे ऐकून तळपायाची आग मस्तकात पोचली. ते म्हणाले, ‘‘हे पूर्वीच ऐकून काय फायदा? आम्ही हे टाळू शकत नाही. आम्ही आमच्याच भूमीत शक्तीहीन बनलो आहोत. आम्ही सर्व भारतीय एका मोठ्या तुरुंगात आहोत. मी त्यातल्या एका लहान तुरुंगात असेन!’’ पुढे त्यांच्यावर खटला भरून १८९७ साली तुरुंगवास झाला. १९०८ साली त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला गुदरण्यात आला. मुंबईच्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना भारतीय जनतेचे डोळे निवाड्याकडे लागले होते. शेवटी रात्री ९.३० वा. न्यायाधीशांनी टिळकांना दोषी ठरवून सहा वर्षांचा कारावास ठोठावला व ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात पाठविले. टिळकांनी ग्रीक संस्कृतीचा अभ्यास केला होता. ज्युपीटर देवाच्या स्मरणार्थ भरवले जाणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरल्याचे पाहून त्यांनी त्याच धर्तीवर प्रस्थापित गणेशोत्सवाचे पुनरुज्जीवन केले. हिंदू धर्मातील एकोपा वाढीस लागावा म्हणून गणेशोत्सवाला दहा दिवस चालणार्या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. शिवाजी महाराज हे मराठ्यासाठी स्फूर्तिस्थान आहेत म्हणून त्यांनी शिवजयंती सुरू केली. त्यांनी ‘ओरायन’ आणि ‘द आर्क्टिक होम ऑङ्ग वेदाज’ ही पुस्तके लिहिली. त्यांनी मंडाले तुरुंगात असताना लिहिलेले ‘गीतारहस्य’ अजरामर ठरले आहे. हे पुस्तक अनेक भाषांत रूपांतरित झाले आहे. भारत – पाकिस्तान फाळणीला त्यांचा प्रखर विरोध होता. लखनौ येथे महंमद अली जिना यांच्या उपस्थितीत झालेल्या हिंदू-मुस्लीम करारावेळी त्यांची उपस्थिती होती. तेथे त्यांनी फाळणीला सक्त विरोध दर्शविला होता. ३१ जुलै, १९२० या दिवशी स्वातंत्र्यांचा मूलमंत्र देणार्या या पितामहाला देश मुकला.
……………