देशभर स्वाइन फ्लूचे थैमान सुरू असताना काल गोमेकॉत या रोगाची लागण झालेल्या एका व्यक्तीचे उपचार सुरू असताना निधन झाले. ही माहिती पोलिसांनी दिली. सदर रुग्ण मडगाव येथील एका खासगी इस्पितळात उपचार घेत होता. दरम्यान, स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने मडगावच्या खासगी इस्पितळात पाच रुग्णांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर संध्याकाळी उशिरा घरी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.मिळालेल्या माहितीनुसार, स्वाइन फ्लू या रोगामुळे दगावलेला रुग्ण हॉंगकॉंग येथून गोव्यात परतला होता. तो विदेशात बोटीवर कामाला होता. तो गोमंतकीय असून गोव्यात दाखल झाल्यानंतर अस्वस्थ वाटल्याने तो उपचारासाठी मडगाव येथील खासगी इस्पितळात उपचार घेत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.
मात्र, काल त्याची प्रकृती अधिक खालावल्याने सदर खासगी इस्पितळातून त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथे पाठविण्यात आले होते. गोमेकॉत उपचार सुरू असताना त्याचे निधन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आरोग्य खात्याने स्वाइन फ्लूचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी तयारी ठेवली असल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. या रोगाची लक्षणे आढळल्यास लगेच सरकारी इस्पितळात प्राथमिक उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन खात्याने केले आहे.

