– विष्णू सूर्या वाघ
(भाग- १)
मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात ‘पं. जितेंद्र अभिषेकी’ हे नाव सदैव अजरामर राहील. ‘मत्स्यगंधा’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘संत गोरा कुंभार’, ‘मीरा-मधुरा’ अशा एकाहून एक सरस नाटकांतील पदांना अभिषेकीबुवांनी चढवलेला स्वरसाज हे अक्षरशः देवाघरचं देणं आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातही त्यांनी निर्माण केलेली स्वतःची गायकी सौष्ठवपूर्ण तितकीच व्यासंगदर्शी आहे. या महान कलावंताच्या कारकिर्दीचा घेतलेला हा वेध-
अभिषेकीबुवांचं प्रथम दर्शन मला झालं ते मी इयत्ता सातवीत शिकत असताना.
डोंगरीच्या डोंगरमाथ्यावरील श्रीषष्टी शांतादुर्गेच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा होता त्या वर्षी. तीनचार दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला होता. शेवटच्या दिवशी पं. जितेंद्र अभिषेकी यांचे गायन होते.
मला स्पष्ट आठवते. सटीच्या देवळासमोर एक भव्य मंडप घालण्यात आला होता. मंडप खचाखच भरला होता. बुवांना त्यापूर्वी मी कधी पाहिले नव्हते. शास्त्रीय गायनाची मैफलही कधी ऐकली नव्हती. तीनेक वर्षांपूर्वी श्रीराम मंदिराच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुधीर फडके यांच्या गाजलेल्या ‘गीतरामायण’चा गोव्यातला पहिलावहिला शो आमच्या डोंगरी गावात झाला. बालपणी मी पाहिलेला तोच एक मोठा सांगीतिक कार्यक्रम. त्यानंतर हा, अभिषेकीबुवांचा.
साधारण नऊ वाजता बुवांच्या गायनाला प्रारंभ झाला. सुरुवात रागदारीने झाली. बुवांनी राग कोणता आळवला ते आठवत नाही- कारण रागाबिगातलं काही कळतच नव्हतं त्या वयात. एवढंच आठवतं की पहिला राग, म्हणजे विलंबितातला ख्याल तब्बल सव्वा तास चालला. बुवांची विलक्षण तंद्री लागली होती आणि त्याच तंद्रीत ते गात होते. पण दुर्दैवाने समोर डोंगरीच्या परिसरातले भोळे भाविक श्रोते. शास्त्रीय गायनाची ही बरसात डोक्यावरून जाऊ लागली तसा एकेक श्रोता उठून जाऊ लागला. पुढच्या पंचेचाळीस मिनिटांत बुवांनी दुसरा राग संपवेपर्यंत मंडप अर्धा रिकामा झाला होता. त्यानंतर मात्र बुवांनी नाट्यसंगीताला हात घातला आणि वातावरण अक्षरशः बदलून गेले. ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘नाचत ना गगनात नाथा’, ‘प्रेम वरदान स्मर सदा’, ‘दिन गेले भजनाविण सारे’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘दिव्य स्वातंत्र्यरवी’ अशी सुंदर नाट्यगीतं बुवांच्या कंठातून सुरांचा शिंतोडा घालू लागली. तशात अधूनमधून अभंगांची उधळण. ‘अबीर गुलाल उधळीत रंग…’ आणि साक्षात डोंगरीचे संतकवी कृष्णंभट बांदकर यांचा ‘विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे’ हा स्वतः बुवांनीच चाल लावून सजवलेला अभंग…
उत्तररात्री जवळजवळ दीड वाजता ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या अशोकजी परांजपेरचित भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली तेव्हा काळोख्या वाटेवरून डोंगर उतरून खाली येताना आयुष्यभर पुरेल असा सुरेल प्रकाशाचा ठेवाच आपण घेऊन घरी जातोय असेच काहीसे वाटत होते मनात.
त्यानंतर मी बुवांना पाहिले तब्बल तीन वर्षांनी. मंगेशीला अखिल गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन होते. अभिषेकीबुवा त्याचे स्वागताध्यक्ष होते. मी दहावीत गेलो होतो.
स्वागताध्यक्ष या नात्याने बुवांनी छोटेसेच भाषण केले, पण ते मनावर ठसण्याइतपत जोरकस होते. कलावंत हा नुसताच कलावंत असत नाही, त्याच्या कलेमागे सामाजिक विचार असावा लागतो. कलावंताने कणा वाकवू नये आणि कोणापुढे लाचार होऊ नये. प्रसंगी सत्ताधार्यांशीही टक्कर द्यायला सज्ज असावं अशा आशयाचे विचार बुवांनी आपल्या भाषणातून मांडले. त्या विचारांनी मी फारच प्रभावित झालो होतो. भाषणाच्या दरम्यान त्यांनी म्हणून दाखवलेला उर्दू शेर आजही माझ्या स्मरणात आहे-
मैं अगर मकबरों में जाकर सुनाऊँ कलाम
तो मौत से
हयात के चष्मे उबल पडे
जमीं हिली, आसमां हिला
मगर तू चूप रहा?
त्यानंतर बुवांचे दर्शन अधूनमधून होतच राहिले. कवळ्याच्या सम्राट संगीत संमेलनात बुवांच्या मैफली ऐकल्या. कला अकादमीने ‘गोमंत दर्शन’ची निर्मिती केली, त्यावेळी संगीत देण्यासाठी बुवांना पाचारण केले. ‘नमस्ते कलावंत गोमंत देशा… नमस्ते महा सागरा नीलवेषा’ हे कविवर्य वसंत बापट यांनी रचलेले स्तवन बुवांच्या खर्जातल्या स्वरांत ऐकताना अंगावर रोमांच उठले. ‘सत्रोजीची सतर उल्ली ना’ हा गोंदजी नायकांचा पोवाडा त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला. ‘गोमंत दर्शन’ला बुवांनी दिलेलं संगीत हा एक अनमोल ठेवा आहे. कला अकादमीच्या वाद्यवृंदाची निर्मिती करतानाही बुवांनी अप्रतिम रचनांची पेशकश केली.
अशीच एकदा फर्मागुडीला गिरीजाताई केळेकर संगीत संमेलनात बुवांची मैफल होती. सकाळची दहा-साडेदहाची वेळ असावी. बुवांनी बिलासखानी तोडी गायला घेतला. बिलासखानीचे सगळे रागरंग त्यांनी अंगभूत आर्ततेसह पेश केले.
१९९३ साली सौ. मंदा बांदेकर यांच्या पुढाकाराने अभिषेकीबुवांचा षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार सोहळा कला अकादमीत झाला. मी त्या समितीचा चिटणीस म्हणून काम करीत होतो. या सत्काराच्या निमित्ताने एक गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. श्री. माधव पंडित त्या ग्रंथाचे संपादक होते.
त्याकाळात पाहिलेली पंडितजींची ती मूर्ती आजही डोळ्यांसमोर आहे. ताठ कण्याची धिप्पाड शरीरयष्टी, पांढरास्वच्छ लेंगा आणि झब्बा, भारदस्त पावलं टाकत जाणारी चाल, गौर कांती, काळेशार कुरळे केस आणि धारदार मिश्या व त्यांची ती कडक शिस्तीची तरीही आर्द्र, पाणावलेली ममतायुक्त नजर…
हे देणे मंगेशाचे
पं. जितेंद्र अभिषेकी. हे खर्या अर्थाने श्रीमंगेशाचे देणे. २१ सप्टेंबर १९२१ रोजी त्यांचा जन्म मंगेशी येथे झाला. वडील बाळूबुवा अभिषेकी हे नामांकित कीर्तनकार होते. संस्कृतचे व संतवाङ्मयाचे उत्तम ज्ञान, रसाळ वाणी, साजेसं संगीत या गुणांमुळे त्यांची कीर्तने रंगत. कीर्तनकलेचा अभ्यास त्यांनी स्वतःच केला होता. ते पौरोहित्य, वैदिकी व गायन या तिन्ही गोष्टींत तरबेज होते. ग्वाल्हेरचे शंकरबुवा गोखले यांच्याकडून त्यांनी गायनविद्या शिकून घेतली होती. त्याकाळात हजार-पंधराशे बंदिशी त्यांना मुखोद्गत होत्या.
जितेंद्र अभिषेकी यांचे बालपण मंगेशी म्हार्दोळच्या परिसरात गेले. ते मूलतःच हुड स्वभावाचे होते, पण बुद्धी मात्र कुशाग्र होती. सकाळचा सनई-चौघडा, आरतीच्या वेळी पंचवाद्य, कलाकारांचे गाणे, नर्तन, कीर्तन आणि वर्षाकाठी होणारे संगीत नाटकांचे कितीतरी प्रयोग अशा सांगीतिक वातावरणात ते वाढले. बालपणीच संगीताचे, नाटकाचे, कीर्तनाचे संस्कार सातत्याने होत गेले. ताल सूर गाणं वेगळं शिकावंच लागलं नाही. श्रवण व मनन आपोआप होत गेलं. वडील हेच त्यांचे पहिले गुरू. कीर्तनकार वडिलांच्या मागे ते झांज वाजवीत व साथही करीत. कीर्तनात चर्हाट लावायला किंवा लांबण करायला वेळ नसतो. सगळं काही आटोपशीर असावं लागतं. या वैशिष्ट्याचा नकळत परिणाम पुढे अभिषेकीबुवांच्या गायकीवर झाला.
दिवसभर शाळा, वेदपठण, आरती, भजन व कीर्तन झाल्यावर वडील रात्री साडेनऊ वाजता त्यांना गाणं शिकायला बसवीत. नित्यनेमाने गाण्याचा रियाज करून घेत. बंदिशींची संथा झाल्याशिवाय झोपायला देत नसत.
मंगेशीपासून जवळच पाच-सहा किलोमीटर अंतरावर नागेशी- बांदोडा गाव आहे. या गावात गिरीजाताई केळेकर राहत असत. गायनाच्या क्षेत्रात त्यांचा प्रचंड दबदबा होता. मराठी नाटकांतून त्यांनी संगीत भूमिकाही केल्या होत्या आणि नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. गिरीजाताईंची मोठी बहीण केशरबाई बांदोडकर ही मुंबईत होती आणि धाकटी दुर्गा केळेकरही तिच्यासोबत होती. (हीच दुर्गा केळेकर पुढे ‘ज्योत्स्ना भोळे’ या नावाने विख्यात झाली.)
वडिलांकडून मिळत असलेला संगीताचा ठेवा जपत असतानाच जितेंद्र अभिषेकी अधूनमधून गिरीजाताईंकडे जाऊन पुढचे धडे गिरवू लागले. गिरीजाताईंनी त्यांना रियाज शिस्तबद्धपणे कसा करावा हे शिकवले. हळूहळू त्यांच्या गायकीला आकार मिळू लागला.
अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले. पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते. नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. एक दिवस गंपू आपल्या एका कुळवाडी मित्रासोबत शिकारीला गेला. कोकणीत शिकारीला ‘कास’ म्हणतात. कासाला जाऊन सापडला काय तर ससा! दोघेही ससा घेऊन मित्राच्या घरी गेले आणि तिथे बनवलेल्या चमचमीत मटणावर गंपूने यथेच्छ ताव मारला. कुठून तरी ही गोष्ट बाळूबुवांच्या कानी पडली. वेदविद्यासंपन्न भटाच्या पोरानं मांसाहार भक्षण केला ही गोष्ट बाळूबुवांच्या जिव्हारी लागली. त्या तिरमिरीत ते गंपूला खडसावून बोलले. बोलण्यातला कुठला तरी शब्द गंपूला जिव्हारी लागला आणि त्याच रात्री नेसत्या वस्त्रानिशी त्यांनी गाव सोडला. मंगेशीहून निघाले ते तडक पुण्यात पोचले.
माधुकरी मागून शिक्षण
पुण्यात पाऊल ठेवताना जितेंद्रच्या मनात एकच विचार होता, आपण गायक व्हायचं. पुष्कळ शिकून पदवीधर व्हायचं. १९४३ ते १९४९ अशी सहा वर्षे त्यांनी पुण्यात काढली. अनाथ विद्यार्थिगृहाचा आसरा घेतला. माधुकरी मागून, वार लावू. खडतर परिस्थितीत शिक्षण व संगीत शिक्षण दोन्ही चालू ठेवले. गवई होण्याचं ध्येय अंतर्मनात पक्कं होतंच. त्यामुळं संगीत साधनेत अनंत अडचणी आल्या असतानाही खंड पडू दिला नाही. भास्करबुवा बखले यांचे शिष्य पं. नरहरबुवा पाटणकर हे पुण्यातले त्यांचे पहिले गुरू. नंतर पं. यशवंतबुवा मराठे यांच्याकडे जाऊन शिकू लागले. कडक शिस्त व कठोर मेहनत ही यशवंतबुवांची खासियत होती. पण अभिषेकींनी जिद्द सोडली नाही. १९४९ साली त्यांनी एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
जितेंद्र अभिषेकी यावेळी विशीच्या उंबरठ्यावर होते. पुण्याच्या महागाईत दिवस सारणे कठीण होऊ लागले त्यामुळे कॉलेजशिक्षण घेण्यासाठी त्यांनी बेळगावला जायचा निर्णय घेतला. बेळगावला कॉलेजमध्ये जाऊन वर्ष होतं न होतं तोच त्यांना टायफॉईडची जबरदस्त लागण झाली. टाईफॉईडचा तो ऍटॅक इतका जीवघेणा होता की अभिषेकींचा आवाज पूर्णपणे गेला. त्यांना गाताच येईनासे झाले. कंठातून सूरच उमटेनासे झाले. विषण्ण मनःस्थितीत, परिस्थितीपुढे हतबल होऊन त्यांनी मंगेशीला परत जाण्याचा निर्णय घेतला.
साताठ वर्षे रियाज करून कमावलेला आवाज काम करत नाही म्हणून अभिषेकी वैफल्यग्रस्त झाले होते. पण त्यांना आशेचा किरण दाखवला त्यांच्या बालवयातील गुरू गिरीजाताई केळेकर यांनी. गिरीजाताईंना विलायतखॉं व वझेबुवांची तालीम लाभली होती. त्या बळावर त्यांनी आवाज खुलवण्याच्या नव्या पद्धती अभिषेकींना दाखवल्या. हळूहळू त्यांचा आवाज सुधारला, पण पूर्वीचा पोत कायम राहिला नाही. त्याही परिस्थितीत जिद्दी जितेंद्रने हळूहळू आपले गमावलेले सांगीतिक सामर्थ्य पुन्हा मिळवले.
१९५२ साली बर्यापैकी आत्मविश्वास कमावल्यानंतर जितेंद्र अभिषेकींनी मुंबईला जायचा निर्णय घेतला. कुठे राहायचे हा प्रश्न पुण्याइतका मुंबईत जटिल नव्हता. कारण तिथे गिरीजाताईंच्या भगिनी केशरबाई (सुप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच्या मातोश्री) यांचे प्रशस्त घर होते. मुंबईत येऊन धडपडणार्या होतकरू तरुणांसाठी ते हक्काचे निवासस्थान होते. कविवर्य बा. भ. बोरकर हेसुद्धा उमेदवारीच्या काळात तिथेच राहायचे.
केशरबाईंच्या घरात कलाकारांची सतत ये-जा असायची. संगीतावर गप्पा व्हायच्या. मैफली झडायच्या. अनेकदा आकाशवाणीवर काम करणारे अधिकारी यायचे. अशाच काही अधिकार्यांच्या ओळखीने अभिषेकींना आकाशवाणीवर छोटे-मोठे कार्यक्रम मिळू लागले. मधल्या काळात संगीताचे शिक्षणही चालूच होते. मास्टर नवरंग यांच्याकडे सुमारे दीड वर्ष ख्यालगायकी व नाट्यगीतगायन यांचा अभ्यास त्यांनी केला. नंतर अझमत हुसेन खॉंसाहेबांकडे तालीम सुरू केली. खॉंसाहेबांकडे अनेक रागरागिण्यांचा खजिना होता. अगणित बंदिशींचा साठा होता. खॉंसाहेबांच्या बलपेचयुक्त गायकीचा त्यांना बराच फायदा झाला. त्यांची तान, आलापी, मांडणी आग्रेवाल्यांपेक्षा वेगळी होती. सुदैवाने अभिषेकींचा आवाजही आता सुधारला होता.
१९५५ साली अभिषेकी संस्कृत हा विषय घेऊन बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. याच सुमाराला आकाशवाणीवर कोकणी विभागात त्यांना नोकरी मिळाली. नोकरीमुळे जीवनात किंचित स्थैर्य आले. तिथे त्यांना खूप शिकायला मिळाले. त्याकाळी सर्वसामान्यांसाठी चित्रपट वगळता आकाशवाणी हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आकाशवाणीवर गायला मिळणे ही भल्याभल्या कलाकारांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट होती. त्यामुळे अभिषेकी आकाशवाणीवर अनेक महान कलाकारांच्या संपर्कात आले. याच काळात त्यांनी संगीतबद्ध करून स्वतःच गायिलेलं ‘त्या दिसा वडाकडेन गडद तिणसाना’ हे कविवर्य बोरकरांचं कोकणी गाणं आकाशवाणीवर अतोनात गाजलं.
आकाशवाणीच्या नोकरीनं अभिषेकींना स्थैर्य दिलं खरं, पण सतत घड्याळाच्या काट्याला जुंपला गेल्यामुळे त्यांच्यातला कलाकार गुदमरू लागला. रियाजाला पुरेसा वेळ मिळेनासा झाला. त्यांना काही आकाशवाणीवर कार्यक्रम निष्पादक व्हायचं नव्हतं; त्यांना व्हायचं होतं एक महान गायक कलाकार. शेवटी सारासार विचार करून त्यांनी आकाशवाणीवरच्या नोकरीचा राजीनामा दिला. आता मुंबईत पोट कसं भरायचं हा प्रश्न समोर ठाकला. दैवयोगाने त्याचवेळी संगीत नाटक अकादमीची २५० रुपयांची मासिक शिष्यवृत्ती मिळाली. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ख्यातनाम गायक व सव्यसाची गायनगुरू पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं. जगन्नाथबुवा म्हणजे साक्षात संगीतक्षेत्रातले महामेरू! ते फक्त आग्रेवाल्यांचीच गायकी गात नसत- इतर घराण्यांची वैशिष्ट्येही त्यांच्या गायनात होती. रियाज कसा करावा, मैफल कशी जमवावी या महत्त्वाच्या बाबींचे शिक्षण पुरोहितबुवांनी अभिषेकींना दिले. जितेंद्र अभिषेकी परिपूर्ण गायक बनले ते याच काळात. ही तालीम १९६८ साली बुवांच्या निधनापर्यंत चालू होती. मध्यंतरी पं. रत्नकांत रामनाथकर यांच्याकडूनही त्यांनी मार्गदर्शन प्राप्त केले. नंतर गुलूभाई जसदनवाला यांची तालीम दीड वर्ष घेतली. बाबा अजिजुद्दीन यांनीही काही काळ त्यांच्यावर ज्ञानाचा वर्षाव केला. या सर्वांकडून अभिषेकींनी चांगले वाटेल ते ते घेतले. पण एकूणच त्यांच्या गायकीवर छाप कायम राहिली ती पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांचीच.
१९५९ साली जितेंद्र अभिषेकी यांची पहिली स्वतंत्र मैफल कोल्हापूर येथे देवल क्लबमध्ये झाली. संगीताच्या प्रांगणात एक नवा गंधर्वच येऊन ठेपल्याची चुणूक त्या दिवशी अभिषेकींनी दिली. त्यानंतरच्या अवघ्या काही वर्षांतच ते ‘पं. जितेंद्र अभिषेकी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
तिलोत्तमा गायकी
पं. अभिषेकी आज आमच्यात नाहीत, पण त्यांच्या गायकीचा फार मोठा वारसा मागे शिल्लक आहे. या गायकीवर अजूनही म्हणावा तितका अभ्यास झालेला नाही. तो होणे गरजेचे आहे. अभिषेकींचे गाणे हे कुठल्याच एका घराण्याचे नव्हते. सर्व घराण्यांना अलगदपणे कवेत घेऊन खळखळत जाणारे गतिमान व प्रवाही असे त्यांचे गाणे होते. बुवा अनेकदा स्वतःच सांगायचे, ‘‘मी कुठल्याही घराण्याशी बांधिल नाही. माझे घराणे आहे ‘तिलोत्तमा’ घराणे!’’ ‘‘बुवा, हा काय प्रकार?’’ असे कुणी विचारले की ते मंद स्मितहास्य करून उत्तर देत, ‘‘एकदा इंद्राने म्हणे स्वर्गलोकांतील सर्वांत सुंदर अप्सरेची निर्मिती करायचे ठरवले. पण सर्वांत सुंदर अप्सरा घडवणार कशी? मग त्याने स्वर्गलोकांत तैनात प्रत्येक अप्सरेचे तीळ-तीळाइतके सौंदर्य घेतले आणि नवीन अप्सरा निर्माण केली. तीच ही तिलोत्तमा. तिला इंद्राने जशी कण-कण सौंदर्य घेऊन बनवली, त्याचप्रमाणे मीसुद्धा भोवतालच्या अनेक गुरूंकडून थोडं-थोडं घेत माझी वाटावी अशी गायकी बनवली आहे!’’
अभिषेकींच्या या तिलोत्तमा गायकीचा अनुभव ज्यांनी घेतलाय ते खरोखरच धन्य. बुवांनी मैफिल सजवली आणि ती रंगली नाही असे कधी झालेच नाही. कारण या मैफलीला नेहमी रंजकतेबरोबर व्यासंगी वैचारिक अधिष्ठानाची जोड होती. संस्कृत भाषेच्या अध्ययनामुळे त्यांची गायनशैली अधिक नेटकी व ओजस्वी झाली. साहित्याचा आस्वाद व संस्कृत काव्याचा अभ्यास यामुळे तिला आशयाची खोली लाभली. त्यांचे गाणे नुसत्या कंठातून कधी उमटले नाही, ते हृदयाच्या गाभार्यातून आले. पंडितजींनी सतत चोवीस तास संगीताचाच विचार केला. संगीताविष्कार असो की संगीतनिर्मिती, अभिजातता व संयम यांचे किनारे ओलांडून त्यांची गायकी कधी स्वैर धावली नाही. शुद्ध सूर आणि निकोप लय, ताल यांची सिद्धी त्यांनी तपश्चर्येने मिळवली. मनोहर कल्पनाविलास हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य तर होतेच, पण स्वरांचा अचूक लगाव व स्पष्ट शब्दोच्चारण यामुळे गायनातून भावसमाधी साधण्याची किमया त्यांना प्राप्त झाली होती. स्वतेजाने तळपणारा निकोप सूर लावला की पहिल्या क्षणापासूनच ते रसिकांना स्वरांच्या दुनियेत झुलवीत ठेवत. चिंतनशील कलाकार असल्यामुळे त्यांनी स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांची ज्ञानसाधना सदैव चौफेर व अष्टावधानी राहिली. आपल्या स्वतःच्या किमान ६० ते ६५ बंदिशी त्यांनी तयार केल्या. प्रचलित व अनवट अशा दोन्ही तर्हेच्या रागांमध्ये या बंदिशी आहेत. झीलफ, हेमंत, मधुरंजनी, रंगेश्वरी, अमृतवर्षिणी, देवताभैरव, सरस्वती या अनवट रागांतही त्यांनी बंदिशी बांधल्या. ‘शाम रंगीले’ या नावाने त्या बांधलेल्या आहेत. काही स्वतंत्र रागांचीही रचना पंडितजींनी केली आहे.
पं. जितेंद्र अभिषेकी यांची सांगीतिक जडणघडण आणि गायनशैली यांचा आढावा आपण या भागात घेतला. त्यांची रंगभूमीवरील सांगीतिक कारकीर्द आणि तिची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करूया पुढील भागात.