Home बातम्या स्वर्गलोकींच्या सूरशय्येवर अभिषेकी हा निजला रे…

स्वर्गलोकींच्या सूरशय्येवर अभिषेकी हा निजला रे…

0

विष्णू सूर्या वाघ

( भाग)

मीरा मधुराहे कानेटकरांचं नाटक १९७१ साली रंगभूमीवर आलं. त्याच्या पुढच्या वर्षी, म्हणजे १९७२ साली आणखी एक अनोखा नाट्याविष्कार घडला. रणजीत देसाई यांच्या हे बंध रेशमाचेया नाट्यकृतीचा. ‘हे बंध रेशमाचेहे फाळणीच्या पार्श्‍वभूमीवरील नाटक आहे. यातील सर्वच गाणी अतिशय गाजली. मात्र ही गाणी रणजीत देसाई यांची नव्हती तर शांताबाई शेळके यांच्याकडून ती लिहून घेतली होती. दोन बंदिशींची शब्दरचना मात्र पं. अभिषेकीबुवांनी स्वतःच केली होती. ‘रैन की बात मैं कासे कहूही आणि सजनबिन कैसे भई हूँ निरासही त्रितालातील बंदिश.

शांताबाईंची गीते उत्तमच होती आणि बुवांनी लावलेल्या चालीही कर्णमधुर होत्या. त्यातली सर्वच गाणी गाजली, पण खुद्द बुवांना मात्र नाटककार एक आणि नाट्यपदं लिहिणारी व्यक्ती दुसरी हा धेडगुजरी प्रकार तितकासा आवडला नव्हता. एका मुलाखतीत तर त्यांनी सरळ असं म्हटलंय की– ‘‘अशा प्रकारचं संगीत करताना मला असं जाणवलं की अशा वेळी एकसंधपणा राहू शकत नाही. रणजीत देसाईंचं नाटक आहे आणि गीतं शांताबाईंची आहेत. गीतं उत्तम आहेत नि मी संगीतही लोकांना आवडेल असंच दिलं आहे. त्यात मी टप्पाहा प्रकार वापरला आहे. ‘काटा रुते कुणालाही गझल त्या पद्धतीने स्वरबद्ध केली आहे. ‘छेडियल्या तारायाची चाल मी बडे गुलाम अलींच्या एका जुन्या बंदिशीच्या आधाराने पण मला हवे ते बदल करून बनवली आहे. तो सिंध काफी आहे. परंतु झालं काय की या सर्व चाली मैफलीत फार लोकप्रिय ठरल्या. नाटकात त्या किती परिणामकारक ठरल्या हे सांगणे जरा कठीण आहे.’’

आपलं संगीत हे नाटकासाठी आहे. नाटकाच्या प्रकृतीशी त्याचा मेळ बसला पाहिजे. संगीतामुळे नाट्यवस्तू उठावदार झाली पाहिजे याकडे पंडितजींचा किती कटाक्ष होता हे त्यांच्या वरील विधानावरून लक्षात येते.

हे बंध रेशमाचेनाटकात अमीर हा पाकिस्तानी गायक. त्याला हिंदुस्थानचा ओढा आहे. त्याचा एकेकाळचा गुरूबंधू श्रीकांत हा हिंदुस्थानात येऊन लाहोरच्या आठवणी कुरवाळीत बसला आहे. या दोन गायकांच्या वैचारिक संभ्रमाचे प्रतिबिंब त्यांच्या गायकीद्वारे उमटावे असा एक जाणीवपूर्वक प्रयत्न बुवांनी संगीतरचनेतून केला. अमीर हा पाकिस्तानी गायक आपल्या प्रत्येक गाण्यातून हिंदुस्थानातल्या वेगवेगळ्या गायकींना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, तर श्रीकांत हा पाकिस्तानी हिंदू निर्वासित पतियाळावाल्यांची पंजाबी गायकी टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करतो. श्रीकांतची भूमिका पं. वसंतराव देशपांडे करीत असत. सुरुवातीपासूनच ते तयार अशा पंजाबी ढंगात गायचे. ‘छेडियल्या ताराया दादर्‍यातील पदात पंजाबी ढंगाचा सुरेख उपयोग केला आहे. ‘क्षितिजाच्या पार दूर, मृगजळा येई पूरहा अंतरा ऐकताना त्याचा प्रत्यय येतो. याच्या उलट अमीरची भूमिका करणार्‍या रामदास कामतांना दिलेल्या दैव किती अविचारीया कबिराच्या भजनावर आधारलेल्या गाण्यात मराठी भजनाचा ढंग व राजस्थानी मांड पद्धतीचा सुरेल संगम साधला आहे. ‘संगीत रस सूरसहे अमीरचे पद जयपूर गायकीच्या वळणाचे आहे व त्याची पुरेपूर साक्ष बांधणीच्या डौलदारपणात दिसते. ‘आज सुगंध आला लहरतया श्रीकांतच्या गाण्याला टप्प्याची चाल असून ठेकाही पंजाबी आहे. ‘संगीत रस सूरसहे अमीरचे पद सावनी मिश्र रागातील आहे. ‘विकल मन आज झुरत असहायहे सरस्वती रागातील पद सजनबीन कासे भई निरासया बंदिशीवर आधारलेले आहे. ‘काटा रुते कुणालाहे धानी रागात आहे तर पथ जात धर्म किंवाया पदाला भैरवीची अप्रतिम बांधणी दिली आहे.

कट्यार काळजात घुसलीआणि हे बंध रेशमाचेया अभिषेकीबुवांनी संगीत दिलेल्या दोन्ही नाटकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे बुजूर्ग गायक वसंतराव देशपांडे यांनी त्यात वठवलेल्या भूमिका अतिशय गाजल्या. वसंतराव जितके उत्तम गायक होते तितकेच उच्च प्रतीचे नटही होते. त्यांची गायनाची स्वतंत्र शैली होती. स्टेजवरचं आपलं गाणं त्यांनी अभिनययुक्त तरीही थोडक्यात गोडीचं ठेवलं होतं. वन्समोअरच्याही भानगडीत ते कधी पडत नसत. गाणं रंगवून गायले की ते झपकन संपवून वसंतराव इतक्या सहजपणे आपला गद्य संवाद सुरू करत की प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्याचं भानही राहत नसे. असा नट हा संगीतकाराच्या दृष्टीने मोठा ऍसेट असतो. दुर्दैवाने अभिषेकींना त्यांच्या काळात जे नटनट्या लाभल्या त्यांतील बहुतेकांची गाण्यातील कुवत मर्यादितच होती. गाण्याची समज त्यांना असायची, आवाजातही सौंदर्य असायचं, परंतु रागदारीच्या दृष्टीनं त्यात स्वतःची साधना आणि प्रतिभा यांचा जवळजवळ अभावच होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पंडितजींना मनाला मुरड घालून स्वररचना करावी लागली. विशेषतः स्त्रीपात्रांच्या बाबतीत. त्यांच्या बहुतेक नाटकांत स्त्रीपात्रांना प्रायः सुगम संगीताच्याच चाली त्यांनी दिल्याचे जाणवते. यामागचं एकमेव कारण म्हणजे स्त्रीपात्रांची भूमिका करणार्‍या अभिनेत्रींचा मर्यादित सांगीतिक आवाका. फैयाजसारखी एखादी अभिनेत्री वगळली तर अभिषेकींना मिळालेल्या अन्य महिला कलाकार गाण्याच्या बाबतीत यथातथाच होत्या. त्यामुळे स्त्रीपात्रांची गाणी त्यांना सुगम धाटणीवर ठेवावी लागली. उदा. ‘मीरामधुरामधील मीरेची पदे, ‘मत्स्यगंधामधील सत्यवतीची पदे, ‘ययाती आणि देवयानीतील शर्मिष्टेची पदे, .

संगीताच्या बाबतीत स्वराभिषेकीठरलेलं आणखी एक नाटक म्हणजे अशोकजी परांजपे यांचं संत गोरा कुंभार.’ ‘संत तुकाराम’, ‘संत दामाजी’, ‘संत सखूया जुन्या संगीत नाटकांच्या परंपरेत एकदम फिट्ट बसणारं हे नाटक अशोकजी परांजपे यांनी लिहिलं आणि अभिषेकीबुवांनी त्याला तितकंच पारंपरिक वाटणारं संगीत दिलं. त्यातील अभंगांना अतिशय गोड व उठावदार चाली दिल्या. ‘निर्गुणाचा संग’, ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘कैवल्याच्या चांदण्याला’, ‘पाहू द्या रे मज’, ‘केशवाचे भेटीअशी एकाहून एक सरस गाणी त्यांनी बांधली. ‘उगी उगी बाळाही अंगाई व पूर्व दिशा उजळलीही भूपाळी अशी दोन्ही गीते रसिकांना अपार आवडली. प्रकाश घांग्रेकर आणि फैयाज यांच्यासारखे गाणारे कलाकार लाभल्यामुळे संगीताला अधिक उठाव मिळाला. बुवांचे शिष्य आणि आजचे आघाडीचे गायक पं. अजित कडकडे यांनी याच नाटकात नामदेवाची छोटी परंतु स्मरणीय भूमिका केली होती.

सन १९७६ साली नेपथ्यकार द. . गोडसे यांनी लिहिलेले धाडिला राम तिने का वनीहे पौराणिक नाटक रंगभूमीवर आले. संगीत अर्थात बुवांचेच होते. यातली बहुतेक सर्व गाणी गाजली. नाटकाचे प्रयोग मात्र फारसे झाले नाहीत. तरीही या नाटकातील गाणी आजही मैफलीत आवर्जून गायली जातात. ‘घाई नको बाई अशीहा दादरा व कधी भेटेन वनवासी रामचंद्रालाहे अरविंद पिळगावकर यांनी गायलेले सूर्यकंसरागातील गाणे आजही लोकप्रिय आहे. ‘लेवू कशी वल्कलाहे गाणे अमृतवर्षिणी रागात आहे. ‘मंद मंद ये समीरहे गाणे देवताभैरव या रागात आहे. ‘अवमानिता मीया गाण्याला किरवाणीचा साज आहे.

बिकट वाट वहिवाटहे व्यंकटेश माडगूळकरांचे एक प्रयोगशील नाटक. ‘लेकुरेच्या धर्तीवर पंडितजींनी या नाटकात लोकसंगीतावर बेललेलं संगीत दिलं पण ते रिकॉर्डेड होतं. यातली सर्व गाणी उडत्या बाजाची होती.

सोन्याची द्वारकाहे खरं तर जुन्या जमान्यातले नाटककार अनंत आळतेकर यांचे नाटक. तब्बल १९३२ साली लिहिलेलं. पं. अभिषेकी यांनी त्याला संगीताचा नवा साज दिला आणि १९७७ साली ते रंगमंचावर आले. मूळ नाटकात बरीच गाणी होती. पंडितजींनी ती कमी केली. दोन धैवतांचा बिभास, धनकोनी कल्याण, अभोगी इत्यादी रागांची उपयोजना केली. काही पारंपरिक चाली तशाच ठेवल्या. परंतु हे नाटक फार काही चालले नाही.

कांते फार तुलाहे बाळ कोल्हटकरांचे संगीत नाटक १९७८ साली रंगभूमीवर आले. या नाटकात शास्त्रीय पठडीतील संगीत गाणारे वडील व पॉप संगीताच्या नादाला लागलेला मुलगा अशी पात्रयोजना होती. त्यामुळे पाश्‍चात्त्य संगीत विरुद्ध भारतीय संगीत यांचे द्वंद्व हा नाटकाचा विषय ठरला. त्या अनुषांगाने कांते फार तुला’, ‘प्रिये पहाया जुन्या गीतांना उडत्या चाली लावून एक वेगळा प्रयत्न अभिषेकीबुवांनी केला, पण प्रेक्षकांनी तो फारसा मनावर घेतला नाही.

गोरा कुंभारच्या यशानंतर अशोकजी परांजपे यांनी आणखी एक नाटक लिहिले. त्याचे नाव होते महानंदा.’ या नाटकाचे मूळ नाव स्वप्न भंगले रात्रीअसे होते. पं. अभिषेकींचे संगीत लाभलेल्या या नाटकात एकूण १२ गाणी होती. यांपैकी हेमंत रागातील तुझिया चरणीचा दासहे गाणे खूप लोकप्रिय झाले. पण नाटकाचे प्रयोग फार झाले नाहीत.

देणार्‍याचे हात हजारहे बाळ कोल्हटकरांचे, पण असेच एक पडलेलेनाटक. संपूर्ण नाटकभर एक भुताचे पात्र दाखवले आहे. नाटकात स्टेजवर कोणी गात नसे पण पार्श्‍वगायनासाठीची गाणी स्वतः पं. अभिषेकी, अजित कडकडे व उषा पंडित यांच्या आवाजात रिकॉर्ड करण्यात आली होती.

१३ डिसेंबर १९८० रोजी कानेटकरांचे कधीतरी कोठेतरीहे नाटक मंचित झाले. रेश्मा नावाच्या पाकिस्तानी टोळीतील गायिकेच्या जीवनावरचे हे नाटक व्यावसायिक दृष्टिकोनातून अल्पायुषी ठरले. यातील छेडून गेले मधुर स्वरनिर्मलपरब्रह्म भेटीलागीही गाणी कधीतरी कोठेतरी ऐकायला मिळतात.

अभिषेकींच्या शेवटच्या कलापर्वात संगीताच्या दृष्टीने श्रवणीय झालेले तसेच रसिकांनी स्वीकारलेले नाटक म्हणजे अमृतमोहिनी.’ भस्मासुराची मध्यवर्ती भूमिका असलेले हे नाटक प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारले. भस्मासुराची भूमिका यात प्रसाद सावकार करायचे. त्याशिवाय नारायण बोडस, प्रकाश घांग्रेकर, अजित कडकडे व नृत्यांगना अर्चना जोगळेकर अशी तगडी कलाकारमंडळी नाटकात होती. जोडीला अभिषेकींचे श्रवणीय संगीत. मधुरंजनी रागात असलेले होसी कैसा भ्रांतचित्त तूहे गाणे खूप गाजले होते.

अमृतमोहिनीनाटकानंतर बुवांनी नाट्यसंगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात थोडा ब्रेक घेतला. थोडा म्हणजे जवळजवळ तब्बल एक तप. त्यांनी संगीत दिलेले शेवटचे नाटक १९९५ सालच्या जून महिन्यात रंगभूमीवर आले. हे नाटक होते वसंत कानेटकरलिखित तू तर चाफेकळी.’ बालकवींच्या जीवनावर आधारित या नाटकासाठी पारंपरिक पठडीतील संगीतापेक्षा वेगळे असे काही संगीत देण्याची गरज होती. पंडितजींनी शौनक अभिषेकी व देवकी पंडित यांच्या आवाजात गाणी ध्वनिमुद्रित करून ती रंगभूमीवर पार्श्‍वसंगीतासारखी वापरली. ‘जिने मला वेडे केले तिच्यावरीही फिर्यादया केशवसुतांच्या कवितेची स्वररचना अप्रतिम होती. या नाटकाच्या पार्श्‍वसंगीतासाठी पंडितजींना नाट्यदर्पण पुरस्कार मिळाला.

संगीतदिग्दर्शक म्हणून पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या कारकिर्दीचा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येते की अभिषेकी हे नुसते गाण्यांना चाली लावणारे संगीतकार नव्हते; नाट्यवस्तूची प्रकृती लक्षात घेऊन त्यानुसार संगीत देणे हे त्यांनी नाट्यसंगीताचे मुख्य सूूत्र मानले. त्यासाठी वेळोवेळी लेखक व दिग्दर्शकांशी संवाद साधला. सुदैवाने संगीताची चांगली जाण असणारे वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, अशोकजी परांजपे, वि. वा. शिरवाडकर यांच्यासारखे दिग्गज नाटककार त्यांना मिळाले. नाटक आणि संगीत यांचा परस्परांशी अंतःसंबंध कसा जुळला पाहिजे याची सूत्रे या संवादातून उलगडत गेली. ‘कट्यारसारखं नाटकसुद्धा संगीतामुळे चारपाच तास चालू राहता कामा नये याचं व्यवधान त्यांनी सांभाळलं. त्यासाठी तालमी चालू असतानाही पंडितजी हातात स्टॉपवॉच घेऊन बसत. संगीत देताना त्यांनी संपूर्ण काव्याचा विचार केला. अनेकदा चालीत अडसर निर्माण करणारे शब्द मूळ पदात असले तर त्यांनी लेखक वा कवीला सांगून ते बदलून घेतले. स्थायी आणि अंतरा यांचा एक सलग परिणाम व्हावा याकडे लक्ष पुरवले. गावती, सालगवराळी, बिहागडा यांसारख्या रागांची योजना नाटकातील संदर्भित भावनेला उठाव मिळावा या दृष्टिकोनातून केली. नाट्यसंगीतातील कर्मठ परंपरेला अभिषेकी कधी चिकटून बसले नाहीत, पण ती परंपरा पूर्णपणे लाथाडून जाण्याचाही प्रमाद त्यांनी केला नाही. अमुकच एक प्रकार म्हणजे नाट्यसंगीत हा साचेबद्ध विचार त्यांनी कधी केला नाही. पारंपरिक चौकटीत राहूनही नवीन काय करता येईल याचं संशोधन त्यांच्या मनात अखंडपणे चालत असे. ‘उद्याचं नाट्यसंगीत हे उत्कृष्ट संगीतानुकूल नाटकाची वाट पाहत थांबलेलं आहेहे त्यांचं निरीक्षण किती अचूक आहे!

पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या नाट्यसंगीताविषयी आणि त्यांच्या सांगीतिक प्रतिभेविषयी एवढ्या विस्तारानं लिहायचा अधिकार मला आहे की नाही हे मला ठाऊक नाही. मात्र एवढं खरं की सटीच्या देवळासमोर माझ्या बालपणी झालेल्या त्या मैफलीत मंचावर एखाद्या ऋषीप्रमाणे ध्यानस्त बसून सुरांचं चांदणं बरसवणारे पंडितजी अजून माझ्या आठवणीत आहेत. मनःपटलावर त्या दिवशी त्यांची जी मूर्ती ठसली ती कायमची. आजही ती मूर्ती जशीच्या तशी आहे. हृदयाच्या डोहामधून कंठातून घुमत बाहेर पडणार्‍या ओंकाराचा नाद आजही मला हर्षकंपित करतो. बुवांच्या गाण्याला म्हार्दोळच्या जाईचा सुगंध होता आणि आभाळाला भिडतानाही मंगेशीच्या भुईचा अनुबंध होता.

पं. जितेंद्र अभिषेकी म्हणजे संगीताच्या मोहमयी दुनियेतील एक अपूर्व मायाजाल. संगीत रसिक त्यांना कधीही विसरू शकणार नाहीत. अभिषेकी म्हणजे अक्षरशः स्वरांचे किमयागार! हलकासा बदल करूनदेखील प्रचलित रागात नवचैतन्य कसे आणावे याची साक्ष देणारा प्रतिभावंत. उदाहरणच द्यायचे तर मत्स्यगंधातला यमन ऐका (देवाघरचे ज्ञात कुणाला), ‘ययातीमधला तिलक कामोद ऐका (यती मन मम), ‘कट्यारमधला बिलावल (दिन गेले) किंवा वासवदत्तामधला सिंधुरा ऐका (तू येता सखी माझ्या जवळी). समेतला किंचित फरकही रागाला कसे सौष्ठव देतो त्याची ही मूर्तिमंत उदाहरणे. पं. जितेंद्र अभिषेकी म्हणजे अनवट रागही ललितमधुर शैलीत सादर करणारा स्वरसम्राट. ‘मीरा मधुरातला पंचम मालकंस (अशी सखी सहचरी), ‘कट्यारमधला सालगवराळी (घेई छंद), ‘वासवदत्तामधील अतिशय अवघड असा परज (कसा साहू उभयतातला दुरावा) आणि धाडिला राममधील कीरवाणी (अवमानिता मी झाले) या रचना अनुपमेयच म्हणाव्या लागतील.

पं. जितेंद्र अभिषेकी म्हणजे स्वररचनेचे नवनवे फुलोरे फुलवणारा ऋतुराज. ठुमरीपासून (गुंतता हृदय हेलागी कलेजवा कट्यार) टप्पा (आज सुगंध आलाहे बंध रेशमाचे), राजस्थानी मांड (तुझ्या अंगसंगानेमीरा मधुरा), दादरा (घाई नको बाई अशीधाडिला राम), अभंग (अवघे गर्जे पंढरपूर) ते लावणीपर्यंत (राया अशी जवळ मलाहे बंध रेशमाचे) उपशास्त्रीय प्रकारांचा अंतर्भाव बुवांनी नाट्यसंगीतात केला. भावगीतांच्या जवळपास जाणार्‍या अनेक रचना लोकप्रिय केल्या. जिने मला वेडे केले (चाफेकळी), गर्द सभोती (मत्स्यगंधा), तुझ्या यशाचा पुनवचांद (ययाती), पूर्व दिशा उजळली (गोरा कुंभार), होई मना मुदित आज (ययाती) ही नाट्यपदे म्हणजे या अलौकिक प्रतिभेचे अक्षय देणे आहे. आणि सर्वात शेवटी पं. जितेंद्र अभिषेकी म्हणजे भैरवीचा अनभिषिक्त बादशहा! पथ जात धर्म किंवा (हे बंध रेशमाचे), तम निशेचा सरला (ययाती), हरवले मधु मुरलीचे सूर (कट्यार), कैवल्याच्या चांदण्याला (गोरा कुंभार) आणि परब्रह्म भेटीलागी’ (कधीतरी कोठेतरी) हे त्यांचे भैरवीपंचक संगीताच्या नभांगणात सदोदित तळपत राहील यात शंका नाही.

पं. जितेंद्र अभिषेकी एक स्वरसंपन्न आयुष्य जगले. आपल्याकडचे ज्ञान त्यांनी मुक्त हस्ते वाहून टाकले. अनेक शिष्य घडवले. राजा काळे, प्रभाकर कारेकर, रामदास कामत, अजित कडकडे, फैयाज, देवकी पंडित, शौनक अभिषेकी, महादेव पेडणेकर, लक्ष्मीकांत सहकारी, चेडो परवार, विनोद पालयेकर, विजय कोपरकर, मेघन श्रीखंडे यांसारखे अनेक शिष्य आज अभिषेकींचे नाव गाजवत आहेत.

पंडितजी आज शरीरानं आमच्यात नाहीतपण स्वररूपाने ते कायम असतील. त्यांचं महानिर्वाण झालं त्यानंतर कला अकादमीत एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती. सुन्न मनाने त्या शोकसभेत बोलायला मी उभा राहिलो आणि आपोआप या कवितेच्या ओळी ओठांवर आल्या

स्वर्गलोकींच्या सूरशय्येवर

अभिषेकी हा निजला रे

मंगेशाच्या गर्भकुडीतील

लामणदीप हा विझला रे

गंधर्वाचे गाणे त्याचे

गंध सूरांना शुभ्र जाईचा

आभाळाला भिडतानाही

जपलेला अनुबंध भुईचा

निरंजनाचा व्याकूळ आत्मा

स्मृतीत त्याच्या भिजला रे!

मंगेशाच्या गर्भकुडीतील

लामणदीप हा विझला रे!

सूर तयाचा असा यायचा

कानाकाठी घुमवीत पावा

कैवल्याच्या डोहांमधूनी

ओंकाराचा नाद घुमावा

मुकी जाहली आज मांडवी

हवा किनारा तिजला रे!

मंगेशाच्या गर्भकुडीतील

लामणदीप हा विझला रे!

चंद्रकोष ते विणता विणता

घडवीत गेला नवे घराणे

गंगौघापरी खळखळणारे

गाऊनी गेला गूढ तराणे

नाद श्रुतींचे ऐकत ऐकत

मृत्यूसुद्धा थिजला रे!

मंगेशाच्या गर्भकुडीतील

लामणदीप हा विझला रे!