– सौ. पौर्णिमा केरकर
एखाद्या व्यक्तीचे आयुष्य, त्याचा संघर्ष, त्यातील चढ-उतार, या सगळ्यांत लपलेले जीवननाट्य रंगवत असता त्यामागे असणारी प्रेरणा, कष्टसातत्य व सगळ्याच गोष्टींना सकारात्मक सौंदर्यपूर्ण जीवनसंवेदना घेऊन पुढे जाणे होते, तेव्हा कटू अनुभवांची सोबत करावीच लागते. शेवटी हेच अनुभव काळाच्या कसोटीवर खरे उतरणारे ठरतात.
दुःखाचा कलश वाहून नेताना तो डचमळतो. आयुष्याची स्थिरस्थावर होताना, त्याच्यात जरी स्थिरता येणारी असली तरी मनाची उदासीनता अधिक आर्त होत जाते. एकूणच स्त्रीमनावर व्यवस्थेने घातलेली मर्यादा, तिची अगतिकता, व्यक्तिगत पातळीवरील अनेक मानहानिकारक प्रसंग यांतून वाट काढीत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने इतरांच्या मनात आदरत्वाचे स्थान निर्माण करून अढळपद स्वीकारणार्या माधवीताई देसाई आज आपल्यात नाहीत हे वास्तव पचविणे मनाला जड जाते खरे, पण त्या शांत, निरामय ज्योतीचे चैतन्य मनामनांना चेतविणारे आहे.
१९८८ साली ‘नाच ग घुमा’ प्रकाशित झाले आणि स्त्रीमनाचे सामर्थ्य, तिची ताकद, तिची लवचीकता, टणकता अधोरेखित झाली आणि असंख्य स्त्रीमनांना दिलासा मिळाला- ‘अरे हे तर माझ्याच जगण्याचे प्रतिबिंब आहे.’ स्वतःपलीकडे पाहणार्या ताईंनी सर्वसामान्य स्त्रियांना यामधून मोठा दिलासा दिला. ते त्यांचे आत्मचरित्र वाचत असताना ती नुसतीच एका आबीची, चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्या मुलीची, ‘स्वामी’कार रणजीत देसाईंची पत्नी, तीन मुलींची प्रेमळ माता एवढ्यापुरतीच मर्यादित राहत नाही तर घरासाठी, आत्मसन्मानासाठी ओठ मिटून सोसताना बाईचं जगणं असह्य ओझं बनतं. तिच्या मुकाट सहन करण्याच्या सवयीने ती आत घुसमटते. मन मोकळे केल्याने वेदनेचे ओझे कमी होते. ‘नाच ग घुमा’च्या माध्यमातून माधवीताईंनी जणू काही अशा असंख्यजणींना या घुसमटीतून मोकळं केलं आहे. बाईचे संसारासाठी राबणे, झिजणे, तिचे कोसळणे आणि परत नव्या हिमतीने उभे राहणे हाच तर तिचा जीवनप्रवास या आत्मचरित्रातून अधोरेखित होतो.
माधवीताईंच्या लेखनाचा प्रवास हा जीवनचिंतनातून जाणारा आहे. परंपरेने चालत आलेल्या काही रूढी, परंपरा, त्यांतील कर्मकांडे त्यांना मान्य नव्हतीच, पण म्हणून ती एकदमच तोडून टाकून नातीच विस्कटायची असा पवित्रा मात्र त्यांनी कधीच घेतला नाही. गुंतवळीत जगत जाताना मनासारखे काही घडत नसते; मन मारूनसुद्धा जगावे लागायचे. परंतु इतरांच्या सुखासाठी झिजण्याची शरीर-मनाला सवयच जडलेली होती. पदरात तीन मुली असतानाही त्यांनी केलेला दुसर्या लग्नाचा विचार सर्वसामान्यांच्या दृष्टीने टीकेचा विषय ठरला. एक व्यक्ती, तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, स्वत्व, अस्तित्व याची सोयीस्कर जाणीवच समाजाला ठेवावीशी वाटत नाही. तिने स्वतःच्या आवडीनिवडी सार्या मिटवून इतरांसाठीच झटायचे. या कर्तव्यात जराशी कुचराई झाली तरी बोल तिलाच लावले जातात. सगळ्यांचेच सारेच्या सारे अगदी चोख करूनसुद्धा दूषणे तिलाच. हे सारे असे का? असे माधवीताईंसारख्या संवेदनशील मनाला वाटते. त्याचे उत्तर त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याला धरूनच आहे. माणसांवरचा विश्वास, त्यांच्या शब्दांवरचा विश्वास, साहित्यावरचा विश्वास! कुणी कधी आपल्याला बनवेल हेच कधी मनाला पटत नाही. समोरचा माणूस जे बोलतो ते मी नेहमीच खरे मानते, माझे खरे मन त्याला सांगते. गोल गोल रिंगणात नाचणार्या घुमाची कहाणी ही खर्या मनाचीच कहाणी आहे. एखाद्या पुरुषाची प्रतिष्ठा, त्याचे मोठेपण, त्याचे कर्तृत्व, रूपरंग यांचा अभिमान बाईने मिरवायचा असतो; परंतु तिचे कर्तृत्व मात्र हेतुपुरस्सर डावलेले जाते तेव्हा तिच्या संवेदनांच्या उडालेल्या ठिकर्या सर्वांच्याच मनोरंजनाचा विषय ठरतो. शतकांच्या भारतीय स्त्री-मनाची ही शोकांतिका एकविसाव्या शतकातही बदलत नाही. परिस्थितीला सामोरी जाताना सारे बदल ती पचवते. प्रवाहाबरोबरीने वाटचाल करते. संस्कार, मूल्ये, प्रेम यांची जपणूक करीत मार्ग क्रमिते. एकटेपणात सोबत हवी असते. ही सोबतसुद्धा भरभक्कमपणाची. बाईने एकटे कसे जगायचे, पुरुषाचा आधार हवाच ना या विचारसरणीच्या काळात माधवीताईंचे ऐन तारुण्याचे दिवस गेले. त्यामुळे फक्त स्वतःच्या अस्तित्वाचा झगडा स्वीकारून स्त्रीत्व त्यांना शोधायचे नव्हते. सोबतीने जगायचे होते पण ते तेवढेच अर्थपूर्ण असायला हवे होते. पण ते झाले नाही. विचारी, हळव्या भावनाशील हृदयाची हाक कोणाला कळलीच नाही. पण या अनुभवातून तावूनसुलाखून बाहेर पडणे झाले. लखलखीतपणे पुन्हा एकदा नव्याने जगण्याकडे पाहता आले. गोल गोल रिंगण तोडण्याची धमक आली. त्यातूनच साकारला ‘नाच ग घुमा’चा हुंकार… आपण भोगलेलं, भोगत असलेलं दुःख आक्रमकरीत्या सांगितलं तरच ओझं हलकं होतं असं नाहीच मुळी, ही जाणीव त्यांना होतीच. सोसण्याच्या आणि जगण्याच्या घर्षणातून मनात एक ठिणगी निर्माण झाली. त्यातूनच स्फुरले आत्मचरित्र. आपल्या आतील काळोखाचे प्रदेश धुंडाळून, स्वतःला अख्खं सोलून काढून वाचकांसमोर ठेवायला धाडस लागतं. हे धाडस ताईंना परिस्थितीने बहाल केलेले आहे. त्यातच त्यांचा आत्मशोध होता. जाणिवांच्या वाटा प्रगल्भ होत गेल्या. आपले आणि सभोवतालच्या जगाचे नाते उलगडत गेले. आजूबाजूला सगळेच विस्कटत चालले असता व्यक्तिगत पातळीवरील स्थिरता माधवीताईंना खूप काही शिकवून गेली. जगण्याच्या वाटेवरील प्रगल्भतेचा शोध त्याचवेळी त्यांना लागला. एखादी गोष्ट मनावर घेऊन त्यात स्वतःला पुरते झोकून दिले. त्याचे ओझे मात्र त्यांनी कधी करू दिले नाही. अनुभवांचे आणि जगण्याचे सादरीकरण या आत्मचरित्रात आहे. ते एकाच स्त्रीभोवताली मर्यादित राहत नाही तर ते स्त्रीत्वाचे प्रातिनिधिक रूप घेऊन येते.
रिंगण तोडून मोकळा श्वास घेताना ‘गोमंत सौदामिनी’, ‘सूर्यफुलांच्या प्रदेशात’, ‘स्वयंसिद्धा आम्ही’ यांसारख्या पुस्तकांतून बदलत्या स्त्रीमनाची उत्तुंग कार्यशक्ती त्यांनी सर्वदूर पोचवली. या तळपत्या सौदामिनींच्या, सूर्यफुलांच्या प्रदेशात फेरफटका मारून इतरांप्रति असलेल्या आदरत्वाची झलकच दाखविलेली आहे. सुख-दुःखाची अटळता स्वीकारून जगण्याची आनंदयात्रा सकारात्मकतेने चालू ठेवून जगण्याला उत्कटतेने भिडणे म्हणजे काय असते हेच त्यांनी दाखवून दिले. वेदनेला तर त्यांनी आपल्या शांत, सौम्य, संयत शैलीत सजवलेले आढळते. तिथे आक्रस्ताळेपणा नाही. आसक्ती आणि विरक्ती यांचे एक वेगळे मिश्रण मला माधवीताईंच्या व्यक्तिरेखेत आढळलेले आहे. पहिल्या पतीच्या मृत्यूने तर त्या एकदमच एकट्या पडल्या. तीन मुली आणि वाट्याला आलेले वैधव्य. सभोवताली टोचणारा, बोचणारा, कुचेष्टा करणारा समाज. मग अशा परिस्थितीत भरभक्कम आधार हा पुरुषाचाच, असेच त्यांच्या मनाने घेतले.
सौंदर्याची मोहिनी त्यांना खुणावत असायचीच. गोवा, कोल्हापूर, बेळगाव, कल्याण, कोवाड या सार्याच जाग्यांशी आठवणींची नाळ घट्ट जुळलेली होती. तिथला निसर्ग, तिथली माणसे, तो तो प्रदेश याची आसक्ती त्यांना मनापासून होती. सौंदर्याच्या संवेदनांचा उत्सव त्यांनी साजरा केला होता. सामाजिक भानही होते. जीवनातील वास्तवाची जाणीवही त्यांना होती. सभ्य, घरंदाजपणाची ही आसक्ती- त्या आसक्तीची विरक्ती झाली. इथे विरक्ती म्हणजे आपल्या माणसापासूनचे दुरावणे नव्हते की नव्हते तुटलेपण. या विरक्तीतच आत्मशोध घेतला. दुःखभार पेलण्याचा आधार त्यांना लेखनानेच दिला. लेखन काही व्यक्तिगत वेदनेसाठी नव्हते तर अशा अनेकजणी ज्या सोसतात, पिचतात, सडतात, धडपडतात, परत नव्याने जगण्याला, जीवनाला सामोरे जातात अशांसाठी होते. त्यांनी स्वीकारलेल्या एकांताच्या विरक्तीतून त्यांना ही सर्जनशीलता प्राप्त झालेली होती. संघर्षाची वाट संवेदना जागवत जगल्या. स्वतः स्निग्धतेने तेवत राहिल्या इतरजणींना चेतवून, प्रज्वलित करून. व्यक्तिगत मोठेपणाचा अहंकार आणि बडेजाव त्यांनी कधीच मिरवला नाही. पिढीजात कलेचा वारसा, वाट्याला आलेला खानदानी अदबशीरपणा, एक सशक्त साहित्यिका असूनही इतरजणींचे गुण हेरून त्यांची व्यक्तिचित्रे रेखाटली हे त्यांचे मोठेपण. सोज्वळता, सात्त्विकता, नम्रता यांच्या जोडीनेच असलेली बंडखोरी! या बंडखोरीनेच त्यांना एक जिवंत भावना-संवेदनांची व्यक्ती म्हणून जगवले. स्त्रीला सारीच लेणी समाजपुरुषाने दिलेली असतात हा समज जो मनावर ठाण मांडून बसला होता तो निखळला. स्त्रीत्वाच्या अनेक कथा, अनेक कहाण्या जीवन थिजवून टाकणार्या त्यांनी अनुभवल्या. त्यांनीच लिहिलंय दिवसभर पावसात, उन्हात, थंडीत, शेतीत राबून. घरी आलं की रिकामे हंडे, कळश्या घेऊन नदीकडे धावणार्या त्या स्त्रिया बघून मन फाटून जायचं. इतक्या यातना भोगून त्या अजून जिवंत कशा? की सोसून सोसून त्यांच्या संज्ञाच मरून गेल्यात.
तुळशीजवळ पणती जळत असायची. त्यातूनच पाणी मुळाला न पोचलेली तुळस पानापानांतून ओणवी होत ताईंशी मनीचे हितगुज बोलायची. अनेक वेदनांची चित्रे त्यांनी सभोवताली अनुभवली होती. संस्कारांचे मणामणांचे ओझे बांधून घेतले होते. तरीही सार्याच जणी जगत होत्या. लोकलमधून प्रवास करणार्या, भरलेले पाण्याचे हंडे डोक्यावर वाहून नेणार्या, ऑफिसला जाणार्या… सर्वांच्या हृदयातील वेदना एकच होती. माधवीताईंच्या जगण्यातही दुःखाची हीच समांतर रेषा होती. रिंगणातच आयुष्य मर्यादित राहिलेलं, पण स्वतःच्या हिमतीने वेगळं केलं. विचारसौंदर्याची देणगी होती. सामाजिक सेेवेची, त्यातही स्त्रियांबद्दलची कणव होती. तळागाळातील स्त्रीसाठी तीळतीळ तुटणारा जीव होता. माणसं जोडण्याची विलक्षण हातोटी होती. त्या सोबतीनेच एक कार्यकर्तीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेली होती. त्याचेच फलित म्हणजे अनेक महिला संघटना, साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. अनेक कार्यकर्त्या, कार्यकर्ते घडवले. एका निश्चित दिशेने त्यांनी आपला मार्ग क्रमिला. संसाराचा, लेखनाचा, जीवनाचा प्रवास करताना प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. हे सर्व करीत असता जगण्यातील शिस्तही त्यांनी बाळगली. ती शिडशिडीत अंगकाठी, तेजस्वी डोळे, धारदार नाक, डोकीवरून ओढलेला पांढराशुभ्र पदर आणि आवाजातील मार्दव काळाच्या पडद्याआड निघून गेले. त्यांच्या स्वतःच्या जीवनचिंतनात त्या म्हणतात, ‘जीवनाच्या धाग्यांतला एखादाच धागा असा उसवून टाकता येतो का? तो उसवला तरी ती पोकळ वीण पोकळपणा जाणवू देणार नाही का?’ माधवीताई, तुमच्या निघण्याने तमाम गोमंतकीयांच्या मनात पोकळी निर्माण झालेली आहे. साहित्यशारदेचा गाभारा सुन्न झाला आहे. देणं, घेणं, जपणं, सुखावणं या संज्ञा तुमच्यापुरत्या संपून गेल्या आहेत. ज्यांना जे हवंय ते त्यांना देऊन, लळा, प्रेम, वात्सल्य देऊन तुम्ही या संसारातून मोकळ्या झालात आम्हाला ऋणात ठेवून! माधवीताई, तुमच्याच शब्दांत तुम्हाला विचारावेसे वाटते ः माणूस कुठं जातो मृत्यूनंतर? मग जर जायचंच तर येतो का? अन् स्नेहधागे जोडतो तरी का? तो जाणार… मी जाणार.. हे जर खरं तर मग हा सारा जंजाळ आपण निर्माण तरी का करतो? तुम्ही गेलात, तुमच्या न संपणार्या आठवणी मागे ठेवून. झिजलात, सोसलात, तरीही जगलात स्निग्धतेने. अतीव आपुलकीच्या नात्याने ओथंबून माणसांना, त्यांच्या समस्यांना, वेदनांना उरी कवटाळत जगलात. तुमच्या जगण्याची प्रेरणा-ज्योत सदैव तेवत राहील… सोसणार्या, वेदनेत भिजणार्या सार्याच स्त्रियांच्या अंगणातली तुळस बनून…