- डॉ. मनाली महेश पवार
खरं तर संपूर्ण स्वयंपाकघरच आपलं प्रथमोपचार केंद्र आहे; फक्त आपल्याला ते ज्ञात नाही. कसे वापरायचे? किती वापरायचे? कशावर वापरायचे? याचे योग्य ज्ञान नाही म्हणूनच या स्वयंपाकघरातील प्रथमोपचार द्रव्यांबद्दल थोडंसं जाणून घेऊया.
स्वयंपाकघरातील प्रथमोपचार द्रव्ये म्हटलं की पहिल्यांदा सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती हळद! कधी लागलं, खरचटलं, रक्तस्राव झाला की धावपळ करून प्रथम जखमेमध्ये हळद भरली जाते. हे दृश्य अगदी कॉमन आहे. पण खरं तर संपूर्ण स्वयंपाकघरच आपलं प्रथमोपचार केंद्र आहे; फक्त आपल्याला ते ज्ञात नाही. कसे वापरायचे? किती वापरायचे? कशावर वापरायचे? याचे योग्य ज्ञान नाही म्हणूनच या स्वयंपाकघरातील प्रथमोपचार द्रव्यांबद्दल थोडंसं जाणून घेऊया. कधीतरी प्रथमोपचार म्हणून डॉक्टरांकडे न्यायला उशीर होत असेल तर या ज्ञानाचा नक्की उपयोग होईल.
ओवा ः ‘पोट दुखेल तो ओवा मागेल’ ही म्हण सगळ्यांनाच माहीत आहे. प्रत्येकाने कधी ना कधी पोटदुखीवर ओवा खाल्लेला असणारच. पोट दुखायचं थांबलेलंही असेल. ओव्याला ‘यवानी’ असे म्हणतात. याचे तीन प्रकार आहेत- अजमोदा, किरमाणी ओवा आणि खुरासनी ओवा. ओवा चवीने तिखट, उष्णवीर्य, लघु, तीक्ष्ण आहे म्हणून तो दीपन, पाचन, रूची वाढविणे, वाताचे अनुलोमन, कफ कमी करणे, पोटदुखी, पोटातील आतड्यातील वायुगोळा, प्लीहावृद्धी व कृमीनाशनाचे काम करतो.
- तसेच ओवा हा संकोच-विकास प्रतिबंधक, उत्तेजक, दुर्गंधनाशक, गर्भाशय उत्तेजक व कफहर, ज्वरहर असा आहे.
- ओव्यात 5 टक्के सुवासिक व उडनशील तेल असते. ओव्यात मोहरीचा तिखटपणा, चिराईतेचा कडवटपणा व हिंगाचा संकोच-विकास बंधकपणा हे धर्म एकत्रित आहेत.
- ओवा बाळंतिणीस अवश्य द्यावा, ही पूर्वजांनी सांगितलेली रीत खूप महत्त्वाची व गरजेचीसुद्धा आहे. ओव्यामुळे तिला भूक लागते, अन्न पचते, वारा सरतो, कटीतील पीडा कमी होते आणि विटाळ साफ होतो.
- सूतिकाज्वरात ओवा फारच हितावह आहे. पाव चमचा ओवा चावून खाऊन वर गरम-गरम पाणी पिल्याने ताप कमी होतो व लगेच घाम येतो.
- उलटी, अपचन, पोटफुगी, संडासला घाण वास येणे, पोटदुखी या रोगांत तात्पुरता लगेच आराम मिळतो.
- ओव्यामुळे कफातील दुर्गंधी, सूक्ष्म रोगजंतू कमी होतात.
- फुफ्फुस विकारात ओवा चावून खाल्ल्यामुळे कफ उत्पन्न होण्याचे प्रमाण कमी होते. कफ ढिला होतो, तो लवकर पडतो.
- दम्यामध्ये ओव्याचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.
- घश्याची सूज असल्यास पूर्वी ओवा चिलिमीतून देत असत.
- किरमाणी ओव्यामध्ये सँटोनाईन नावाचे गुणकारी घटकद्रव्य आहे. हा ओवा पोटातून घेतल्यास बारीक कृमी, थ्रेड वर्म्स नष्ट होतात.
- ओवा औषधी म्हणून कसा सेवन करावा?
- ओवा तव्यावर थोडासा गरम करून 2-3 ग्रॅम या मात्रेत सकाळी व संध्याकाळी पाणी वा दुधाबरोबर सेवन करावा. सर्दी, पडसे व पोटाच्या आजारात लाभदायक.
- 2 ते 3 ग्रॅम ओवा पावडर ताकाबरोबर सेवन केल्यास पेटातील कीडे नष्ट होतात.
- 10 ग्रॅम ओवा 1 लिटर पाण्यामध्ये शिजवून पाणी 1/4 उरेपर्यंत शिजवावा. हे उरलेले पाणी गाळून सकाळी-संध्याकाळी प्रसूत स्त्रीला दिल्यास प्रसूतीजन्य विकार नष्ट होतात. वाढलेले शरीर सुस्थितीत व्हायला मदत होते.
- 10 ग्रॅम ओवा बारीक पावडर करून त्यात लिंबाचा रस घालावा. त्यात 5 ग्रॅम तुरटी घालावी. ताकात हे मिश्रण घोळून चांगले केसांना चोळल्यास केसांतील उवा, लिखा व कोंडा नष्ट होतो.
- आम्लपित्त किंवा ॲसिडिटीमध्ये 1 चमचा ओवा एक ग्लास पाण्यात शिजवून ते पाणी एक चतुर्थांश उरेपर्यंत आटवावे. मग ते पाणी गाळून कोमट असतानाच सकाळी व रात्री अर्ध्यातास खाण्याअगोदर प्यावे.
- 1 चमचा ओवा व अर्धा चमचा हळद 1 ग्लास पाण्यात एक चतुर्थांश उरेपर्यंत उकळावे व कोमट असतानाच त्यात 1 चमचा मध घालून सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर सेवन केल्यास कफयुक्त खोकल्यामध्ये लाभ मिळतो. छातीमध्ये जखडलेल्या कफाला ओवा बाहेर काढतो.
- 20 ग्रॅम ओवा 100 मि.ली. मोहरीच्या तेलात दहा मिनिटे बारीक मंदाग्नीवर शिजवावा. नंतर थंड झाल्यावर गाळून तेल सुरक्षित ठेवावे. तेलाचे 2-2 थेंब रोज कानांमध्ये घातल्यास बहिरेपणामध्ये उपयुक्त ठरतात. तसेच कानदुखी असल्यास आराम मिळतो.
- 10 ग्रॅम ओव्यामध्ये 100 ग्रॅम गूळ घालून छोट्या-छोट्या वाटाण्याच्या आकाराच्या गोळ्या बनवून सुरक्षित ठेवाव्यात. नंतर ही गोळी सकाळ-दुपार-संध्याकाळ एक-एक गरम पाण्याबरोबर घ्यावी. याने उदर कृमीमध्ये लाभ होतो. साधारण रोज एक आठवडा याचा प्रयोग करावा.
- सगळ्यात महत्त्वाचा प्रथमोपचार म्हणजे ज्यांना दारू पिण्याची इच्छा होते, त्यांनी अर्धा किलो ओवा 4 लिटर पाण्यात चांगला शिजवावा. 2 लिटर मिश्रण शेष उरेपर्यंत आटवावे. मग हा काढा चांगला गाळून ठेवावा. हा काढा एक-एक कप प्रतिदिन जेवणाअगोदर घ्यावा. याने लिव्हरचे कार्य सुधारते व दारू पिण्याची इच्छा कमी होते. दारू सोडायची इच्छा असणाऱ्यांनी हा प्रथमोपचार जरूर करून पाहावा.
- आले-सुंठ
रोजच्या स्वयंपाकात आवर्जून वापरले जाणारे दुसरे द्रव्य म्हणजे आले. आयुर्वेदीय औषध योजनेत आले हे प्रमुख औषध नसून ते एक सहाय्यक द्रव्य म्हणून प्रामुख्याने अनुपानार्थ वापरतात. सुकवून तयार केलेल्या आल्यास ‘सुंठ’ म्हणतात.
- सुंठीत उडणारे तेल आहे. सुंठ सुगंधी, उष्ण, वायुनाशी, दीपन, संकोच-विकास प्रतिबंधक, उत्तेजक आणि श्लेष्मघ्न आहे.
- सुंठीत पचनक्रिया चांगली राहते, पोटात वायूचा संचय होत नाही.
- सुंठ उष्ण व वातहर आहे, त्यामुळे सर्व विकारांत वापरता येते. म्हणूनच सुंठीला महौषधी असे नाव आहे.
- सुंठ वापरताना ती खूप जुनी नसावी. कारण सुंठीत जे उडनशील तेल असते ते बरेच दिवस राहिल्यास अत्यंत उपयुक्त तेल नाहीसे होते.
- सुंठ ही वीर्यवर्धक, वृष्य आहे. लैंगिक कमजोरीमध्ये आल्याचा रस किंवा सुंठ चूर्णाचा वापर करून पाहावा.
- वजन वाढवण्यासाठी 1 भाग आले स्वरस, दोन भाग साखर व तीन भाग दूध असे एकत्र मिश्रण मंदाग्नीवर आटवावे. त्याच्या वड्या थापाव्या व पेढा-बर्फीपेक्षा अत्यंत रूचकर व हवाहवासा वाटणारा ‘आलेपाक’ नक्की खावा.
- आमवाताच्या रुग्णांनी सुंठीचे पाणी सदासर्वकाळ प्यावे.
आले/सुंठ कशाप्रकारे सेवन करावी?
- जेवणापूर्वी आल्याचा तुकडा सैंधव लावून खाल्ल्याने भूक लागते व जेवणानंतर खाल्ल्याने पचन चांगले होते.
- 2 चमचे आल्याचा रस व अर्धा चमचा मध मिश्रण करून घेतल्याने सर्दी, पडसे, तापामध्ये आराम मिळतो.
- थंडीच्या दिवसांत दात दुखत असल्यास आल्याचा तुकडा दातात धरून ठेवावा.
- आले थोडेसे गरम तव्यावर शेकून खाल्ल्याने त्रासदायक खोकलासुद्धा कमी होतो.
- 2 ते 3 ग्र्रॅम सुंठ पावडर व 1 ग्रॅम दालचिनी दूध किंवा पाण्याबरोबर सेवन केल्यास हृदयशूलांमध्ये लाभ होतो.
- आल्याच्या रसात लिंबाचा रस घालून पिल्यास मंदाग्नी दूर होतो.
- लठ्ठपणात दोन ग्लास पाण्यात 5 ग्रॅम आले कुटून टाकावे. चांगले उकळून ते कोमट असता त्यात 1 चमचा लिंबाचा रस व 1 चमचा मध घालून सकाळी उपाशीपोटी प्यावे.
- 1 चमचा आल्याच्या रसात चार-पाच चमचे नारळाचे तेल घालून चांगले हातापायांना मालीश करावे. हातापायाची जळजळ याने कमी होते.
- छोटा आल्याचा तुकडा एक कप पाण्यात चांगला उकळावा. कोमट झाल्यावर त्यात एक चमचा मध घालावे व सकाळ-संध्याकाळ उपाशीपोटी घ्यावे. याने लिव्हर सिरोसिसमध्ये लाभ होतो.
- लहान मुलांना हगवण लागली असता एक छोटा चमचा आल्याचा रस, 1 चिमुट दालचिनी पावडर, एक चिमुट हळद एकत्र घ्यावे व त्यात 1 चमचा मध घालावे. हे मिश्रण 2-3 वेळा बाळाला द्यावे.
(क्रमशः)