स्वमालकीच्या जमिनीतील अनधिकृत घरे नियमित करणार

0
10

>> अर्ज प्रलंबित ठेवणार नाही; मुख्यमंत्र्यांची साळगाव येथे ग्वाही

स्वतःच्या जमिनीत असलेल्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी अर्ज करूनही घर क्रमांक मिळालेला नाही, अशी प्रकारची कोणतीही बांधकामे घर क्रमांकाविना प्रलंबित ठेवली जाणार नाहीत. स्वतःच्या मालकीच्या जमिनीत जर घर असेल, तर ते नियमित केले जाईल. त्यासाठी कोणीही चिंता करण्याची गरज नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज येत्या तीन महिन्यांत निकालात काढले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

साळगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, सुशासन व जनकल्याण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेत लोकांची गाहाणी ऐकली आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण केले. यावेळी आमदार केदार नाईक, साळगाव सरपंच लुकास रेमेडिओस, पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी साळगाव पंचायतीमधून राज्यातील स्वयंपूर्ण मित्र, ग्रामपंचायतीचे सरपंच, पंच यांच्याशी आभासी पद्धतीने संवाद साधला. राज्यातील 410 महसुली गावांमध्ये नागरी सेवा केंद्र (सीएससी) उभारण्यात येणार असून, गावांमध्ये लोकांना सरकारी सेवांचा लाभ घेता येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कुशल मनुष्यबळ निर्मितीची नितांत गरज आहे. सरकारी योजना सर्व लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.