22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

स्वबळावर लढण्यास सज्ज, परंतु युतीसाठी दारे खुली

>> भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

भारतीय जनता पक्ष आपल्या स्वतःच्या भरवशावर गोव्याची निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की आम्ही आमची दारे बंद केली आहेत. पण आता तरी आमची कोणत्याही पक्षाशी बोलणी सुरू नाहीत, असे स्पष्टीकरण भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवप्रभाशी बोलताना दिले.

मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांच्याशी मुंबईत झालेली आपली भेट ही दोन पक्षांमधील अधिकृत बैठक नव्हती. त्यांचा व आपला जुना परिचय असल्याने ही अनौपचारिक बैठक झाली असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आप आणि तृणमूल कॉंग्रेसचा जोरदार प्रवेश गोव्यात यंदा झालेला आहे. त्याचा परिणाम भाजपच्या मतांवर कितपत होईल या प्रश्नावर श्री. फडणवीस यांनी तसा काही परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. एक तर भाजपला मतदान करणारे जे मतदार आहेत, त्यांच्यावर तृणमूलचा काही परिणाम होईल असे वाटत नाही. जी आक्रमकता तृणमूल दाखवतोय तीही लोकांना आवडेल असे नाही. त्यामुळे तृणमूलच्या आगमनाचा फार काही परिणाम गोव्यात दिसणार नाही आणि झाला तरी तो भाजपच्या मतांवर नसेल असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

भाजपच्या अंतर्गत काही धुसफूस चालू आहे. माजी मुख्यमंत्री पार्सेकर, मायकल लोबो, उत्पल पर्रीकर आदी नेते अस्वस्थ आहेत, ती प्रभारी म्हणून आपण योग्य प्रकारे हाताळू शकाल काय या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, निवडणुकीमध्ये निवडणूक लढविण्याची अपेक्षा, इच्छा अनेकांची असू शकते आणि ते स्वाभाविक आहे. परंतु त्यातील व्यवहार्य काय आहे हे पाहून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. ज्यांना समजावयाचे असेल त्यांना समजावू असेही ते पुढे म्हणाले.

एका व्यक्तीने दोन पदे घेऊ नयेत हे भाजपचे अधिकृत धोरण असताना गोव्यात काही दांपत्यांना उमेदवारी देण्यास पक्ष तयार आहे का यावर फडणवीस यांनी सांगितले की, एका कुटुंबात जास्त तिकिटे देऊ नयेत हे भाजपचे अधिकृत धोरण आहे. पण त्याचवेळी गोव्याचा एक राजकीय वारसा आहे, त्यात काही अपवाद आहेत. परिस्थिती असेल तेव्हा तिचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागतात. तसे ते घेतले जातील.

येत्या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे कोणते असतील ह्या प्रश्नावर स्थिर सरकार आणि विकास हा आमचा मुद्दा राहणार आहे असे फडणवीस म्हणाले.

म्हादई, खाण, कॅसिनो असे प्रश्न भाजपला सोडवता आले नाहीत. त्याचा विपरीत परिणाम निवडणुकीत दिसेल का ह्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. म्हादई हा विषय नाही. तो वर्षानुवर्षे चाललेला आहे. आम्ही या प्रश्‍नांसंदर्भात जे करू ते गोव्याच्या हिताचे करू हे लोक जाणतात. त्यामुळे त्याचा फार परिणाम होणार नाही असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला.

गृहमंत्री अमित शहा आज गोव्यात

ज्येष्ठ भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज १४ ऑक्टोबर रोजी गोवा दौर्‍यावर आगमन होत आहे. भाजपचे गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे काल गोव्यात आगमन झाले. अमित शहा यांचे आज सकाळी ९ वा. गोव्यात आगमन होईल. त्यानंतर धारबांदोडा येथे राष्ट्रीय फॉरेन्सिक विद्यापीठाची त्यांच्या हस्ते पायाभरणी होईल.

नंतर ते दुपारी २ वाजता कुर्टी-फोंडा येथे पशू संवर्धन अतिथी गृहाजवळील एनएफएसयूसाठी ट्रान्झिट बिल्डिंगचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी ४ वाजता ते ताळगांव येथील सभागृहात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नंतर संध्याकाळी ७ वाजता ते मेरियॉट हॉटेलमध्ये मंत्री आणि भाजप आमदारांची बैठक घेऊन निवडणूकाविषयक रणनीती ठरवणार आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस व सी. टी. रवी हेदेखील उपस्थित असतील. उद्या ते दिल्लीला प्रयाण करतील.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION