स्लॅब कोसळून एक कामगार ठार; दोघे जखमी

0
6

>> मांगोरहील-वरुणापुरी येथील घटना; जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू

मांगोरहील वरुणापुरी येथील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमधील धोकादायक घोषित केलेल्या नौदलाच्या एअर क्राफ्ट इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला, तर दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले. स्लॅब कोसळून मडकई येथील खेमकांत नारायण नाईक (50) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत साई महाले (रा. काणकोण) व बाबासाहेब सांगले (मूळ रा. महाराष्ट्र) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत.

सविस्तर माहितीनुसार, नौदलाची एअर क्राफ्ट इमारत अंदाजे 50 वर्षे जुनी असून, ती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. नौदलाच्या या इमारतीला पालिकेचा कोणत्याच प्रकारचा परवाना नसतानासुद्धा नौदलाकडून त्या इमारतीत कामकाज चालू होते. काल सकाळी 8.25 च्या सुमारास हे तिघेही कामगार त्या इमारतीत असलेल्या रजिस्टर बुकवर सही करण्यासाठी आले होते. मात्र गेट बंद असल्याने ते तिथेच उभे होते. सदर इमारतीत कामगारांसाठी सह्या मारण्यास रजिस्टर ठेवला होता. पंचिंग मशीन बंद असल्याने ते रजिस्टरवर सही करून दुसरीकडे जाणार होते. इतक्यात सदर इमारतीचा स्लॅब या तिघांवर कोसळला आणि एकाचा नाहक बळी गेला व दोघे गंभीर जखमी झाले.

स्लॅब कोसळल्याची माहीती नौदलाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला कळताच त्यांनी स्लॅब खाली सापडलेल्या तीनही जखमी कामगारांना प्रथम उपचारासाठी नौदलाच्या वास्को येथील जीवंती इस्पितळात दाखल केले. तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी खेमकांत नाईक याला मृत घोषित केले. गंभीररित्या जखमींना प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी बांबोळी गोमेकॉमध्ये पाठविण्यात आले. जखमी साई महाले यांच्या दोन्ही पायांवर स्लॅब कोसळल्याने त्याच्यावर गोमेकॉमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांनी दिली.