स्मृतितरंग

0
53
  • ज. अ. रेडकर

कुडाळेश्वर मंदिरात आज येणे हा केवळ योगायोग म्हणा किंवा काही म्हणा; परंतु या मंदिराच्या काही खास आठवणी आहेत आणि त्यातील एक आठवण म्हणजे सुप्रसिद्ध कवी, नाटककार, कथाकार चिंतामणी त्र्यंबक खानोलकर म्हणजेच चिं. त्र्य. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचा या मंदिराच्या माडीवरून सुरू झालेला लेखन प्रवास…

आज २६ एप्रिल रोजी मी कुडाळ येथील कुडाळेश्वर मंदिराच्या प्रांगणात उभा आहे. तुम्ही म्हणाल, यात काय मोठेसे? कोणत्याही मंदिरात असे अनेकजण उभे असतात, बसलेले असतात. त्यात तुम्ही वेगळे काय केले, असा प्रश्‍न कुणाच्याही मनात येईल यात शंका नाही. मात्र कुडाळेश्वर मंदिरात आज येणे हा केवळ योगायोग म्हणा किंवा काही म्हणा; परंतु या मंदिराच्या काही खास आठवणी आहेत आणि त्यातील एक आठवण म्हणजे सुप्रसिद्ध कवी, नाटककार, कथाकार चिंतामणी त्र्यंबक खानोलकर म्हणजेच चिं. त्र्य. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचा या मंदिराच्या माडीवरून सुरू झालेला लेखन प्रवास. आज त्यांचा ४६ वा पुण्य स्मरण दिवस. २६ एप्रिल १९७६ रोजी त्यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी मुंबईच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपली साहित्यप्रतिभा सजग ठेवली होती, हे पुढील प्रसंगावरून दिसून येते.

खानोलकर अत्यवस्थ होते, जणू अखेरच्या घटका मोजत होते आणि अशा वेळी त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्यांना विचारले, ‘‘खानोलकर, तुमची अखेरची इच्छा काय आहे?’’ चिं.त्र्य.नी त्याही अवस्थेत डॉक्टरच्या ऍप्रोनला अडकवलेले पेन घेतले, आरोग्य ग्राफचे पॅड बाजूला होते ते घेतले आणि त्यावर पुढील ओळी लिहिल्या :
अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सराव प्रवास सारा
या ओळी त्यांनी लिहिल्या आणि त्यांच्या हातातील पेन गळून पडले. त्यांची प्राणज्योत त्यांच्या या अखेरच्या ओळीनिशी पंचतत्त्वात विलीन झाली. समोरचे डॉक्टर, परिचारिका या प्रसंगाने पुरत्या चक्रावून गेल्या नसत्या तरच नवल! सर्वांच्याच डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
चिं.त्र्य. हे एक उत्कृष्ट नाटककार, एक उत्तम कथाकार तथा कादंबरीकार आणि ‘आरती प्रभू’ या टोपणनावाने कविता लिहिणारे कलंदर कवी होते. या सर्व साहित्यप्रकारांत त्यांनी अद्भुत साहित्यनिर्मिती केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला तालुक्यातील तेंडोली या एका लहानशा खेड्यात ८ मार्च १९३० रोजी चिंतामणी यांचा खानोलकर कुटुंबात जन्म झाला. आर्थिक परिस्थिती जेमतेम. १९३७ साली खानोलकर कुटुंब सावंतवाडी येथे स्थलांतरित झाले. त्र्यंबकरावांनी तिथे भुसारी दुकान सुरू केले. परंतु वर्षभरात ते बंद पडले आणि त्यांनी ‘शांतीनिवास’ नावाने खानावळ सुरू केली. १९४५ पर्यंत खानोलकर सावंतवाडीत राहिले आणि पुनश्च आपल्या मूळ गावी आले. या दरम्यान चिं.त्र्यं.चे सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूलमध्ये १ ली ते ४ थीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या वर्गात झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईच्या सिटी हायस्कूलमध्ये दाखल झाले. परंतु १९४८ साली मॅट्रिकच्या वर्गात असतानाच अचानक घरी येण्याचा त्यांनी निर्णय घेतला व एक वर्ष जाऊ देऊन १९४९ साली कुडाळ हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा दिली. पण ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.

१९५० साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आता घर कसे चालवायचे, हा मोठा प्रश्‍न खानोलकर कुटुंबासमोर होता. १९५१ साली त्यांच्या आई सुनंदाबाई यांनी कुडाळ येथे ‘वीणा गेस्ट हाऊस’ सुरू केले. चिंतामणी आईला या कामात मदत करू लागला. त्याचवेळी गल्ल्यावर बसून कथा लिहिणे, कविता रचणे हे त्याचे उद्योग सुरू झाले. कुडाळातील कुडाळेश्वर मंदिर हे त्याचे आवडते आणि प्रेरणादायी ठिकाण होते. येथे उत्सवप्रसंगी होणारी दशावतारी नाटके, सप्ताह काळात होणारी कीर्तने यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. मार्च १९५१ च्या ‘सत्यकथा’ मासिकात त्यांची ‘जाणीव’ ही कथा छापून आली, तर फेब्रुवारी १९५४ च्या ‘सत्यकथा’ मासिकात ‘शून्य शृंगारते’ ही पहिली कविता ‘आरती प्रभू’ या टोपणनावाने प्रसिद्ध झाली. (अनेक वाचकांचा ‘आरती प्रभू’ म्हणजे कवयित्री असा गोड गैरसमज झाला होता.) ‘सत्यकथा’सारख्या प्रतिष्ठित आणि दर्जेदार मासिकात कथा-कविता छापून येणे ही त्यावेळची अभिमानास्पद गोष्ट मानली जात असे.

१९५९ मध्ये वीणा गेस्ट हाऊस बंद पडले. दरम्यानच्या काळात चिं.त्र्य. यांचा विवाह झाला होता. पुत्रप्राप्ती झाली होती. संसार चालवायला काहीतरी करायला हवे होते म्हणून त्यांनी मुंबई गाठली. लोणावळा येथील वसतिगृहाची देखभाल करण्याची नोकरी त्यांना मिळाली, परंतु आठच दिवसांत नोकरी सोडून ते मुंबईला परतले. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ओळखीने त्यांना मुंबई आकाशवाणी केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नोकरी मिळाली. परंतु त्यांचे दुर्दैव असे की, त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचा आरोप ठेवून त्यांना ऑक्टोबर १९६१ मध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात आले. याच दरम्यान १९५९ साली त्यांचा ‘जोगवा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. मराठी साहित्यरसिकांनी त्या संग्रहाचे जोरदार स्वागत केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावरील नोकरी गेल्यानंतर साहित्यनिर्मिती हाच त्यांनी आपला पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून स्वीकारला.
‘एक शून्य बाजीराव’, ‘सगेसोयरे’, ‘अवध्य’, ‘कालाय तस्मै नम:’, ‘हा न्याय वर्तुळाचा’ ही त्यांची नाटके एकामागोमाग एक गाजली. ‘जोगवा’ (१९५९) या कवितासंग्रहाने त्यांना कवी म्हणून ओळख दिली होती. १९६२ साली ‘दिवेलागण’ आणि १९७५ साली ‘नक्षत्रांचे देणे’ हे आणखी दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आणि ‘आरती प्रभू’ हे नाव सर्वोमुखी झाले.
‘रात्र काळी, घागर काळी’ (१९६२), ‘अजगर’ (१९६५), ‘कोंडुरा’ (१९६६), ‘त्रिशंकू’ (१९६८), ‘गणुराय आणि चानी (१९७०) आणि ‘पिशाच्च’ (१९७०) या कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या नाटकांवर आणि कथा-कादंबर्‍यांवर हिंदी, मराठी आणि तेलगू भाषेत चित्रपट निर्माण झाले.

असा हा हरहुन्नरी कवी, नाटककार, कथा-पटकथाकार वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी हे जग सोडून गेला. कोणत्याही विषयाची पदवी नसताना, इंग्रजी माध्यमाच्या मॅट्रिक परीक्षेत नापास झालेल्या या माणसाने वीस ते पंचवीस वर्षांच्या काळात विपुल आणि दर्जेदार मराठी साहित्यनिर्मिती केली, ही नवलाई म्हणायला हवी. कुडाळेश्वराच्या साक्षीने १९५०-५१ साली सुरू झालेला त्यांचा लेखनप्रवास मुंबई महानगरात २६ एप्रिल १९७६ रोजी थांबला.

नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या मान्यवर संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मरणार्थ २०१३ सालापासून चिं. त्र्य. खानोलकर पुरस्कार सुरू केला. या पहिल्याच पुरस्काराचे मानकरी ठरले गोव्याचे भूषण, नामवंत कवी, नाटककार आणि वक्ता दशसहस्रेषु स्वर्गीय विष्णू सूर्या वाघ. कुडाळ हायस्कूलच्या सभागृहात २८ एप्रिल २०१३ रोजी संपन्न झालेल्या या अभूतपूर्व सोहळ्याचा मी एक साक्षीदार होतो.
कुडाळेश्वराच्या मंदिरात उभा असताना हा सगळा इतिहास नजरेसमोरून चित्रफितीसारखा झरझर तरळून गेला.