चेंडूशी छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची तर चेंडू कुरतडणारा कॅमरुन बॅन्क्रॉफ्ट याच्यावर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काल बुधवारी जाहीर केला आहे. या त्रिकुटाला बंदीच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळता येणार नाही. या तिघांच्या आयपीएलसारख्या खासगी लीगमधील सहभागाबद्दल मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोणतीही बंदी लादलेली नाही.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने दक्षिण अफ्रिकेविरोधातील तिसर्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याती कबुली दिल्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगत हादरले होते. कॅमेर्यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे कृत्य कैद झाले असल्यामुळे त्यांना प्रतिवाद करण्यासही काही वाव उरला नव्हता. स्मिथ, उपकर्णधार वॉर्नर व बॅन्क्रॉफ्ट या तिघांवर कारवाई होणार हे नक्की होते, फक्त काय कारवाई होणार ते स्पष्ट नव्हते. स्मिथ, वॉर्नर आणि बॅन्क्रॉफ्ट हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमावलीतील कलम २.३.५ नुसार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत.
आयपीएलमधूनही डच्चू
ऑस्ट्रेलियाचा बंदी घालण्यात आलेला कर्णधार स्टीव स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या मोसमात खेळण्यापासून बंदी घालण्याचा निर्णय काल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केला. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी.के. खन्ना, आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआयचे हंगामी खजिनदार अमिताभ चौधरी यांनी संयुक्तपणे पत्रक काढताना स्मिथ व वॉर्नरवरील बंदीची माहिती दिली. राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांना स्मिथ व वॉर्नरच्या जागी बदली खेळाडू निवडण्याची संधी दिली जाणार आहे.
रेनशॉ, मॅक्सवेल, बर्न्सला संधी
स्टीव स्मिथ, कॅमरुन बॅन्क्रॉफ्ट व डेव्हिड वॉर्नर यांच्या जागी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सलामीवीर मॅट रेनशॉ व ज्यो बर्न्स तसेच मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांना दक्षिण आफ्रिकेला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी या त्रिकुटाला निवडण्यात आले आहे.
२१ वर्षीय रेनशॉ मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. खराब फॉर्मच्या कारणास्तव त्याला ऍशेस मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. रेनशॉ याने यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये लागोपाठ तीन शतके लगावली आहेत. त्याने क्वीन्सलँडकडून खेळताना व्हिक्टोरियाविरुद्ध १७०, दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११२ व पश्चिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १४३ धावा ठोकून आपला फॉर्म परत मिळविला आहे. टी-२० स्पेशलिस्ट ग्लेन मॅक्सवेलने इंग्लंड व न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आपल्या झकास फॉर्मचे दर्शन घडविले आहे. तर बर्न्स याला शेफिल्ड शिल्डमधील न्यू साऊथ वेल्स व टास्मानियाविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केल्याचा फायदा झाला आहे. मॅक्सवेल मागील वर्षी बांगलादेशविरुद्ध तर बर्न्स २०१६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात शेवटचा कसोटी सामना खेळला होता. बर्न्सच्या नावावर १३ कसोटीत ३ शतके व ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

