‘स्मार्ट’ खेळखंडोबा

0
5

पणजी स्मार्ट सिटी बनवण्याची उच्च न्यायालयाने घालून दिलेली अंतिम तारीख उलटून गेली तरीही अद्याप स्मार्ट सिटीच्या कामांचा खेळखंडोबा सुरूच आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि. चे सीईओ मात्र नव्वद टक्के कामे पूर्ण झाली असून केवळ दहा टक्के कामे मागे उरली असल्याची शेखी पत्रकार परिषदेतून मिरवताना दिसले. जनतेला एप्रिल फूल करण्याचा हा प्रकार होता की काय नकळे, परंतु पणजीतील स्मार्ट सिटीची कामे एक तर अपूर्णावस्थेत आहेत नपेक्षा ती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत हे जनतेला उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत असताना नव्वद टक्के कामे पूर्ण झाल्याचे सांगणे ही सरळसरळ जनतेच्या डोळ्यांत धूळफेक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रमुख शहरे ‘स्मार्ट’ बनवण्याची योजना घोषित केली त्याला आता दशक उलटून गेले आहे. पणजीसोबतची त्या यादीतील सर्व शहरे स्मार्ट बनली, पण पणजी मात्र पूर्वी होती त्यापेक्षा अधिक गलीच्छ आणि ओंगळवाणी करून टाकली गेली आहे हे स्पष्ट दिसते. मांडवी नदीकाठच्या ह्या सुंदर शहराची रयाच ह्या सगळ्या अर्धवट टाकलेल्या कामांनी घालवली आहे. मध्यंतरी पणजीच्या उपनगरांमध्ये कामे रेंगाळली तेव्हा उच्च न्यायालयात हा विषय पोहोचला. शेवटी न्यायमूर्ती स्वतः रस्त्यावर उतरले, तेव्हा कुठे त्या कामांना वेग आला आणि कामे धडाधड पूर्ण केली गेली. आता उपनगरे सोडून मुख्य पणजी शहरामध्ये स्मार्ट सिटीची गोगलगाय डुलत डुलत आली आहे. पणजी शहर हे पोर्तुगीजकालीन नियोजनबद्ध शहर. पावसाचे पाणी वाहून नेणारी भूमिगत गटार यंत्रणा ह्या शहरामध्ये पूर्वापार आहे. कितीही पाऊस झाला तरी पणजी बुडत नव्हती ही पोर्तुगीजकालीन वास्तुकलेची कमाल होती. रायबंदर पाटो पूल हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण. खुद्द पणजी शहरातही हीच स्थिती होती. मात्र, नंतरच्या काळात अतिक्रमणे आणि बेबंद बांधकामे यामुळे पणजीच्या मूळच्या भूमिगत व्यवस्थेची विल्हेवाट लावली गेली आणि जरासा पाऊस झाला की दुकानांतून पाणी शिरू लागले. स्मार्ट सिटी बनवण्याच्या नावाखाली सध्या जी काही कामे हाती घेतली गेली आहेत ती इतक्या बेंगरूळपणे केली गेली आहेत की उद्या पहिल्या पावसात पणजीचे काय होणार ही चिंता नागरिकांना सतावते आहे. शहर स्मार्ट बनवण्याच्या नावाखाली प्रत्येक रस्त्याखालून वाहिन्या टाकल्या गेल्या आहेत. परंतु त्यामुळे रस्त्यांचे पृष्ठभाग खडबडीत झाले आहेत. पदपथ उखडून टाकले गेले आणि त्यांच्या जागी नवे टाइल्स रचले गेले. परंतु त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले स्पष्ट दिसते. सिमेंटचा वापर यथातथाच आहे. सर्वत्र धूळ आणि धूळ पसरली आहे. अल्पावधीत हे टाइल्स उखडले जातील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. पणजीच्या नागरिकांची सोय गैरसोय न पाहता एकाचवेळी सर्व रस्ते खोदण्याचा पराक्रम ‘इमॅजिन पणजी’ने केला. कोणता रस्ता कुठे बंद आहे आणि कोठून कुठे जायचे हेच नागरिकांना त्यामुळे कळेनासे झाले. पणजीतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून जी एकमार्गी व्यवस्था केली होती, तिचा तर पार बोजवारा उडाला आहे. कोणत्याही वाहतूक नियमांचे पालन आज शहरात होत नाही. स्मार्ट सिटीची कामे रेंगाळली आहेत हे न्यायालयाच्या लक्षात येऊ नये म्हणून घाईघाईने अपूर्ण रस्त्यांवर डांबराचे थर चढवण्यात आले असले, तरी ना त्यांना समपातळी, ना काही शिस्त. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी उंचसखल भाग निर्माण झाले आहेत. रस्त्याकडेच्या पदपथांची कामे तर अजूनही पूर्ण झालेली नाहीत. पणजी शहरातील प्रमुख रस्ते म्हणजे अठरा जून मार्ग, आत्माराम बोरकर मार्ग, पांडुरंग पिसुर्लेकर मार्ग वगैरे मार्ग हे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत येत नाहीत असे सीईओंनी नुकतेच सांगून टाकले आहे. पणजी शहर जर स्मार्ट बनवायचे असेल तर त्याचे सर्वच मार्ग स्मार्ट सिटीखाली यायला नकोत काय? हे मार्ग त्यातून वगळण्याचे कारण काय? अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद भले केली गेली असेल, परंतु स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत पणजीतील सर्वच रस्ते यायला हवे होते, तरच त्या कामांत एकवाक्यता दिसली असती. सांतिनेज भागातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले गेले आहेत आणि खुद्द पणजीतले रस्ते मात्र डांबरीच ठेवले गेले आहेत. जे डांबरीकरण झाले आहे तेही बेशिस्तीत झाले आहे. अनेक रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. काही ठिकाणे अजूनही खोदकामे चाललेली दिसतात, परंतु ती आमची नव्हेत असे स्मार्ट सिटीवाले सांगत आहेत. अशा प्रकारची सगळी अंदाधुंदी जर अजूनही कायम असेल तर ‘स्मार्ट’ बनले ते काय? स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा आजवर झालेला आहे. परंतु प्रत्यक्षात हा स्मार्टनेस शहरात नावालाही दिसत नसेल, तर अर्थ काय राहिला? स्मार्ट सिटीचा हा पोरखेळ आता आवरता घेण्याची वेळ निश्चितच आली आहे.