>> वीजपुरवठा खंडित झाल्याने विमानसेवा, वाहतुकीवर परिणाम
युरोपातील तीन प्रमुख देशांमध्ये काल अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. युरोपातील स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्समध्ये अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने याचा मोठा फटका विमानसेवा, मेट्रो आणि वैद्यकीय क्षेत्राला बसला. हा वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र सध्या वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
युरोपीय देश स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्समध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील सिग्नल यंत्रणा बंद पडली. परिणामी मेट्रो सेवा थांबली, तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रुग्णालयांमध्ये जनरेटरच्या साहाय्याने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. तसेच अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना संगणक बंद ठेवण्याचे आणि विजेचा वापर जपून करण्याचे निर्देश देण्यात आले. स्पेनमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या वीज पुरवठ्यामुळे फ्रान्समधील काही शहरंही प्रभावित झाली आहेत.
स्पेनच्या राष्ट्रीय ग्रीड ऑपरेटर ‘रेड एलेक्ट्रिका’ ने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत समन्वय साधून तातडीने पाऊले उचलली जात आहेत. दुसरीकडे, पोर्तुगालच्या ग्रीड ऑपरेटर ‘ई-रेडेस’ ने सांगितले की, युरोपातील वीज ग्रीडमध्ये झालेल्या बिघाडामुळे हे संकट ओढवले आहे. प्राथमिक माहितीनुसार, व्होल्टेजमधील असमतोलपणामुळे युरोपीय देशातील संपूर्ण वीज व्यवस्था कोलमडली.

