– पी. ए. सूर्यवंशी
लहानपणापासूनच हिमालय जवळून पाहावा हे माझे एक स्वप्न होते. कारण हिमालय हे शिवशंकराचे आदिस्थान म्हणून बर्याच पौराणिक कथा लहानपणी वाचल्या होत्या. पाचवीच्या पुस्तकात जगातील सर्वात उंच शिखर ‘एव्हरेस्ट’ चढून जाणारे सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनझिंग यांची साहसकथा वाचली होती. तारुण्यात ‘चल चल रे काठमांडू, मिलेंगे तुझे शंभू’ या गाण्याने काठमांडू व हिमालयाचे आकर्षण वाढविले होते.
अन् हा योगायोग जुळून आला आणि आनंद गगनात मावेनासा झाला. ‘गोवा हस्तकला महामंडळा’ने येथील २० कलाकारांना नेपाळ हस्तकला प्रदर्शनासाठी आमंत्रित केले होते व त्यात सुदैवाने माझा नंबर लागला होता. गोव्याच्या एप्रिल–मेच्या गरमीचे चटके सहन करत आम्ही सर्व कलाकार ठरलेल्या दिवशी काठमांडूच्या ‘त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर पोहोचलो. विमानतळाबाहेर एक नेपाळी महिला चहा विकत होती. काठमांडूच्या गारेगार वातावरणात गरमागरम चहा प्यायला मन अधीर झाले म्हणून मी एक पेला चहा घेतला व तिला दहा रुपयांची नोट दिली. तर तिने माझ्या हातावर नेपाळी सहा रुपये परत ठेवले. नंतर मला कळले की, भारतीय शंभर रुपयांना नेपाळी एकशे आठ रुपये मिळतात. मात्र पाचशे व हजाराच्या भारतीय नोटा तेथे चालत नाहीत. बाकी इतर नोटा नेपाळी व्यापारी आनंदाने स्वीकारतात.
काठमांडूमध्ये फिरताना जाणवले की, येथील सामान्य जनता गरीब व कष्टाळू असून पोशाख व संस्कृती भारतीयांप्रमाणेच आहे. लिपी हिंदीच्या खूप जवळची वाटते. स्थानिक लोक आम्हाबरोबर हिंदीतून सहज संवाद साधत होते. तेथील लोक मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगतात– ‘आम्ही जगाच्या डोक्यावर राहतो.’ अर्थात सर्वात उंच ठिकाणी राहतो.
काठमांडूमध्ये रोज सर्वांबरोबर स्थानिक मार्गदर्शक घेऊन आम्ही प्रदर्शनाला जाणे, आपली चित्रे व हस्तकलेच्या वस्तू विकणे हे सर्व चालू होते. एक दिवस रात्री आमच्या हॉटेलवर आमच्या गाइडने माहिती दिली की, ‘प्रदर्शन पूर्ण संपल्यानंतर कोणाला जर एव्हरेस्ट (स्थानिक नाव ‘सागर–माथा’) बघायचे असेल तर ठरावीक रक्कम भरून २९,०२८ फूट उंचीवरचे एव्हरेस्ट तसेच गौरीशंकर, कांचन गंगा, माकालू मिळून महत्त्वाची हिमालयातील २० शिखरे विमानाने पाहता येतील.’ आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असे वाटले. आलेल्या संधीचे सोने करायचे ठरवून मी लागलीच होकार दिला.
ठरलेल्या दिवशी मी व इतर मोजके सहकारी पहाटे सहा वाजता काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर पोहोचलो. विमानतळावरील सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही आत शिरलो. ‘बुद्ध’ एअर लाइन कंपनीची छोटी–छोटी अनेक विमाने पाण्यात पांढरेशुभ्र बगळे जसे उभे असतात तशी विमानाच्या धावपट्टीवर उभी होती. आमच्या ठरलेल्या विमानात आम्ही सर्व मिळून वीस पर्यटक स्थानापन्न झालो. प्रत्येकाला एक–एक खिडकी बाहेरचे दृश्य पाहण्यासाठी मिळाली होती. आमच्याबरोबर काही विदेशी पर्यटकही आपापले कॅमेरे घेऊन सज्ज होते.
बरोबर साडेसहा वाजता दोन पायलट व एक हवाईसुंदरी असलेल्या आमच्या छोट्या ‘बुद्धा’ने टेक ऑफ घेतले आणि काही मिनिटांतच जेथे दूरपर्यंत नजर जात होती तेथपर्यंतचा अथांग हिमालयाचा शुभ्रधवल सागर दृष्टीस पडला. वाटले आपण स्वर्गात तर पोहोचलो नाही ना? वेगळ्या ग्रहावरील परिराज्यात तर आलो नाही ना? ज्यावेळी सहप्रवाशांच्या कॅमेर्यांचे ‘क्लिक क्लिक’ आवाज कानी पडले तेव्हा कोठे भानावर आलो. हवाईसुंदरीने जवळ येऊन खिडकीतून बोटाने दाखविले– ‘समोर दिसते ते गौरीशंकर शिखर.’ अन् ते शिखर पाहताना माझ्या तोंडातून सहजच ‘ॐ नमः शिवाय’ उद्गार बाहेर पडला. महादेवांनी हे शिखर एकांतासाठी आपले वसतिस्थान म्हणून का निवडले असेल याची प्रचिती आली. (तेथील स्थानिकांची अशी धारणा आहे की ‘गौरीशंकर’ पर्वत चढणारा परत कधीच येत नाही.)
आता मात्र मी पण माझे छायाचित्रांचे यंत्र बाहेर काढले व खिडकीतून तसेच वैमानिकाच्या ‘कॉकपीट’मधून समोरील मनमोहक दृश्याची अनेक छायाचित्रे माझ्या कॅमेर्यामध्ये बंदिस्त केली. हवाईसुंदरी हिमालयातील महत्त्वाच्या २० शिखरांची माहिती देत होती. (प्रत्येकाकडे २० शिखरांचा नकाशा विमानात बसल्याबरोबर दिला गेला होताच.)
आता मात्र तो सुवर्णक्षण जवळ आला. सुदैवाने मी त्यावेळी दोन वैमानिकांच्या मध्ये कॅमेरा घेऊन उभा होतो. त्यातील एका वैमानिकाने सांगितले की, समोरील पर्वतरांगांमध्ये उंचच उंच दिसतो तो ‘एव्हरेस्ट’! सर्व आजूबाजूच्या शिखरांमध्ये नयनरम्य एव्हरेस्ट एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखा अचल उभा होता. त्या पृथ्वीवरील सर्वात उंच शिखराचे अनिमिष नेत्रांनी मी दर्शन घेतले!
हवाईसुंदरी प्रत्येक पर्यटकाला एक–एक करून विमानाच्या कॉकपीटकडे बोलावीत होती व दोन्ही वैमानिक पण समोर येणार्या शिखरांची माहिती प्रत्येकाला देत होते. वाटत होते समोरील हा ‘नजारा’ कधी संपूच नये, असाच डोळ्यांसमोर कायम राहावा. पण कसे शक्य आहे? प्रत्येक चांगल्या गोष्टीला पण अंत हा असतोच. विलोभनीय एव्हरेस्ट दर्शनानंतर आमचे हवाईजहाज परतीच्या मार्गाला लागले होते. जवळजवळ ४०० किलोमीटर अथांग पसरलेल्या अनेक शिखरांनी युक्त हिमालयाचे दर्शन झाले होते. विमानातील सर्वच पर्यटकांचे चेहरे एका वेगळ्याच समाधानाने फुलले होते. जणू काही ‘एव्हरेस्ट’ शिखर सर केल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर झळकत होता. आम्ही एव्हरेस्ट चढलो नव्हतो, पण नयनचक्षूंनी स्पर्श निश्चितच केला होता.
एका वेगळ्याच धुंदीत आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. विमानाने ‘यू टर्न’ घेऊन काठमांडूच्या दिशेने निघण्यास सुरुवात केली होती. सहप्रवाशांमध्ये विमान धावपट्टीवर लागण्याआधी जास्तीत जास्त फोटो काढण्याची चढाओढ लागली होती. मी मात्र बाहेरील ‘धवलशुभ्र स्वप्न’ जास्तीत जास्त डोळ्यांत साठविण्याचा प्रयत्न करत होतो व वाटत होते हा प्रवास कधी संपूच नये. पण कसले काय? विमानाच्या गोलाकार खिडकीतून काड्यापेटीप्रमाणे दिसणारी काठमांडूतील घरे, बंगले, राजवाडे दिसू लागले व आमचे ‘बुद्ध’ विमान धावपट्टीवर टेकलेसुद्धा!
हवाईसुंदरीने आमचे सर्वांचे आभार मानले. ‘एव्हरेस्ट’ पाहिल्याचे प्रमाणपत्र आमच्या हातावर ठेवले व म्हटले ‘गुड बाय!’ त्या प्रमाणपत्रात लिहिले होते– ‘आज मी एव्हरेस्ट शिखर चढलो नाही, पण निश्चितच हृदयाने त्याला स्पर्श केला!’ डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा मात्र जीवनातील एक अत्युच्च आनंदाचा क्षण होऊन गेला… हृदयाच्या कोंदणात कायमचा जपून ठेवण्याजोगा!