Home बातम्या स्नेह जपूया… सौख्य वाढवूया… संदेश मकर संक्रांतीचा मनामनांत रुजवूया…

स्नेह जपूया… सौख्य वाढवूया… संदेश मकर संक्रांतीचा मनामनांत रुजवूया…

0

सौ. पौर्णिमा केरकर

आपल्या प्राचीन संस्कृतीत माणसाच्या भाग्यविधात्या देवदेवतांची जागा पक्ष्यांनी घेतलेली आढळते. नागर असो वा आदिवासी, लोकमानसाच्या धार्मिक श्रद्धेत पक्ष्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. राजस्थानमधील भिल्ल आदिवासी लोकांमध्येही काळ्या रंगाच्या काही पक्ष्यांना देव मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. अशा पूजाविधीतून वैयक्तिक आणि समूहमनाच्या भावभावनांना पडताळून शकून-अपशकूनविषयी सजगता दाखविली जाते.

मकर संक्रांतीचा सण हा तर भिल्लांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा. याच दिवशी भिल्ल ‘श्याम-चिरैया’ या पक्ष्यांची वैशिष्ट्यपूर्ण रीतीने पूजा करताना दिसतात. पौषातील मकर संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीच या पक्ष्यांच्या शोधाची मोहीम सामूहिकरीत्या राबविली जाते. ‘फदका’ म्हणजेच पक्षी, त्याचप्रमाणे ‘श्याम-चिरैया’ला ‘दिवी’ असे संबोधले जाते. हा पक्षी शुभशकुनी असून एखाद्या चांगल्या कार्यासाठी बाहेर पडल्यावर हा पक्षी एखाद्याला आडवा गेला व उजवीकडे वळून आवाज करू लागला तर तो चांगला शकून मानला जातो. या पक्ष्याच्या अशा कृतीमुळे इच्छिलेले कार्य पूर्णत्वास येते असा समज आहे. हा शुभशकून मिळेपर्यंत भिल्ल आपल्या कार्याला सहजासहजी प्रारंभ करीत नाहीत. संक्रांतीचा दिवस तर भिल्लांच्या जीवनशैलीत नववर्षाचा आरंभच जणू काही! मकर संक्रांतीला श्याम-चिरैयाच्या दर्शनाची तयारी सुरू होते. त्यासाठी हे लोक प्रत्येक कुटुंबाकडून मका एकत्र करून सहभोजन करून तयारीला लागतात.

सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रांतीचा. हा एक सण त्याचपद्धतीने एक पुण्यपर्व म्हणून आपल्या संस्कृतीत त्याला महत्त्वाचे स्थान आहे. संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांत दिवसा असेल तर पुढच्या चाळीस घटका व रात्री असेल, म्हणजे दुसर्‍या दिवशी तिचा पुण्यकाळ असतो असे मानले जाते. उत्तरायणाचा हा आरंभदिवस असल्याने या संक्रांतीला ‘अयनसंक्रांती’ असेही म्हटले जाते. याच कालखंडात जो मनुष्य तिलमय धेनूचे दान करेल त्याला परमसुख प्राप्त होऊन, त्याची सर्व कामे सहजतेने पार पाडली जातात. याच काळात शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे लावावे, काळ्या तिळांचा लेप अंगाला लावून स्नान करावे, तीळदान करावे. समुद्रस्नान ‘सोमारी’च्या माध्यमातून केले जाते, ते पवित्र स्नान मकर संक्रांतीला केले जायचे. अतिशय प्राचीन असलेला हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. तो साजरा करण्याच्या प्रथा-परंपरा वेगवेगळ्या असतीलही, परंतु स्नेहवृद्धीचा वारसा जतन करायला लावणारा हा सण ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ हा सौहार्दाचा संदेश द्यायला विसरत नाही.

‘संक्रांती’ ही देवी असून तिने केलेल्या संकरासुराच्या वधामुळे ती संक्रांती, तर दुसर्‍या दिवशी ‘किंक्रांत’- ती किंकरासुराच्या जाचातून सर्वांची सुटका केली म्हणून. पण त्यातही हा करिदिन कोठेही बाहेर पडण्यास निषिद्ध मानला जातो. जाती-जमाती, धर्म-पंथ या सर्वांना स्नेहमयी धाग्यात गुंफणारा हा सण प्रांत प्रदेशापरत्वे विभिन्नतेने जरी साजरा केला जात असला तरी त्याला वेढून राहिलेला आनंद अविस्मरणीय असाच आहे. त्यातही हा निखळ आनंद आदिवासी भिल्ल जसा घेतात, ती निर्व्याजता इतर कोठे अभावानेच आढळते.

सर्वसाधारणपणे मकर संक्रांतीला गावच्या देवाला तीळ, तांदूळ वाहिले जातात. त्या दिवशी ‘खिचडी’चा उफार करून घरातील सात कोनाड्यांना दाखविला जातो. देव्हार्‍यात ‘सुगड’ ठेवून त्याची पूजा केली जाते. नव्या नवरीची पहिली संक्रांत तर सुगड दानाच्या तयारीनिशीच साजरी होते. ब्राह्मणाला सुगड दान देताना छोटीशी मातीची मडकी सुगडाच्या रूपात- त्यात गहू, ऊस, हळकुंड, कापूस घालून- दान दिले जाते. हलव्याचे दागिने करून घातले जातात, जावयाला तिळगूळ अहेर पाठवला जातो. कोकणात तर दुसर्‍यांच्या घरी तांदूळ ठेवतात, अंगणात नारळ सोडला जातो. इडली-गुळाचा प्रसादसुद्धा केला जातो. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा केला जातो. दक्षिण प्रांतात खीर केली जाते, तर उत्तरेत खिचडी बनवतात. या दिवशी भावजय आपल्या नणंदेला वस्त्र, फळे, मिठाई, तीळ, डाळ, तांदूळ देते. ‘संकरातदेना’ असेही या दानाला संबोधले जाते.

हिमालयाच्या सखल भागात तर पिठाचे पक्षी करून ते तुपात तळले जातात व लहान मुलांच्या गळ्यात बांधून नंतर दुसर्‍या दिवशी कावळ्यांना खाण्यासाठी घातले जातात. काकवीत तीळ घालून ‘तिळुवा’ बंगालात केला जातो. त्याशिवाय स्नेह्याला देण्यासाठी तांदळाच्या पिठात तूप-साखर मिसळून ‘पिष्टक’ तयार केले जाते. गंगास्नानासाठी प्रयाग येथे भरत असलेली मोठी यात्रा असूदे किंवा कुंभकोणम येथे शारंगपाणी देवाने दिलेले दर्शन असू दे, हा सण अतिप्राचीन असून आनंद-चैतन्याचे भरते आणणाराच आहे.

संक्रांतीला देवता मानूनच तिचे वर्णन सर्वत्र केले जाते. पंचांग, कॅलेंडरांमध्येही तिचे वर्णन या स्वरूपातच आढळते. ती देवी असली तरी तिचे रूप अक्राळविक्राळ वर्णिलेले दिसते. प्रत्येक वर्षी तिचे वाहन, वस्त्र, दागिने, वय, भोजन यांत विविधता असते. ती ज्या दिशेकडून येते व ज्या दिशेला जाते त्यावरसुद्धा बरेच लोकसंकेत आधारलेले दिसतात. तिने ज्या-ज्या वस्तू धारण केलेल्या असतात त्या एक तर नष्ट होतात, विनाश पावतात, नाहीतर महाग तरी होतात. ती ज्या दिशेहून येते तेथे समृद्धी होते, तर ती ज्या दिशेला जाते व पाहते तेथे अशुभ काहीतरी घडते असे मानले जाते. हे लोकसंकेत प्रदेशपरत्वे थोडेफार बदलले तरी त्यात बरेचसे साम्य आढळते.

पौष महिन्यात येणार्‍या मकर संक्रांतीच्या दिवसांत कडाक्याची थंडी असते. त्यामुळेच शरीराला स्निग्धता देणार्‍या तिळाचे खाद्यपदार्थ करण्याची परंपरा सुरू झाली असावी. हळदीकुंकवाच्या निमित्ताने सवाष्णींना वाण देण्याची प्रथा तर आता प्रतिष्ठित स्वरूपात सामोरी येताना दिसते. श्रद्धेने हा दिवस मानताना लोकमानस आजही घरात गोडधोडाचा नैवेद्य करून तो कुलदैवत, ग्रामदैवत, तुळशीवृंदावन, देवघरात दाखवला जातो. नव्या नवरीचे सुगड माहेरी पूजण्याची परंपरा काही ठिकाणी दिसते. हळदीकुंकवाला वाण दिले जाते; पण काही काही उच्चवर्णीयांत चैत्र पाडव्याला तिन्हीसांजेला घरात सवाष्णींना बोलावून त्यांचे हात-पाय धुऊन त्याना हळद-पिंजर लावली जाते. रथसप्तमीला तर तीन शेणी (शेणापासून केलेल्या गोवर्‍या) रचून त्यांची चूल करून त्यावर ‘खिचडी’ शिजवली जाते. ही खिचडी ऊतू जाताना तिचा कढ ज्या बाजूला ऊतू जातो ती बाजू सुखसमृद्धीने भरणारी असते असे मानले जाते. गोवर्‍या जळून त्यांची झालेली राख ‘भस्म’ म्हणून एखाद्या डबीत भरून ती वर्षभर मोठ्या श्रद्धेने संकटकाळात वापरली जाते.

मकर संक्रांतीच्या सणात वैश्‍विकता आढळते म्हणूनच खर्‍या अर्थाने हा सण स्नेहवर्धनाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, शुद्ध वाणी आणि सौंदर्याचा साक्षात्कार घडविणारा असाच आहे. या सणासंदर्भातील प्रचलित असलेले लोकसंकेत याचीच साक्ष पटवितात. म्हणूनच राजस्थानातील भिल्ल संक्रांतीच्या दिवशी उजाडण्यापूर्वीच त्यांना प्रिय असलेल्या श्याम-चिरैया ‘दिवी’ पक्ष्याच्या शोधार्थ समूहाने बाहेर पडतात. हा आनंद अभूतपूर्व असाच असतो. सण-उत्सवांचा अगदी नैसर्गिक, निखळ, मन:पूर्वक आनंद कसा लुटायचा हे रानावनात राहणार्‍या समूहाकडूनच आम्हाला शिकावे लागेल. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या सर्व गदारोळात आज मकर संक्रांतीचा मूळ हेतूच हरवत चाललेला आहे. म्हणूनच या भिल्लांची या सणामागची धारणा आणि त्यांची निसर्गाशी असलेली अतूट मैत्री सच्च्या स्नेहाचा संदेश देणारी ठरते.

भिल्ल समाजात हा सण जणू काही नववर्षाचा आरंभच असतो. एरव्ही इंग्रजी नववर्षाची ही सुरुवातच असते. पळस, पंगारा फुलण्याचे हे दिवस. वसंत ऋतूचे आगमन, दिवसही हळूहळू मोठे व्हायला लागतात. कधी गुलाबी थंडी, तर कधी सोसवत नाही अशी कडाक्याची थंडी याच महिन्यात असते. त्यातही राजस्थानसारख्या मरुभूमीत तर कडाक्याच्या थंडीचा भारच असतो. त्यातही निसर्गाशी रत झालेली ही जमात पूर्वी तर उघड्या अंगानेच एकरूप व्हायची. संक्रांतीच्या आदल्या दिवशी नववर्षाचा जणू काही जल्लोषच असतो. रानावनातच भटकंती असल्याने ‘दिवी’ कोठे असेल हे या समूहाला माहीतच असते. त्यामुळेच या पक्ष्याच्या मागे हा समूह मोठमोठ्याने आरडाओरडा करत धावत सुटतो. दिवी उडून उडून थकतो. एका लहानशा झुडपावर बसतो. तिथे अगोदरच एक भिल्ल लपलेला असतो. तो त्याला अलगद पकडतो. मग पक्षी सापडल्याने एक मोठा विजय प्राप्त केल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहतो.

दिवी सहजासहजी सापडणे ही तशी कठीणच गोष्ट! कधीकधी रात्र होत आली तरी दिवी सापडत नाही. परंतु एकदा सापडला की आनंदाला पारावर उरत नाही. बेहोषीत मोठमोठ्याने ढोल वाजवीत गावातील मुख्य ‘गमेती’च्या घरी आणल्यावर देवीचे स्वागत करा, ती आपल्याला आशीर्वाद देईल असे म्हणत म्हणत हा गावप्रमुख आपल्या हातातील तिळगूळ दिवीच्या चोचीत घालतो. त्यानंतर त्याला मोकळे सोडण्यात येते. खरे तर हा पक्षी या सर्व गदारोळात घाबरलेलाच असतो. त्यामुळे त्याची झालेली मुक्तता ही त्याच्यासाठी आनंददायकच असते. तो कोठेही उडून जाऊ शकतो. तो तसा उडतोसुद्धा, पण त्याच्या उडून जाऊन एखाद्या ठिकाणी बसण्यावरही शुभ-अशुभ संकेत ठरलेले आहेत. ‘दिवी’ उडून जाऊन एखाद्या खडकावर बसला तर येणारे वर्ष दुष्काळ पिडीत असणार, आणि लांब झाडावर बसला तर मात्र सुख-समृद्धीची बरसात होईल; आणि जर का योगायोगाने तो झाडावरच बसला तर मात्र त्यांचे अभूतपूर्व नाचगाणे सुरू होते. ‘ढोलमणो ले… ढोलमणो ले…’ हे गाणे असेच पुढे पुढे एका लयीत जमिनीवर ठेका धरून सादर केले जाते. त्यात अर्थाच्या वैविध्यपूर्ण छटा जशा आहेत, तशाच तर्‍हेने मेघ, पर्जन्य, विजा, मोर हे निसर्गघटकसुद्धा समाविष्ट झालेले आहेत.

जानेवारीतील पौषात येणार्‍या या मकर संक्रांतीला प्राचीन पारंपरिक पार्श्‍वभूमी जशी लाभलेली आहे, तसेच एक मोठे वैचारिक प्रेरणास्रोत या दिवसाचे सारतत्त्व आहे. ते म्हणजेच, स्वामी विवेकानंदांचा जन्म. मकर संक्रांतीच्याच दिवशी १२ जानेवारी १८६३ ला जन्माला आलेल्या स्वामीजींनी या भूमीला दिलेला ज्ञानसाधना, विचारसाधना, साहसाचा महामंत्र युगानयुगे पुरणारा आहे. त्यांनीच सांगितलेले आहे- ‘ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे. ती माणसाला पशुकोटीतून वर काढते. स्वत:बरोबरीनेच सार्‍या सृष्टीबद्दल, मानवसमाजाबद्दल ती विचार करायला लावते. त्याला भविष्यकाळाशी भिडविते. माणूस मर्त्य असला तरी मानवता अमर्त्य आहे ही शिकवण देते. ज्ञानाची भूक ही आत्मविकासाची, प्रगल्भतेची भूक आहे. गती आणि ज्ञान हीच केवळ जिवंतपणाची लक्षणे आहेत.’ म्हणूनच आधुनिक विचारसरणी अंगीकारूनच मकर संक्रांतीसारख्या सणाला सामोरे जाण्याची गरज आहे.

याच सणाशी निगडीत असलेले हळदीकुंकवाचे ‘वाण’ आज स्नेहाचे प्रतीक म्हणून कमी, तर प्रतिष्ठेचे स्तोमच जास्त माजविणारे दिसते. घरी येणार्‍या महिलांना वाकून हळद-पिंजर लावताना कंबरेत भरून येते म्हणून मग सर्वच साहित्य प्लॅस्टिक पिशवीत बंद करून ते हातात टेकवून ‘बुफेसाठी’ निमंत्रित करण्याची पद्धत स्थिरावताना दिसते आहे. उंची वस्त्रे, साड्या, दागदागिन्यांचे प्रदर्शन विचारातला संकुचितपणा अधोरेखित करते. तीळ आणि गूळ स्निग्धता, गोडवा बहाल करणारे ठरते. पण त्याऐवजी नुसतेच साखरेचे कृत्रिम तीळ देण्यातच धन्यता मानून त्यामागचे मूळ तत्त्वच हरवले जाते. या हळदीकुंकवाच्या निमित्ताने चारचौघींचे पाय घराला लागावेत, एकमेकींचे सुखसंवाद घडावेत, विचारांची देवाण-घेवाण होऊन आपापसातील स्नेह वृद्धिंगत व्हावा हा हेतू बाजूला सोडून वाण वाटपाची, वस्त्रे-दागिने यांच्या प्रदर्शनांची स्पर्धाच सुरू आहे की काय असेच वाटत राहते. इथे प्रकर्षाने केशवसुतांच्या कवितेच्या ओळी आठवतात-

हलवा करिता तिळावर

कण चढती पाकाचे

अहंस्फूर्तीच्या केंद्राभोवती

वेष्टन तेवी जडाचे

संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा मूळ आत्मा निर्मळ, निरामय, विशुद्धच असतो. मानवी समूहाच्या अभिवृद्धीचा महत्त्वपूर्ण संदेश त्यात समाविष्ट झालेला असतो. परंतु माणसेच पैसा-प्रतिष्ठेच्या जोरावर मूळ हेतूच उखडून टाकतात. त्यामुळेच या सणामागील निखळ आनंदाला मुकायला होते. रंगबिरंगी पतंग हवेत उडवून, दिवी पक्ष्याच्या मागे स्वैरपणे धावून, गंगास्नान करून शुचिर्भूत अंत:करणाने स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी हा सण आहे. परंपरा, संस्कृतीचे वेष्टन जसे या सणाला वेढून आहे, त्याच तर्‍हेने फार मोठी वैचारिक बैठक त्याला बिलगलेली दिसते. म्हणूनच नवविचारांचा, जाणिवांचा, मैत्रीपूर्ण नात्यांचा, संस्कृती-संस्कारांचा गोफ विणून मकर संक्रांती साजरी करूया! स्निग्धतेचे प्रतीक असलेले ‘तीळ’ व हृदयातील गोडवा जपणारा ‘गूळ’ एकमेकांना देऊन ‘तिळगूळ घ्या, गोड बोला… एकमेकांशी सौहार्दपूर्ण संवाद साधा’ हा संदेश मनामनांत रूजवूया.