आमदार विजय सरदेसाई यांचे मत
नवी दिल्लीत हायकमांड असलेल्या राजकीय पक्षांचे प्राधान्यक्रम अनेकदा वेगवेगळे असतात, तर स्थानिक राजकीय पक्षांसाठी जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असतात. त्यामुळे स्थानिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास भाजपला ते एक आव्हान ठरू शकते, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल व्यक्त केले.
गोवा प्रथम असा दृष्टिकोन असलेल्या राज्यातील राजकीय पक्षांनी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आताच एक संयुक्त आघाडी स्थापन केली पाहिजे, असेही सरदेसाई यांनी सांगितले. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) आणि गोवा फॉरवर्ड पक्ष (जीएफपी) हे गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष आहेत. त्या पक्षांचे राज्य आणि लोकांशी जवळचे नाते आहे. आरजीपीने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे आणि जर काही समान आधार सापडला तर आपण प्रथम मुद्द्यांवर एकत्र यायला हवे. राजकीय युती नंतर होऊ शकतात. खऱ्या युती विचारांच्या एकतेने सुरू होतात, असेही सरदेसाई म्हणाले. राज्यातील सद्यःस्थितीचा विचार करता गोव्याचे रक्षण करण्यासाठी खरोखर वचनबद्ध असलेल्या कोणत्याही पक्षाने एकत्र आले पाहिजे. आरजीपीशी जवळचे संबंध समान विचारधारेमुळेच आपोआप विकसित झाले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

