स्त्री सुरक्षितता एक प्रश्‍नचिन्ह?

0
126

सपना मातोणकरसाखळी महाविद्यालय 

जग हे सुंदर आहे. ते सुंदर ठेवायचं की बिघडवायचं हे प्रत्येकाच्या हाती असते. प्रत्येकाचे आचारविचार हे अनेक अंगानी चालत असतात आणि त्यातूनच उद्भवतात अनेक जटील प्रश्‍न. या प्रश्‍नांची उत्तरे शोधताना नाकीनऊ येते. कधी सापडतात तर कधी सापडतच नाहीत उत्तरे. बदललेली मानसिकता आणि बिघडलेल्या समाज व्यवस्थेतून जीवनाची घडी विस्कळीत होते. आणि उभे राहतात फक्त प्रश्‍न आणि प्रश्‍नच…! का, कशाला, कशासाठी???

आजच्या आधुनिक धावपळीच्या मानवी जीवनाची कीव वाटते; पण तिरस्कारही तेवढाच वाटतो. आज माणुसकी नावाला उरलेली नाही. स्वार्थीपणा आणि वासनापूर्तीतून जीवन काळवंडले जात आहे. ज्या भूमीत स्त्रीला मातेचा, देवीचा दर्जा दिला जातो त्याच देशात तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात आहेत. मानसिक विकाराने ग्रासलेल्या नराधमांच्या वासनेची स्त्री बळी पडत आहे. आपण जिच्या पोटी माणूस जन्म घेतो तिच्याच सुरक्षिततेचे आज तीनतेरा वाजवले जात आहेत. ज्या प्रगत देशात मुलामुलींना समान वागणूक दिली जाते, कमी लेखले जात नाही, स्वतंत्रपणे फिरण्याची परवानगी आहे, जे आपले ध्येय, लक्ष्य गाठण्यासाठी भरारी घेतात अशा फुलासारख्या नाजूक, कोमल मुली काही नराधमांच्या वासनेला बळी पडत आहेत. मुली आजच्या जगात सुरक्षित नाहीत. त्या आईच्या गर्भात तरी कुठे सुरक्षित आहेत? त्याचे कारण म्हणजे स्त्री-भ्रूणहत्या. जन्माला येण्यापूर्वीच तिला गर्भात मारून टाकले जाते. का, कशासाठी? कोणता बरा अपराध तिने केलेला असतो म्हणून तिला जगात येण्यापूर्वीच, सुंदर जग पाहण्यापूर्वीच मारून टाकतात? काही बोलू शकत नाही, स्वत:चे संरक्षण करू शकत नाही अशा इवल्याशा जीवाला आपण क्रूरपणे मारून टाकतो. याचे कारण कोणते? असं म्हणतात की मुली म्हणजे बापाच्या डोक्यावरचे ओझं. ती जन्मली म्हणजे बाप तिच्या लग्नासाठी पुंजी जमा करून ठेवत असतो. दुसरं म्हणजे मुली वंशाचा दिवा नसतात ना. सगळे सोपस्कार त्यांना करण्याची मुभा नसल्याने लोकांची मानसिकता बनली आहे की मुलगी नकोच, मुलगाच झाला पाहिजे. म्हणूनच बायकांवर दबाव आणला जातो. मनात नसताना बाळाच्या आईला आपल्या इवल्याशा बाळाला गमवावं लागतं. ऐकलं नाही तर तिचा छळ केला जातो. मन कठोर करून, मनावर दगड ठेवून या छळाला त्रासून तिला गर्भपाताला सामोरे जावे लागते. त्या छोट्याशा बाळाला या जगात श्‍वास घेण्यासाठी, या जगाचा अनुभव घेण्यासाठी का म्हणून रोखले जाते? फक्त ती मुलगी असते म्हणून? वंशाचा दिवा नसते म्हणून?? 
आज आपण पाहतो की मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या घटत चालली आहे. याला कारण आम्हीच आहोत. स्त्रीभ्रूण हत्या ग्रामीण भागातील किंवा कमी शिकलेले लोकच करतात असे नाही. चांगले शिकले सवरलेल्या, उच्चभ्रू समाजात राहणार्‍या लोकांचीही अशीच मानसिकता असते. मुलगी म्हणून जन्माला येणे हे तिच्या हाती नसते. मग मृत्यूची शिक्षा आपण त्या जीवाला का म्हणून देतो?
पण सगळ्यांचीच अशी मानसिकता नसते. सगळेचजण हे पाप करतात असे नाही. मुलीचा जन्म झाला की देवाचा आशीर्वाद असे समजून तिला स्वीकारून पुढे जातात, लहानाचे मोठे करतात. शिक्षण, खाणं-पिणं सगळे देतात. स्वतंत्रपणे या जगात फिरण्याची परवानगी देतात. पण वाढलेल्या मुलीवर कोण कशा नजरेने पाहतोय, यावर लक्ष देत नाहीत. मानसिक विकार असलेल्या काही माणसांना ह्या उडणार्‍या, बागडणार्‍या पाखरांना पाहून त्यांची वासना जागी होते. या पाखरांचे पंख छाटायचे विकारी विचार हेच त्यांचे ध्येय बनते. दिल्लीत झालेला गँगरेप याचे उदाहरण देता येईल. त्यात त्या दुर्दैवी मुलीची काय चूक होती? तिच्यावर निर्दयपणे अत्याचार करून गाडीतून रस्त्यावर फेकण्यात आले. ऐकून अंगावर शहारे येतात. मानसिक विकार असलेल्या राक्षसांच्या वासनेला बिचारी ती बळी पडली. अशा नराधमांना फाशीची शिक्षाच कायद्यात हवी. 
काबाडकष्ट उपसून मुलींना वाढवायचे, त्यांना शिकवायचे आणि मोठी झाल्यावर त्यांची इज्जत, अब्रू नराधमांनी लुटायची? कोणता अधिकार पोचतो आपल्याला या उमलत्या कळींची अब्रू लुटण्याचा? आपल्या घरी आई, बहीण यांच्याशी असं कुणी वागलं तर आपण आक्रोश, अकांडतांडव करतो. मग हाच खेळ दुसर्‍याच्या मुलीशी, बहिणीशी कशासाठी? कोणता अधिकार पोचतो आपल्याला हे सर्व करण्याचा? मुलींनी खुल्या आभाळात का बरे बागडू नये? तीने घरच्या चार भिंतीतच कोंडून राहायचे का? याचा विचार आपण कधी करतो का? प्रश्‍न अनंत आहेत. आपण फक्त सिनेमा, टी. व्ही. मालिकांमध्ये बलात्कार, खूनाच्या घटना पाहतोय असं नाही. सदर घटना आता प्रत्यक्ष आपल्याकडे सर्रास घडत आहेत. जग मानसिक विकारांच्या लोकांनी इतकं व्यापून गेलंय की कोण कशा नजरेने, कोणत्या हेतूने पाहतोय हे समजणे कठीण झाले आहे. आपल्या राज्यात हल्ली बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. प्रशासनाने या प्रश्‍नी जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. शाळांतही बालकांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. महिला, बालकांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्याची सक्त गरज आहे. गुन्हेगारांना कडक शिक्षेची कायद्यात तरतूद हवी. शेजार्‍याचे घर जळते तर जळू दे, आपलं सुरक्षित आहे ना अशी आमची मनोवृत्ती बनली आहे. एक दिवस ही आग आपलंही घर जाळून टाकेल याचा विचार आपण कधी करणार आहोत? बदललेली मानसिकता, समाज व्यवस्था आणि सुरक्षिततेची हमी लोकांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे असेच घडत राहणार. ‘भारत माझा देश आहे आणि माझं माझ्या देशावर प्रेम आहे’ हे लिहून ठेवलेले शब्द फक्त आम्ही म्हणावे; पण खरंच प्रेम आहे काय? हा खरं तर यक्ष प्रश्‍न आहे. देशप्रेमाच्या व्याख्येला वासनेच्या नजरेतून पाहावे काय? आज वासनेच्या हव्यासापोटी सारे काही बरबटून गेले आहे. पाश्‍चात्य संस्कृतीच्या आजाराने देश पोखरला जात आहे. कडक शिक्षेची भीती मनात नसल्यामुळे स्त्रीयांवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना रान मोकळे झाले आहे. त्यांना वेळीच आवरण्यासाठी कडक कायदे, त्वरित कठोर शिक्षेची अंमलबजावणी व्हायला हवी. तसे घडले तरच सामाजिक मानसिकता बदलून स्त्रीवर्गाला सुरक्षिततेची हमी मिळेल. 
…………