१२ व्या गोमंत महिला साहित्य संमेलनाचा पणजीत शानदार समारोप
आज स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेचा गोष्टी केल्या जातात. पण ते समान होऊच शकत नाहीत. निसर्गाने त्यांना एकमेकांना पूरक बनवलेले आहे. त्यात महिला ही विशेष असल्याने त्यांच्यावर अधिक जबाबदारी असते असे मत राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी व्यक्त केले. फोंड्यातील शारदा ग्रंथप्रसारक मंडळातर्फे तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळ व कला व संस्कृती संचालनालय यांच्या सहकार्याने पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या १२ व्या गोमंत महिला साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात राज्यपाल बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष मंगला गोडबोले, स्वागताध्यक्षा निर्मला खलप, कार्याध्यक्षा संगीता अभ्यंकर, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, आयोजन समितीच्या कार्यवाह चित्रा क्षीरसागर, शारदा ग्रंथप्रसारक संस्थेच्या अध्यक्षा विजया दीक्षित व तुळशीमाता मंडळाच्या अध्यक्षा सुगंधा बोरकर उपस्थित होत्या.
संमेलनाध्यक्ष गोडबोले यांनी संमेलनाचा आढावा घेतला. पुढील वर्षीच्या संमेलनाची जबाबदारी वास्को येथील साहित्य उत्सव समितीकडे सोपवण्यात आली. अनिता कवळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
परिसंवाद रंगला
संमेलनात ‘राजकारणातील स्त्रिया ः प्रतिमा आणि वास्तव’ या विषयावरील परिसंवादात राजकारणातील स्त्रियांचा वावर व त्यातून निर्माण झालेली प्रतिमा व एकूण वास्तवदर्शी परिस्थिती यावर ऊहापोह झाला. अनघा आर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात शेफाली वैद्य (पुणे) व गोव्यातील लेखिका अंजली आमोणकर, नीना नाईक, स्नेहा प्रभू म्हांबरे यांनी भाग घेतला.
आमोणकर यांनी यावेळी, जिद्द, धैर्य व हिंदूनिष्ठता हे गुण स्त्रियांच्या चरित्र चित्रणातून दिसून येतात, राणी लक्ष्मीबाईंवरील चरित्रात राष्ट्रनिष्ठा आणि कडवी हिंदूनिष्ठता जवळून पाहिलेले गोडसे बटजी ठोकताळे न ठेवता लिहितात. इतर महिलांवरील चरित्रात बखर, संशोधन, कल्पना यांची सरमिसळ आहे. पी. सी. अलेक्झांडर यांनी इंदिरा गांधीवर चांगले चरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे असे सांगितले.
म्हांबरे यांनी, स्त्रियांनी समाजात नेतृत्व करताना पतीनिष्ठा, कुटुंब निष्ठा हे गुण सोडलेले नाहीत. १९ व्या शतकात स्त्रियांना राजकारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला.
वैद्य यांनी, राजकारणात स्त्रिया, नवर्याची जागा महिलांसाठी राखीव केल्याने तिथे बायकोला आणले अशा पद्धतीने आलेल्या दिसतात. त्या अलीकडेच निर्णय घेऊ लागलेल्या आहेत. मोरारजींच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी मंत्री होत्या तेव्हा गुंगी लडकी म्हटले जायचे, त्याच इंदिरा पंतप्रधान झाल्या. १९७१च्या बांगला मुक्तीलढ्यात त्या दुर्गा बनल्या. राजकारणात स्त्री-पुरुषांकडून समान अपेक्षा हव्यात असे मत व्यक्त केले.
नीना नाईक यांनी, स्त्रियांना कोणतेच निर्णय घेता येत नाहीत. पण प्रसिद्धी, वर्तमानपत्रात छायाचित्र येणे आवडत असल्याचे सांगितले. आर्लेकर यांनी, स्त्रीकडे उपजत नेतृत्व गुण असतात. घरात आणीबाणीच्यावेळी त्यांचे गुण पणाला लागतात असे सांगितले.
प्रकट मुलाखतीचे रंग
दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात आज सारा खेल टीआरपीचा असून त्यावरच मालिकांची पुढील कथा व त्या मालिकेचे भविष्य ठरत असते. आज प्रेक्षकांना काय पहायला आवडते, ते कोणत्या गोष्टी स्वीकारतात यावरही बरेच काही अवलंबून असते. लेखक व कलाकारांमध्ये आज योग्य संवादन होऊन कामाचा आदर होऊ लागला तर चांगला बदल घडून येईल, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने व साहित्यिका व अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत सुकन्या कुलकर्णी यांनी साकारलेली माई व मधुगंधा यांनी साकारलेले विजया हे पात्र लोकप्रिय ठरले आहे. मधुगंधा ह्या होणार सून मी या घरची या मालिकेच्या लेखिकाही आहेत. याच अनुषंगाने दोघांनीही मालिकेतील काही गोष्टींवर प्रकाश टाकला. संगीता अभ्यंकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी हिंदीत कृत्रिम वातावरण असल्यामुळे तेथे आपण कधीच रुळले नाही. मराठीतील आपलेपणाची सर हिंदीत येत नाही असे यावेळी कुलकर्णी म्हणाल्या. तर मराठीत विनोदी लेखन करणार्या महिलांची कमतरता असल्याचे मधुगंधा यांनी सांगून, कादंबरीकडून नाटकाकडे वळतो तेव्हा लेखकाला संघर्ष करावा लागतो. त्या एका वळणावर हे एक वेगळ्या धाटणीचे नाटक त्यांनी लिहिले त्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यांची वयाच्या चौदाव्या वर्षी चौथी कादंबरी प्रकाशित झाली होती. याचा यावेळी उल्लेख करण्यात आला.
भारूड व काव्यमैफल रंगली
संमेलनात भोजनोत्तर सत्रात पंढरपूर येथील प्रसिद्ध लोकसंगीत कलाकार चंदा तिवारी व त्यांच्या सहकार्यांचे पारंपरिक भारूड कार्यक्रम रंगला. संध्या साखे, गीता तिवाडी, सोनाली जोशी, नीता काशिद यांचा यात समावेश होता.
सुहास जोशी, दीपक सुर्वसे व राम सुतार यांनी साथसंगीत केली. रेश्मा नातू यांनी सूत्रसंचालन केले.
यानंतर शांता लागू यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफल झाली. यात लीना पेडणेकर, राधा भावे, डॉ. अनुजा जोशी, कविता बोरकर, अंजली चितळे, सुनेत्रा कळंगुटकर, डॉ. श्यामा सिंगबाळ तसेच बालकवयित्री समृद्धी केरकर, नृपाली देसुरकर, अदिती बर्वे व स्नेहा सुतार या उदयोन्मुख कवयित्रींनी चांगल्या कविता सादर केल्या. सोनाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

